शिवशाही विरुद्ध लाल परी

शिवाजी यादव
सोमवार, 28 मे 2018

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात दाखल झालेल्या शिवशाही बसचा बोलबाल झाला आहे. एस.टी. महामंडळ यातून पुन्हा चर्चेत आले. शिवशाहीची क्रेझ वाढत आहे; मात्र यातून शिवशाही विरुद्ध एसटीचे कर्मचारी यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. 

कोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या गाड्या म्हणजे खासगीकरणाचा डाव, असा सूर कर्मचारी संघटनांत उमटत आहे. त्यामुळे शिवशाहीचे कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांत अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचे दिसते.  

एसटी महामंडळाने ६५ वर्षे राज्याच्या कानाकोपऱ्यांत प्रवासी सेवा दिली. दहा वर्षांत खासगी प्रवासी वाहतूक वाढली. एसटीला समांतर स्पर्धा निर्माण झाली. अशात एसटीने स्वतः व काही वेळा सरकारी मदतीतून गाड्या घेतल्या. त्यामुळे दुर्गम वाड्या-वस्त्यांवर एसटी पोचली. दिवसाला ३६ हजार गाड्यांतून ७८ लाख प्रवासी वाहतूक होते. यातील बहुतांशी श्रेय एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना जरूर लाभले. 

दहा वर्षांत एसटी महामंडळाचा संचित तोटा एक हजार कोटींच्या पुढे गेला. यात शासनाकडून आर्थिक मदतही बंद झाली. अशा वेळी प्रवासी संख्या वाढली, एसटीच्या एकूण गाड्यांपैकी ३० टक्के गाड्यांची क्षमता संपली. तरीही योग्य ती डागडुजी करून एसटीतून सेवा दिली जाते. यात एसटीला पुरेसा नफा नाही, गाड्या घेण्यासाठी आर्थिक ऐपत नाही व शासकीय मदत नाही म्हणून एसटीने खासगी कंपनीकडून शिवशाही गाड्या घेतल्या. काही मोजक्‍या गाड्या स्वतः घेतल्या. 

शिवशाही गाड्या महामंडळाने चालविल्यास त्याचे स्वागत आहे; मात्र खासगी कंपन्यांकडून शिवशाही चालविण्यात येते. एसटीच्या आर्थिक महसुलावर ताण पडतो. याचा पुनर्विचार व्हावा. 
- उत्तम पाटील,

जिल्हाध्यक्ष, एसटी कर्मचारी संघटना

एसटीची सेवा चांगली आहे. शिवशाहीची सेवा आरामदायी, आलिशान व किफायतशीर दरात आहे. त्यामुळे ही सेवा एसटीनेच दिली तर आणखी 
बरे होईल. 
-प्रकाश काशीद,
प्रवासी

दृष्टिक्षेपात शिवशाही...

 

Web Title: Kolhapur News ShivShahi v/s Lal Pari ST Bus