शिवरायांचे जगातले पहिले शिल्प पुन्हा उभारले जाणार

शिवरायांचे जगातले पहिले शिल्प पुन्हा उभारले जाणार

कोल्हापूर - गदग प्रांतातील बेलवडीच्या मल्लवा देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या हयातीतच त्यांचे शिल्प आपल्या राज्यात साकारले. मात्र, महाराजांचे जगातले पहिले असणारे हे शिल्प काळाच्या ओघात अडगळीत पडले. हे शिल्प आता पुन्हा उभारले जाऊ लागले आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल. 

काय आहे इतिहास?
दक्षिण दिग्विजय करून शिवाजी महाराज १६७८ मध्ये महाराष्ट्रात परतताना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या छोट्या गढीस वेढा घातला. या वेळी या वेढ्याचे काम सखोजी गायकवाड या सरदारावर सोपवून महाराज पन्हाळगडावर आले. पती मारले गेल्यानंतरही मल्लवा यांनी लढाई सुरूच ठेवली. त्यांनी पुरुषवेशाधारी स्त्री सैन्यही मैदानात उतरविले. शेवटी स्वतः महाराज यादवाडजवळच्या आपल्या सैन्याच्या मुख्य छावणीत दाखल झाल्यानंतर मराठ्यांनी बेलवडीच्या सैन्यास माघार घ्यायला लावली.

मल्लवांनी महाराजांकडे तहाची याचना केली. त्याचवेळी सखोजी गायकवाड याने युद्ध सुरू असताना आपल्या काही सैन्यास कैद करून रात्रभर मराठा छावणीत ठेवले. दुसऱ्या दिवशी थपडा मारून सोडून दिले, अशी तक्रार महाराजांकडे केली. महाराजांच्या शिरस्त्याप्रमाणे स्त्रियांना मराठा सैनिकांनी पकडणे हा मोठा गुन्हा होता. हा गुन्हा करणारा महाराजांचा मेहुणा होता. तरीही त्याला दोन्ही डोळे काढण्याची शिक्षा देण्यात आली. पुढे महाराजांनी मल्लवांना त्यांचे राज्य मुलाच्या दूधभातासाठी परत केले आणि पतीच्या निधनानंतरही मल्लवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी झुंज दिली, याबद्दल त्यांना सावित्रीबाई म्हणून गौरविले. त्यामुळे महाराजांची आठवण आपल्या गढीत कायम राहावी, यासाठी त्यांनी महाराजांचे दगडी शिल्प कोरले. महाराजांच्या हयातीतच निर्माण झालेले हे शिल्प किंवा पहिला पुतळा तमाम शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सांगतात.  

असे आहे शिल्प
यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभिमुख मंदिराच्या ओट्याच्या पश्‍चिमेस असणारे शिल्प सुमारे तीन फूट उंचीचे आहे. शिल्पाचे दोन भाग असून, खालच्या भागात महाराजांनी एका मुलाला मांडीवर घेतले आहे. वरच्या भागात शृंगारलेल्या घोड्यावर स्वार झालेली शिवरायांची प्रतिमा आहे. त्याबरोबरच्या व्यक्तींच्या हातात राजचिन्हाचे सूचक छत्र, सूर्यपान, राजदंड आहेत. शिवरायांच्या डाव्या हातात ढाल आणि उजव्या हातात तलवार आहे. तलवार सरळ असून, तिची मूठ मराठा पद्धतीची आहे.

पाठपुरावा असा
येथील इतिहास संशोधक सावंत, वसंतराव मुळीक आणि शिवप्रेमींनी वारंवार महाराष्ट्र शासनाकडे या शिल्पाच्या पुनर्उभारणीसाठी पाठपुरावा केला. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. चार दिवसांपूर्वी ॲड. गुलाबराव घोरपडे यांच्या पुढाकाराने धारवाडचे पालकमंत्री विनय कुलकर्णी यांना भेटून याबाबत निवेदन देण्याचे ठरले. त्यानुसार आज श्री. सावंत, श्री. मुळीक यांच्यासह ॲड. घोरपडे, अवधूत पाटील निवेदन घेऊन गेले. मात्र, शिल्पाचा इतिहास ऐकल्यानंतर निवेदन स्वीकारण्यापेक्षा श्री. कुलकर्णी यांनी प्रशासनाला तत्काळ सूचना दिल्या आणि प्रत्यक्ष यादवाडमध्ये स्वतः उभे राहून शिल्पाची स्वच्छता करून घेतली. शिल्प पुन्हा कुठे उभे करायचे, याची जागा निश्‍चित केली आणि आजपासून कामाला प्रारंभही झाला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com