इचलकरंजीतील गुंड लाखेस अटक 

राजेंद्र होळकर
शुक्रवार, 23 मार्च 2018

इचलकरंजी - अडीच महिन्यांपासून "मोका'मधील पसार असलेला येथील नामचीन गुंड आणि लाखे टोळीच्या म्होरक्‍याला पोलिसांनी पुणे विमानतळावर अटक केली. शाम रंगराव लाखे (दत्तनगर, भाटले मळा, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. तो उत्तर भारतामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता.

इचलकरंजी - अडीच महिन्यांपासून "मोका'मधील पसार असलेला येथील नामचीन गुंड आणि लाखे टोळीच्या म्होरक्‍याला पोलिसांनी पुणे विमानतळावर अटक केली. शाम रंगराव लाखे (दत्तनगर, भाटले मळा, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. तो उत्तर भारतामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता.

याचदरम्यान त्याला शहापूरचे सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि कोल्हापूर-इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडले. लाखेने स्वत:ची गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याच्यासह साथीदारांवर खंडणी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला तीन जिल्ह्यांतून तडीपार केले होते.

तडीपारची मुदत संपताच त्याने पुन्हा शहरात कारनामे सुरू केले. अडीच महिन्यांपूर्वी लाखेचे साथीदार मुबारक महंमद शेख, पैगंबर कासीम मुजावर ऊर्फ पठाण (रा. दोघे लालनगर), हरिकिशन नंदकिशोर पुरोहित (राधाकृष्ण टॉकीज शेजारी) यांनी महिला उद्योजिका अश्‍विनी महेश ओझा यांना खंडणीसाठी धमकावल्याने अटक केली, तर लाखे पसार झाला. महिन्यापूर्वी टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. अडीच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता.

गुंड लाखेने पुणे विमानतळावरून विमानाने काल मध्यरात्री उत्तर भारतामध्ये पळून जाण्याची तयारी केली असून, त्याने विमानाचे तिकीट काढल्याची माहिती शहापूरचे सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि कोल्हापूर-इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला समजली. पोलिसांनी विमानतळ परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली.

आज सायंकाळी लाखे याला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी त्याच्याकडे बराच काळ कसून चौकशी केली. 

Web Title: Kolhapur News Sham Lakhe arrested