काँग्रेसच्या शोभा बोंद्रे कोल्हापूरच्या नव्या महापाैर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

कोल्हापूर - महापौर निवडणूकीत शिवसेनेने तलवार म्यान केल्याने कॉंग्रेसच्या शोभा बोंद्रे यांच्या निवडीचा मार्ग आज मोकळा झाला. बोंद्रे यांनी त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी भाजप ताराराणी आघाडीच्या रुपाराणी निकम यांचा 44 विरूद्ध 33 मतांनी पराभव केला.

कोल्हापूर - महापौर निवडणूकीत शिवसेनेने तलवार म्यान केल्याने कॉंग्रेसच्या शोभा बोंद्रे यांच्या निवडीचा मार्ग आज मोकळा झाला. बोंद्रे यांनी त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी भाजप ताराराणी आघाडीच्या रुपाराणी निकम यांचा 44 विरूद्ध 33 मतांनी पराभव केला. उपमहापौर निवडीतही हीच आकडेवारी कायम राहिली. राष्ट्रवादीचे महेश सावंत यांनी विरोधी कमलाकर भोपळे यांचा याच मतांच्या फरकाने पराभव केला. महापौर पदासाठी महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. कॉंग्रेसच्या वाट्याला सहा महिन्यांसाठी पद आले आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षततेखाली निवडीची प्रक्रिया पार पाडली. फोडोफोडीच्या राजकारणामुळे गेल्या पंधरा दिवसापासून महापौर कॉंग्रेसचा होता की विरोधी आघाडीचा याकडे लक्ष लागून राहिले होते.

शिवसेनेतर्फे प्रतिज्ञा निल्ले यांनी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र उमेदवार वगळता अन्य तीन सदस्य नियाज खान, अभिजीत चव्हाण. राहूल चव्हाण हे महापालिकेकडे फिरकलेही नाहीत. माघारीच्या मुदतीत अवघ्या दूसऱ्या मिनिटाला निल्ले यांनी अर्ज सादर केला. नंतर त्या सभागृहातून निघूनही गेल्या. पंधरा मिनिटांनंतर बोंद्रे व निकम यांचा अर्ज कायम राहिला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हात उंचावून मतदानाची प्रक्रिया जाहीर केली.

प्रारंभी रुपाराणी निकम यांच्या बाजूने हात उंचावले गेले. त्यांच्या बाजूने 33 मते पडली. नंतर सत्तारूढ कॉग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने हात उंचावले गेले. बोंद्रे यांना 44 तर निकम यांना 33 मते पडल्याने बोंद्रे या विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. स्थायी समिती सभापती निवडीवेळी फुटलेले राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्‍य चव्हाण यांनी बोंद्रे यांच्या बाजूने मतदान केले.

पिरजादे हे काॅंग्रेससोबत सहलीवर होते. तर चव्हाण हे कोल्हापुरात होते. सत्तारूढ गटाचे सदस्य दाखल होण्यापूर्वी या दोघांनाही प्रारंभी महापालिकेत आणण्यात आले. नंतर आमदार सतेज पाटील यांनी महापौर तसेच उपहमहापौरांच्या गाडीचे सारथ्य केले त्यांना मुख्य दरवाज्यापर्यंत आणले. 

उपमहापौर निवडीत फुटलेले दोन सदस्य कोणाच्या बाजूने राहतात याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र यावेळेही ते सत्तारूढ गटाच्या बाजूने राहिले. शिवसेनेतर्फे अभिजीत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज होता. चव्हाण यांनी निल्ले यांच्यामार्फत माघारीचे पत्र दिले. मात्र विहीत नमुन्यात दाखल न झाल्याने हा अर्ज कायम राहिला. विरोधी आघाडीचे कमलाकर भोपळे यांच्या बाजूने 33 तर सत्तारूढ गटाचे महेश सावंत यांच्या बाजूने 44 हात उंचावले गेले. मतमोजणी सुरू असताना विरोधी आघाडीच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी अटकाव केला. तत्पुर्वी विषयपत्रिकेचे वाचन प्रभारी नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी केली. त्यांनी गणसंख्या झाल्याने सभेचे कामकाज सुरू होत असल्याचे सांगताच त्यास संभाजी जाधव यांनी आक्षेप घेतला. महापौर निवडीची सभा असल्याने गणसंख्येच्या अटीची गरज नाही त्यामुळे शब्द मागे घ्यावा असे सांगितले. 

दरम्यान महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या परिसरात सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ओळखपत्राशिवाय प्रवेश नाकारला गेला. महापौर पालिकेच्या बाहेर पडेपर्यंत हा बंदोबस्त कायम होता. 

थेट पाईपलाईनचे काम मार्गी लावणार - बोंद्रे 
थेट पाईपलाईनचे रखडलेले काम मार्गी लावणार असल्याचे शोभा बोंद्रे यांनी सांगितले. डेगींच्या साथीने कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. साथ आटोक्‍यात येण्यासाठी अधिकाऱ्यांसह संबंधित भागात भेट देऊन उपाययोजना केल्या जातील. प्रलंबित कामेही मार्गी लावणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान बोंद्रे या महापालिकेच्या 44 व्या महापौर आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. जन्म कसबा तारळे येथे झाला. 

ऋतुराज पाटील सक्रीय 
आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे घडामोडीत सक्रीय होते. आजही ते महापालिका परिसरात थांबून होते. महापौरांच्या निवडीनंतर त्यांनी सभागृहात येऊन अभिनंदन केले. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुत्र. जि. प. सदस्य राहूल पाटील यांनीही नूतन महापौरांचे अभिनंदन केले. 
 

Web Title: Kolhapur News Shobha Bondre new Mayor of Kolhapur