दिव्यांग विद्यार्थ्यांना सहा हजारांची शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  शहरातील साडेपाचशे दिव्यांग विद्यार्थ्यांना महिन्याला पाचशे रुपयांप्रमाणे वर्षाला सहा हजारांची शिष्यवृत्तीची मदत मिळणार आहे. महापालिका दिव्यांग समितीने ३६ लाखांची तरतूद केली आहे. मनपा प्राथमिक शिक्षण समिती त्याची अंमलबजावणी करेल.  

कोल्हापूर -  शहरातील साडेपाचशे दिव्यांग विद्यार्थ्यांना महिन्याला पाचशे रुपयांप्रमाणे वर्षाला सहा हजारांची शिष्यवृत्तीची मदत मिळणार आहे. महापालिका दिव्यांग समितीने ३६ लाखांची तरतूद केली आहे. मनपा प्राथमिक शिक्षण समिती त्याची अंमलबजावणी करेल.  

पहिली ते बारावीपर्यंतच्या अपंग विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच अशी मदत मिळेल. प्राथमिक, खासगी, माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमासह अन्य माध्यमांत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या साडेपाचशे असल्याचे सर्व्हेतून पुढे आले. विद्यार्थ्यांचे पालक तारेवरची कसरत करून शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. 

मुलांना शाळेत पाठविणे, तसेच त्यांचा अभ्यास आणि फी स्तरावर पालकांची कोंडी होती. एखाद्या अपंग मुलाच्या देखभालीसाठी किती हाल सहन करावे लागतात, याची जाणीव पालकांपेक्षा अन्य कुणाला नसावी. मायेच्या उबेने ही मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना थोडा तरी आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने तब्बल ३६ लाख रुपये दिव्यांग समितीने मंजूर केले. प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला पाचशे रुपये देण्यापेक्षा एकाच वेळी सहा हजारांची रक्कम दिली जाईल. त्यातून या मुलांचा किमान शैक्षणिक खर्च तरी बाहेर 
पडेल.

महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकाच्या तीन टक्के रक्कम अपंगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. सज्ञान दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात; मात्र जे दिव्यांग विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाचे धडे घेत आहेत, त्यांच्याही आर्थिक स्थितीचा विचार करायला हवा. सर्व्हेत साडेपाचशे विद्यार्थी दिव्यांग आढळले. आणखी काही विद्यार्थी असतील तर त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी जाहीर आवाहन केले जाईल. शाळांनी त्यास प्रतिसाद द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना लाभ होईल.

एकावेळी सहा हजार मिळाले तर त्यांचा उत्साह अधिक वाढेल, या हेतूने सर्वच माध्यमातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. मनपा शिक्षण समितीने प्रस्ताव तयार करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. आठवडाभरात प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करणार आहे.
- विश्‍वास सुतार, 
प्रभारी प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण समिती.

Web Title: Kolhapur news six thousand scholarship to handicap student