होमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी प्रयत्नशील - श्रीपाद नाईक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

कोल्हापूर - ""होमिओपॅथीचा विविध शासकीय योजनांत समावेश करण्याबरोबर अन्य पॅथीप्रमाणे होमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे प्रयत्न करण्यात येतील'', असे आश्‍वासन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. 

कोल्हापूर - ""होमिओपॅथीचा विविध शासकीय योजनांत समावेश करण्याबरोबर अन्य पॅथीप्रमाणे होमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे प्रयत्न करण्यात येतील'', असे आश्‍वासन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. 

कावळा नाका येथे मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च सेंटर अँड ट्रिटमेंट सेंटरचे आज नुतन वास्तूत स्थलांतर झाले. सेंटरच्या नुतन वास्तूचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. महापौर सौ. स्वाती यवलुजे, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री श्री. नाईक म्हणाले, ""200 वर्षांपूर्वी ही होमिओपॅथी जर्मनीतून भारतात आली. सर्व भारतीयांनी ही पॅथी स्वीकारली. ही पॅथी वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय चांगली असून रोगाचे समुळ उच्चाटन करते. ही पॅथी अनेक रोगांवर सहायभूत ठरली आहे. ऍलोपॅथी विकसित राष्ट्रांनी आपल्या देशात आणली. या पॅथीसाठी ते मोठे निधी देतात. प्रचार आणि प्रसार करतात. आपल्या नॅचरोपॅथी, आयुर्वेदाबरोबर होमिओपॅथीलाही प्रोत्साहन देण्यासंदर्भात आयुष मंत्रालय प्रयत्न करत आहे. जगभरातील 15 विद्यापीठे, 12 देशांमध्ये आम्ही आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी विविध करार केले आहेत. यामध्ये अन्य पॅथीप्रमाणेच होमिओपॅथीचाही समावेश आहे. देशातील काही जिल्ह्यांत सुरु असलेल्या आरोग्याच्या मुख्य प्रकल्पांत ऍलोपॅथीसह नॅचरोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीही आहे.

शासनाच्या विविध आरोग्य योजनांसाठी असलेली हॉस्पिटलायझेशनची अट होमिओपॅथीला नसावी, याकरीता येत्या वर्षभरात प्रयत्न करण्यात येतील. आपल्या देशातील पॅथी, जीवनशैली, योग्य औषधांचा स्वीकार केल्यास आरोग्यदायी भारताचे स्वप्न साकारेल. होमिओपॅथी गावागावांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्‍टर्स, तंत्रज्ञ, यासंबंधी घटकांनी प्रयत्न केले.'' 

संस्थापक डॉ. विजयकुमार माने म्हणाले, ""1996 ला राजारामपुरीत दहा बाय आठच्या खोलीत आम्ही होमिओपॅथीची प्रॅक्‍टिस सुरु केली. 22 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आज नुतन वास्तूत स्थलांतर केले. सर्व प्रकारचे कॅन्सर, किडनीसंबंधी आजार, मेंदूविकार आणि कंपवात, हृदयविका, लिव्हरसंबंधित आजार, थायरॉईडसारख्या आजारात यशस्वी उपचार केले. भारत आणि भारताबाहेर आमच्या सेंटरच्या शाखा होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याद्वारे गरीब रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार देण्यात येतील. विविध शासकीय योजनांमध्ये होमिओपॅथीचा समावेश करावा, यासाठी शासनाने साह्य करावे.'' 

आमदार डॉ. मिणचेकर म्हणाले, ""होमिओपॅथीलाही अन्य पॅथीप्रमाणे शासनाने 50 टक्के अनुदान द्यावे. ही पॅथी भारतात यशस्वी होते आहे.''

महापौर सौ. यवलुजे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापकीय संचालक प्रेमकुमार माने यांनी आभार मानले. सौ. विमल माने, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. श्रीधर पाटील, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. शिरीष पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. विकास मोहिते तसेच माने कुटुंबिय उपस्थित होते. 
 

Web Title: Kolhapur News Shripad Naik comment