पदोन्नती, सेवाज्येष्ठतेची कागदपत्रे दाखवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

सकल मराठा, मागासवर्गीय संघटनांची मागणी; बैठकीत शाब्दिक चकमक, २८ ला पुन्हा बैठक

सकल मराठा, मागासवर्गीय संघटनांची मागणी; बैठकीत शाब्दिक चकमक, २८ ला पुन्हा बैठक

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील पदोन्नती व सेवाज्येष्ठता याद्यांच्या कागदपत्रांची मागणी सकल मराठा समाजासह मागासवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधींनी आज केली. बिंदुनामावलीकरिता गठित केलेल्या समितीच्या बैठकीत शाब्दिक चकमकही झाली. सकल मराठा समाजाने १९९७, तर मागासवर्गीय संघटनेने १९६४ पासूनच्या पदोन्नती व सेवाज्येष्ठता कागदपत्रांचा अभ्यास करूनच बैठक घेण्याचा पवित्रा घेतला. दोन्ही समाजांतील घटकांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका घेत मराठा व मागासवर्गीय समाजातील घटकांनी सुज्ञपणाही दाखवला. दरम्यान, समितीने विद्यापीठ प्रशासनाकडून २० ऑगस्टपर्यंत कागदपत्रे घेऊन २८ ऑगस्टला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेतला. 

सकल मराठा समाजाचे बाबा इंदूलकर यांनी ‘यापूर्वी समितीने घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त का दिले नाही,’ अशी विचारणा केली. आजच्या बैठकीत कोणी काय बोलायचे हे ठरविले असल्याचा आरोप केला. शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे संजय पसारे यांनी ‘प्रशासनाच्या दबावापोटी बैठक का घेता,’ तर शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे एस. के. मोरे यांनी ‘गेल्याच बैठकीत पदोन्नती प्रकरणाची कागदपत्रे का दिली नाहीत?’ असा प्रश्‍न केला. 

सहायक कुलसचिव संजय कुबल यांनी बैठकीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी ‘२०१० मध्ये भरतीमध्ये आरक्षण कुठले चुकले, याचा अहवाल तयार करण्यासाठी उपकुलसचिवांची समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल सादर करत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची सूचना केली होती.

समितीचे रोस्टर समाजकल्याण व शासनाने मंजूर केले होते,’ असे सांगितले. ‘अहवालाची कार्यवाही का केली नाही,’ असा प्रतिप्रश्‍न इंदुलकर यांनी केला. ‘आस्थापना विभागात अधिकारी कोण होते, त्यांच्या कारकिर्दीत किती प्रकरणे प्रलंबित राहिली,’ याची माहिती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेचे महासचिव राजेंद्र कांबळे यांनी केली. 

समितीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. राऊत यांनी समितीच्या बैठकीच्या स्थापनेचा आढावा घेताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या २ एप्रिल २०१७ ला आलेल्या पत्राचा उल्लेख केला. तसेच शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटना, ॲड. सतीश नलवडे यांची पदोन्नती व सेवाज्येष्ठतेसंदर्भात पत्रे आली असल्याचेही सांगितले. त्यावर ‘ॲड. नलवडे यांना बैठकीला का बोलावले नाही,’ अशी विचारणा इंदूलकर यांनी केली. फत्तेसिंह सावंत यांनी नलवडे यांना पत्र पाठवले नसल्याचे निदर्शनास आणून देत, ‘बैठकीत जिल्हा कोषागार व जिल्हा परिषदेतील लोकांना का बोलावले,’ असा प्रश्‍न केला. इंदूलकर यांनी तत्काळ नलवडे त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत ‘पत्र पोचले का,’ असे विचारले. नलवडे यांनी पत्र आले नसल्याचे स्पष्ट केले. ‘नलवडे यांना स्वतंत्रपणे पत्र का दिले नाही,’ अशी विचारणा करत, सेवाज्येष्ठता याद्यांसंदर्भातील कागदपत्रांसाठी पैसे भरणार नसल्याचे इंदूलकर यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी कास्ट्राईबचे आनंद खामकर, शिवाजी विद्यापीठ मागासवर्गीय संघाचे टी. सी. घाटगे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे देवेंद्र कांबळे, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. नमिता खोत, कर्मचारी संघाचे सुनील देसाई, डॉ. वैभव ढेरे, दीपक काशीद, ए. ए. रेडेकर उपस्थित होते. 
 

कागदपत्रे खुली करा
श्री. पसारे म्हणाले, ‘‘सेवाज्येष्ठता याद्या अंतिम नसतील, तर सर्व निरर्थक आहे. भविष्यात मागासवर्गीयांसह मराठा समाजावर अन्याय नको, अशी सकल मराठा समाजाचा घटक म्हणून आमची मागणी आहे. पदोन्नतीसंदर्भात ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांची कागदपत्रे खुली करा.’’

दुहेरी भूमिका नको...
श्री. कुबल यांनी प्रशासनाकडून मागवलेली कागदपत्रे नेण्यासाठी एक ट्रक आणावा लागेल, असे सांगितले. त्यावर इंदुलकर यांनी त्यांना तुम्ही प्रशासनाच्या बाजूचे असाल, तर तशी भूमिका घ्या. दुहेरी भूमिका का घेता, असा प्रश्‍न करत कुलगुरूंना दौरे थांबवून या प्रश्‍नात लक्ष घालण्यास सांगा, असे सांगितले.

इंदुलकर यांनी केलेल्या मागण्या...
सुवर्णमहोत्सवी वर्षातील ६० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीची जाहिरात
ज्यांनी पदांसाठी अर्ज केले; त्यांची नावे, पत्ता, प्रवर्ग यांसंदर्भातील माहिती
भरती प्रक्रिया रद्द करण्याचे कारण 
स्पेशल सेलच्या फॉर्मेशनची माहिती
सेलमधील सदस्यांची प्रवर्गनिहाय नावे

Web Title: kolhapur news Show promotion, service registration documents