श्रवणबेळगोळला आज भव्य शोभायात्रा

संजय खूळ
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

श्रवणबेळगोळ -  येथे शनिवारपासून (ता. १७) होणाऱ्या भगवान बाहुबली मूर्तीवरील महामस्तकाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. तब्बल ५० किलोमीटर परिसरातील सर्व प्रमुख रस्ते सुशोभित केले आहेत. दरम्यान, आज (ता. १६) भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

श्रवणबेळगोळ -  येथे शनिवारपासून (ता. १७) होणाऱ्या भगवान बाहुबली मूर्तीवरील महामस्तकाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. तब्बल ५० किलोमीटर परिसरातील सर्व प्रमुख रस्ते सुशोभित केले आहेत. दरम्यान, आज (ता. १६) भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

बारा वर्षांनंतर होणाऱ्या महामस्तकाभिषेकाचा मुख्य अभिषेक हे मुख्य आकर्षण आहे. विंध्यगिरी पर्वतावरील या मूर्तीजवळ जाण्यासाठी धारकांना प्रथमच लिफ्टची सोय आहे. मूर्ती परिसर आकर्षक सजविला आहे. महोत्सवाची १२ वर्षे लाखो भाविक आतुरतेने वाट पाहत असतात, तो क्षण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. शनिवारी पहाटे ५ ते दुपारी २ पर्यंत विधी विधान होणार आहे. प्रथम महामस्तकाभिषेकामधील जलाभिषेक दुपारी २ ते ३.३० पर्यंत होईल. दुपारी ३.३० ते ५.३० पर्यंत पंचामृत अभिषेक, ५.३० ते ६ अष्टद्रव्य पूजा, त्यानंतर महाआरती व भाविकांना दर्शनासाठी प्रवेश सुविधा देण्यात येणार आहे.

या महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या प्रथम अभिषेकाचा मान आर. के. मार्बलचे अशोक पाटणी यांच्या कुटुंबीयांना (किशनगड, राजस्थान) मिळाला आहे, अशी माहिती महामस्तकाभिषेक समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी दिली.

पंचामृत व अभिषेकामध्ये जलाभिषेक, नारळ पाणी, उसाचा रस, दूध, कनक चूर्ण, हळद पावडर, कषाय औषध द्रव्य, प्रथम कोन कलश ते चतुर्थ कोन कलश, चंदन, अष्टगंध, केसरवृष्टी, सुवर्णवृष्टी, रजतवृष्टी, पुष्पवृष्टी, पूर्णकुंभ आदी द्रव्यांचा वापर मस्तकाभिषेकासाठी होणार आहे.

सांगलीचे योगदान
या महोत्सवासाठी सांगली ट्रेडर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून यात्रेकरूंना ५०० बकेट, १००० मग, ३०० स्टूल, २०० खुर्च्या व ४०० रूम साठी लागतील, अशा अन्य सोयी देऊ केल्या आहेत. ट्रेडर्स सोसायटी सलग २५ वर्षे अशी सेवा देत आहेत.

Web Title: Kolhapur News shravanabelagola mahamastakabhisheka special