शिवाजी विद्यापीठाच्या १९ कॉलेजना ‘अ’ मानांकन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा उंचावत आहे. वर्षभरात विद्यापीठातील १९ कॉलेजना नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले. दर्जेदार आणि सोयीनियुक्त शैक्षणिक पद्धतीचे प्रमाणपत्र देणाऱ्या ‘नॅक’कडून होणारा गौरव हा नक्कीच शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे द्योतक आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा उंचावत आहे. वर्षभरात विद्यापीठातील १९ कॉलेजना नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले. दर्जेदार आणि सोयीनियुक्त शैक्षणिक पद्धतीचे प्रमाणपत्र देणाऱ्या ‘नॅक’कडून होणारा गौरव हा नक्कीच शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे द्योतक आहे. मात्र, आता नॅकच्या नव्या मूल्यांकन पद्धतीचे सर्वच कॉलेजसमोर आव्हान आहे. 
नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिटेशन कौन्सिल (राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद)तर्फे प्रत्येक कॉलेजचे मूल्यांकन होते. 

शैक्षणिक सुविधा, दर्जेदार शिक्षणासाठी होणारे प्रयत्न, उपलब्ध जागा, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी-सुविधा, प्रशिक्षित शिक्षक वर्ग यासह इतर मुद्यांचे मूल्यांकन ही समिती करते. त्यानंतर संबंधित कॉलेजचा दर्जा ठरविला जातो. यात शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १९ कॉलेजना ‘अ’ दर्जा मिळाला. त्यांच्याकडे असलेले शिक्षण आणि त्याचा दर्जा उत्कृष्ट असल्याचे प्रमाणपत्र दिले. नव्या पद्धतीत ऑनलाईन आणि विद्यार्थ्यांचे समाधान महत्त्वाचे ठरणार आहे.

मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या हाती...
नवीन पद्धतीने होणारे नॅकचे मूल्यांकन काही प्रमाणात विद्यार्थ्यांच्या हाती असणार आहे. साधारण दहा टक्के विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर नॅकची लिंक येईल. लिंकवरून विद्यार्थ्यांचे समाधान अजमाविण्यात येईल. त्याचा संदर्भ घेऊनच संबंधित कॉलेजचा दर्जा ठरविला जाईल. या नवीन पद्धतीसाठी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन दाखल करण्याची मुदत आहे.

रंगरंगोटीवर दर्जा नाही  
कॉलेजचे मूल्यांकन ‘नॅक’चे तज्ज्ञ प्रत्यक्षात भेट देऊन करत होते. मात्र, या प्रक्रियेवर टीका झाली. अनेक कॉलेजच्या रंगरंगोटी, इन्फास्ट्रक्‍चरवर हे मूल्यांकन काही प्रमाणात अवलंबून होते. आता त्याचे स्वरूपच बदलले आहे. नव्या रचनेत विद्यार्थी संख्या, पब्लिकेशन, अभ्यासक्रमाची रचना, बदललेले अभ्यासक्रम, बाजारातील व्यवहारांशी संबंधित अभ्यासक्रम यांची माहिती ऑनलाईन घेतली जाईल. त्याला ७० टक्के गुण असतील आणि प्रत्यक्ष भेटी देऊन झालेल्या मूल्यांकनाला ३० टक्के गुण असतील.

स्वागतार्ह निर्णय - प्रा. डॉ. कामत 
नॅकच्या नवीन पद्धतीत वस्तुनिष्ठ आणि अंतर्गत परीक्षण होणार आहे. त्यामुळे बाह्यरंगरंगोटीवर ग्रेड मिळणार नाही. ऑनलाईन डाटा आणि प्रत्यक्ष भेटी यांचा विचार होऊनच ग्रेड मिळेल. यातून वस्तुनिष्ठ आणि दर्जा कळण्यास मदत होईल. खरे मूल्यांकन होणार आहे. हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे, असे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता अभिकक्षचे संचालक प्रा. डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Shivji University 19 colleges have A Grade