चौसष्ट घरांचा खेळ नियतीने मोडला...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कोल्हापूर -
जो नही मिला उसका गम क्‍यूँ करना...
हासील मौके में क्‍यूँ ना सवरना...
किस्मत से लढकर पाना भी तो जिद्द है!
कदमों ने जितना नापा उतना कम है!
मुझको गम न था कोई मिलने का, 
क्‍युँकी खुद से ही वादा था चलने का...

कोल्हापूर -
जो नही मिला उसका गम क्‍यूँ करना...
हासील मौके में क्‍यूँ ना सवरना...
किस्मत से लढकर पाना भी तो जिद्द है!
कदमों ने जितना नापा उतना कम है!
मुझको गम न था कोई मिलने का, 
क्‍युँकी खुद से ही वादा था चलने का...

बुद्धिबळाच्या पटावर रमलेल्या शैलेश मधुकर नेर्लीकर याने त्याच्या जगण्यातून दिलेला हा संदेश. जन्मत:च दिव्यांग असूनही भल्याभल्या बुद्धिबळपटूंना घाम फोडणाऱ्या शैलेशच्या चालींची बुद्धिबळप्रेमींना मोठी उत्सुकता असायची. परंतु, त्याच्या आकस्मिक निधनाने त्याचा बुद्धिबळाचा खेळ थांबला असला तरी त्याच्या स्मृतींचा दरवळ क्रीडा क्षेत्रात मात्र कायम राहणार आहे. 

नेर्ली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सरलाताई व माध्यमिक शिक्षक मधुकर नेर्लीकर यांचा शैलेश हा मुलगा. जन्मत:च द्विव्यांग असल्याने दोघांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले. कॅल्शियमच्या कमतरतेने सुरू झालेल्या उपचारात एक दिवस जादा डोस दिल्याने त्याचे शरीर ताठर झाले. त्यातून तो शंभर टक्के दिव्यांग झाला. मुलग्याची ही स्थिती पाहून वाईट वाटत असले, तरी त्याने स्वत:ला सिद्ध करावे, असे त्यांना वाटत होते. बालपणापासून शैलेशमध्ये बुद्धिबळाची आवड रुजली. त्याला २००२ ला स्थानिक बुद्धिबळ स्पर्धेत उतरविले. स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जाण्याचे काम आई सरलाताई यांनी केले. त्याला पाहताच संयोजकांच्या चेहऱ्यावर तो खेळणार कसा, असा प्रश्‍न असायचा.

मात्र, स्पर्धेत त्याने चाली करण्यास सुरुवात केल्यानंतर संयोजकांचे चेहरे फुलायचे. त्याच्या पाठीवर शाबासकी दिली जायची. या कौतुकाने तो हुरळून जायचा आणि आत्मविश्‍वासाने पुढील स्पर्धेत खेळायचा. महाराष्ट्रात तो ठिकठिकाणी स्पर्धेत उतरलाच; शिवाय पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, नवी दिल्लीसह जर्मनी, सिंगापूरमधील स्पर्धेतही खेळला. या प्रवासात त्याच्या मागे आई सरलाताई ठामपणे उभ्या राहिल्या. 

बुद्धिबळ प्रशिक्षक प्रीतम घोडके व उत्कर्ष लोमटे यांनी त्याला बुद्धिबळाचे अचूक धडे दिले. बहीण सुनीता नेर्लीकर व भाऊ महेश यांनीही त्याला नेहमी प्रोत्साहित केले. त्याची विशेष काळजी घेत सुनीता तहसीलदार झाली, तर महेश न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक झाले. शैलेशचे बुद्धिबळातील कौशल्य पाहून त्याला शाहू छत्रपती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंहराजे घाटगे यांनी मानधन सुरू केले होते. 

...अन्‌ शेवटची इच्छा राहिली अपुरी
शैलेशने बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय गुणांकनही मिळविले. त्याने माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची भेट घेतली होती. त्याला ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची होती. परंतु, बुद्धिबळाच्या पटावरील या वजिराची एक्‍झिट झाली. यापुढील स्पर्धेत त्याची उणीव जाणवणारी ठरेल.

Web Title: Kolhapur News Shailesh Nerlikar no more