घरच्यांचा पाठिंबा हेच मोठं बळ - श्रेयस तळपदे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

कोल्हापूर - घरच्यांचा पाठिंबा हे मोठं बळ असतं. पोरांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान एक चान्स तरी दिलाच पाहिजे आणि त्याचवेळी या संधीचं सोनं करून पोरांनी पालकांचा विश्‍वास सार्थ ठरवला पाहिजे, असे मत आज अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर - घरच्यांचा पाठिंबा हे मोठं बळ असतं. पोरांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान एक चान्स तरी दिलाच पाहिजे आणि त्याचवेळी या संधीचं सोनं करून पोरांनी पालकांचा विश्‍वास सार्थ ठरवला पाहिजे, असे मत आज अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले.

सुमारे पावणेदोन तासांच्या या संवादात त्यांनी सकारात्मक ऊर्जेची बीजं मनामनांत रोवली. निमित्त होतं, सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित फिझिंगा - संजय घोडावत ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी’ या कार्यक्रमाचं. श्रेयस तळपदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दिमाखदार उद्‌घाटन झाले आणि या मालिकेतील पहिले पुष्प गुंफताना त्यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवादही साधला. योगेश देशपांडे यांनी हा संवाद आणखी खुलवला. 

आजचे संवाद
भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री शेखर नाईक आज (रविवारी) सदोदित गतीचे गीत गाण्याची ऊर्जा देणार आहेत. त्याशिवाय रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा सामाजिक, आर्थिक, पर्यावरणाचा नवविचार देणार आहेत. अंधत्व असूनही नाईक यांची आजवरची प्रेरणादायी वाटचाल आणि मिश्रा यांचे ग्रामविकासाचे नवे मॉडेल यानिमित्तानं उलगडणार आहे. प्रत्येक संवादाचे फेसबुकवरून लाईव्ह प्रसारण होणार आहे. हा संवाद अनुभवण्यासाठी लिंक करा-www.facebook.com/kolhapursakal
 

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. आर. व्ही. गुरव, फिझिंगा - संजय घोडावत ग्रुपतर्फे क्‍लायमॅक्‍स ॲडव्हर्टाईजचे उदय जोशी, हॉटेल सयाजीचे ऋतुराज पाटील, चाटे शिक्षण समूहाचे संचालक डॉ. भारत खराटे, मार्व्हलस इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संग्राम पाटील, तनिष्क ज्वेलर्सचे जय कामत आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन झाले. शाळेतील आठवणींनी श्रेयस तळपदे यांच्याशी संवादाला प्रारंभ झाला. ते म्हणाले, ‘‘शाळेत असताना 

नाटकाचं वेड फारसं नव्हतं; मात्र, आठवीला असताना एकदा आईने ‘करार’ या नाटकाला नेलं आणि नाटकाची जादू पाहून प्रेमातच पडलो. शाळेत लघुनाटिकेत सहभागी होऊ लागलो. पहिली भूमिका अगदी अनपेक्षितपणे मिळाली आणि ती होती सीतेची. दुसऱ्या वर्षी मग ‘मॉडर्न महाभारत’मध्ये द्रौपदीची भूमिका केली. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढत गेला. दहावीनंतर थोरल्या भावाने शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट प्रशिक्षणाला पाठवले. क्रिकेटही चांगले खेळू लागलो. मात्र, कॉलेजला गेल्यानंतर जाणीवपूर्वक क्रिकेट थांबवून नाटकांवर लक्ष केंद्रित केले.’’

