"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार

अशोक तोरस्कर
सोमवार, 23 एप्रिल 2018

उत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची मोठी कामगिरी केली, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ नेते व माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आज काढले. 

उत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची मोठी कामगिरी केली, असे गौरवोद्‌गार माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज काढले. 

बहिरेवाडी (ता. आजरा) येथे तीन कोटी खर्चून उभारलेल्या शिक्षणतज्ञ पद्‌मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, वाईचे आमदार मकरंद पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, अॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.  श्री. पवार यांच्या हस्ते स्मारकाचे उद्‌घाटन व कोनशिलेचे अनावरण झाले.  

श्री. पवार म्हणाले, ""महाराष्ट्रात विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी शिक्षणतज्ञ होवून गेले. या यादीत जे. पी. नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ज्ञानसंपदेच्या माध्यमातून या सर्वांनी समाजाची सेवा केली. या शैक्षणिक कार्याला दर्जा व विस्तार देण्याचे काम डॉ. नाईक यांनी केले.

युनोस्को परिषदेसाठी देशातून ज्या तीन शिक्षणतज्ञांची निवड झाली होती, त्यात डॉ. नाईक यांचा समावेश होता. त्यांच्या या कर्तृत्वाची आठवण स्मारकाद्वारे उजळणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा स्त्रोत पाझरावा, अधिकाधिक महिलांना शिक्षण कसे मिळेल याची काळजीही त्यांनी घेतली. औद्योगिक व तांत्रिक ज्ञान नव्या पिढीला देण्यातही त्यांची धडपड राहिली.

- शरद पवार,  माजी केंद्रिय कृषी मंत्री

ते म्हणाले, ""शिक्षणाचा विस्तार व त्याला दर्जा देण्याच्या कार्याला त्यांनी कोल्हापुरातून सुरूवात केली. जिल्हा, राज्य, देश, आशिया खंड आणि जगातील विकसीत देशातील शिक्षणाचा आराखडा करण्यासह त्याची दिशा ठरवण्याची जबाबदारी डॉ. नाईक यांनी समर्थपणे पेलली. अशा महान शिक्षणतज्ञाचे स्मारक आजच्या समाजाला आदर्शवत ठरेल. महिलांच्या शिक्षणाविषयी डॉ. नाईक आग्रही होते. शिक्षणाचा विस्तार कसा होईल, याचा विचार या स्मारकाच्या माध्यमातून देत देशातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देण्याचा प्रयत्न व्हावा."" 

शिक्षणात महान कार्य असूनही डॉ. जे. पी. नाईक यांचे व्यक्तीमत्व अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले. परंतु, बहिरेवाडीत झालेल्या स्मारकामुळे त्यांच्या कार्याला उजाळा मिळणार आहे. या स्मारकापासून भावी पिढीने आदर्श घेवून वाटचाल करावी.

- धनंजय महाडिक, खासदार 

आमदार मुश्रीफ म्हणाले, "" भविष्यात या स्मारकाची देखभाल दुरूस्ती जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून व्हावी. डॉ. नाईक यांचे निवासस्थान जतन करण्यासह वाचनालय, अभ्यासिका, प्राथमिक शाळा सुधारणा, गाव तलाव सुशोभिकरणासाठी शासनाकडून दोन कोटीची मागणी करणार आहे. लोकवर्गणीतून त्यांचा पुतळाही उभारला जाईल. स्मारकातील सभागृहाचा वापर जेवणावळींसाठी न करता शैक्षणिक कार्यासाठीच गावकऱ्यांनी करावा."" 

आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या या भूमीपूत्राची आठवण स्मारकाच्या माध्यमातून कायम राहणार आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेवून या भागातून आणखीन जे. पी. नाईकसारखे व्यक्तीमत्व घडावेत, या भावनेतून उभारलेला हा स्मारक मैलाचा दगड ठरणार आहे.

-  संध्यादेवी कुपेकर, आमदार

सरपंच अनिल चव्हाण यांनी स्वागत तर समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. किसनराव कुराडे लिखीत "बहिरेवाडीचे जे.पी.- काटेवाडीचे एस.पी." या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांनी केले. स्मारकाचे कॉन्ट्रॅक्‍टर जयसिंग चव्हाण यांचाही सत्कार झाला.

ए. वाय. पाटील, प्रा. कुराडे, सभापती रचना होलम, उपसभापती शिरीष देसाई, वसंतराव धुरे, सुरेश खोत, प्रकाश मंत्री, रवींद्र आपटे, सतीश पाटील, रामराज कुपेकर, किरण कदम, भरमू पाटील, आण्णासाहेब चव्हाण, काशिनाथ तेली, सुरेश कोळकी, मुकूंद देसाई, बनश्री चौगुले, श्रेया कोणकेरी, जे. बी. बारदेस्कर, जंबो गोरूले आदी उपस्थित होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. कांबळे यांनी आभार मानले. 

शाहूंच्या विचारांचा सन्मान 
श्री. पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून विद्या व कलेच्या क्षेत्रात अनेकांनी कामगिरी केली आहे. आजऱ्यातील डॉ. जे. पी. नाईक, सिंबायोसिसचे संस्थापक गडहिंग्लजचे सुपूत्र शां. ब. मुजूमदार यांनी विद्येच्या क्षेत्रात तर व्ही. शांताराम, बाबुराव पेंटर आदींनी कलेच्या क्षेत्रात शाहूंच्या विचाराचा आदर्श सर्वत्र पोहचवला. 

 

Web Title: Kolhapur News Sharad Pawar comment