नाटक, सीरियलमध्ये छोटी छोटी कामं मिळत होती; पण अपेक्षित कामं मिळत नव्हती. ‘आभाळमाया’ सीरियलच्या निमित्तानं संधी मिळाली आणि तिचं सोनं केलं. इथूनच मग स्वतंत्र ओळख मिळत गेली. ‘इकबाल’ चित्रपटातील लीड रोलचा प्रवास तर रंजकच आहे. काय काम आहे हे माहिती नसतानाही ऑडिशन दिली. वारंवार ऑडिशन झाल्या आणि दोन महिन्यांच्या तारखा बुक केल्याचे प्रॉडक्‍शन हाऊसने सांगितल्यावर एवढ्या छोट्याशा रोलसाठी दोन महिने, असा प्रश्‍न विचारला. त्यावेळी तो लीड रोल असून दोन महिने शूटिंग चालणार असल्याचे समजले, असेही श्रेयस यांनी सांगितले. ‘ओम शांती ओम’ आणि शाहरूख खान, ‘गोलमाल’ आणि अजय देवगण यांच्या मैत्रीचे पदरही त्यांनी उलगडले.  
दरम्यान सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले,

‘‘बातम्यांपलीकडेही समाजाच्या गरजा ओळखून सकाळ माध्यम समूहाने विविध उपक्रम सुरू केले. खास तरुणाईसाठी ‘ऊर्जा’ हा उपक्रम असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे मोठे सहकार्य आहे.’’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही शुभेच्छापर बोलताना अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. 

शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य 
‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या उपक्रमाला गेली चार वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 
विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मुलाखती होतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था केली आहे. कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असून, मोफत सन्मानिकाही उपलब्ध आहेत.   

प्रायोजकांविषयी... 
० सहप्रायोजक ः चाटे शिक्षण समूह, मार्व्हलस इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, तनिष्क ज्वेलर्स, 
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, श्री ट्रॅव्हल्स 
० हॉस्पिटॅलिटी पार्टनर ः हॉटेल सयाजी 
० रेडिओ पार्टनर ः रेडिओ सिटी 

श्रेयस सक्‍सेस मंत्राज्‌
० काम छोटे असो किंवा मोठे ते प्रामाणिकपणे करा. कामाशी प्रतारणा नकोच.
० शिक्षण संपते; तेव्हा माणूस संपतो. मनातील लहान मूल जिवंत ठेवा. शिकत शिकत मोठे होत राहाल.
० अभिनेत्याचे सकाळी डोळे उघडतात; तेव्हापासून रियाज सुरू होतो. तो रात्री झोपतो, तेव्हाच रियाज संपतो.
० चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी रंगभूमी मस्टच. हे ‘फाऊंडेशन’ मजबूत करा. पुढे कसलीच अडचण येणार नाही.
० सिनेमा म्हणजे केवळ ॲक्‍टिंग नव्हे. एक सिनेमा बनताना तब्बल साडेतीनशे जॉब उपलब्ध असतात. भरपूर संधी आहेत त्यांचं सोनं करा.
० रोज सात ते आठ तास झोप, संतुलित आहार व नियमित व्यायाम आवश्‍यकच. 

अनुकरणीय उपक्रम
श्रेयस तळपदे यांचं टाळ्या आणि शिट्यांच्या खास कोल्हापुरी स्टाईलमध्ये स्वागत झाले. कोल्हापूरची माणसं इतकी गोड असतात, की ‘ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर’ असं सांगितलं तरी ते थोडी का होईना साखर घालतातच. शिवाजी विद्यापीठातील नो व्हेईकल डे, बुकेऐवजी राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र, ‘ऊर्जा’सारखा उपक्रम व झाडाला पाणी घालून उद्‌घाटन या साऱ्या गोष्टी अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. 

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गाठले हैदराबाद
‘इकबाल’च्या शूटिंगचे नियोजन एक जानेवारीपासून होणार होते आणि ३१ डिसेंबरला लग्न होते. लग्न आटोपून पत्नीसह दुसऱ्या दिवशी हैदराबाद गाठले. वीस दिवस प्रॅक्‍टिस सुरू होती आणि दररोज झपाटून काम करीत होतो. रात्री घरी परतल्यावर ताप यायचा. पत्नी गोळ्या द्यायची आणि रात्रभर डोक्‍यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायची. तिचा मोठा आधार होता म्हणूनच त्यावेळी टिकलो आणि आजही पाय घट्ट रोवून उभे असल्याचे श्रेयस तळपदे यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Shreyas Talpade in Urja Event