सामाजिक ऐक्‍याच्या पुण्याईनेच अनर्थ टळला

सामाजिक ऐक्‍याच्या पुण्याईनेच अनर्थ टळला

कोल्हापूर - केवळ कोल्हापूरच्या सामाजिक ऐक्‍याची पुण्याई म्हणून आज चिमासाहेब चौक ते सिद्धार्थनगर परिसरातील मोठा अनर्थ टळला. एकमेकांवर समोरासमोरून होणारी दगडफेक, एकमेकांच्या दिशेने त्वेषाने जाण्याचा प्रयत्न व मधल्या मध्ये पोलिसांची कसरत अशा अवस्थेत हा परिसर तासभर धुमश्‍चक्रीने तंग झाला.

जात व धर्म या नाजूक भावनांत लाठीमाराचा निर्णय घेण्यात पोलिसांना उशीर झाल्याने दोन्ही बाजूंनी अक्षरशः दगडांचा वर्षाव झाला. काही वेळानंतर मोठा अनर्थ घडणार याचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला; मात्र काही अंतरावर पुन्हा एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देत जमाव थांबून राहिला.

सिद्धार्थनगर परिसरात घुसण्यासाठी जवळजवळ हजारभर तरुणांनी प्रयत्न केला; पण पोलिसांनी तो रोखला; मात्र आक्रमक तरुण, त्या तुलनेत अपुरी पोलिस संख्या; यामुळे थांबून थांबून दगडफेक होत राहिली. आसपासच्या वाहनांचा चकनाचूर झाला. शहरातील भेंडे गल्ली, गुजरी, महालक्ष्मी मंदिर परिसर व शाहूपुरीच्या दुसऱ्या गल्लीत थांबलेल्या वाहनांवर सिद्धार्थनगरातील तरुणांनी दगडफेक केल्याच्या समजुतीने हा जमाव सिद्धार्थनगरच्या दिशेने घुसला. मोर्चाशी, दगडफेकीशी आपल्या परिसरातील कोणाचाही संबंध नसल्याने आमच्यावर हल्ला करू नका, असे काही महिला धाडसाने पुढे येऊन सांगत होत्या; पण जमावातील तरुण ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी सिद्धार्थनगर कमानीवर दगडफेक केली.

दलित संघटनांनी कोल्हापूर बंदचे आवाहन केल्यानंतर शहर पूर्णपणे बंद झाले होते. काही तरुण गटागटाने शहरातून फिरत होते; पण शाहूपुरी व महाद्वार परिसरात थोडा अतिरेक झाल्याने प्रतिमोर्चा काढण्यासाठी जमलेले संघटनांचे कार्यकर्ते गटागटाने शिवाजी चौकात जमू लागले. पाहता-पाहता भगव्या झेंड्यासह आलेल्या कार्यकर्त्यामुळे सारा चौक भरून गेला. या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर, माजी उपमहापौर रवीकिरण इंगवले यांना पोलिसांनी शांतता ठेवण्याची विनंती केली; पण त्यांनी आपला बंदला विरोध नसून, बंदचे आवाहन करत फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या अतिरेकाला विरोध असल्याचे सांगितले. या वेळपर्यंत जमाव इतका वाढला, की त्याला मोर्चाचेच स्वरूप आले. हा मोर्चा शिवाजी रोडमार्गे बिंदू चौकात आला. त्या वेळी तेथे बंदचे आवाहन करणाऱ्यांची दुचाकी वाहने होती.

या वाहनांचा जमावाने चकनाचूर केला. तेथून हा जमाव लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, गोकुळ हॉटेल, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, शिवाजी चौकात परत आला. हा जमाव दुकाने उघडण्याचे आवाहन करत होता. याच वेळी लक्ष्मीपुरी पोलिस लाइनसमोर बंदचे समर्थन करणारे काही तरुण जमा झाले होते. त्यांना पाहून त्यांच्या दिशेने जमाव चालून जाऊ लागला. त्या वेळी दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक सुरू झाली. त्याची झळ आसपासच्या वाहनांनाही बसली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रस्त्यात मध्ये मोठी व्हॅन लावली व काही पोलिसांनी बंद समर्थकांना लाठीमार करून दसरा चौकाच्या दिशेने व इतरांना अयोध्या चित्र मंदिराच्या दिशेने पांगवले. तेथेच या तरुणांचे दोन-तीन गट पडले. एक गट लक्ष्मीपुरी शाहूपुरीत, दुसरा गट रेल्वे स्टेशनकडे; तर तिसरा गट चिमासाहेब चौकाकडे गेला. ते दुकाने उघडण्याचे आवाहन करत होते; पण दुकाने उघडायला कोणीच नसल्याने पुढे पुढे जात होते. गोकुळ हॉटेलजवळ एका गटाने मोटारसायकल पेटवून दिली. पुन्हा तिन्ही गट शिवाजी चौकांत एकत्र आले.

या वेळी शिवाजी पुतळ्याजवळ चौथऱ्यावर आमदार राजेश क्षीरसागर, माजी उपमहापौर रवी इंगवले, नगरसेवक नियाझ खान, राहुल चव्हाण, स्वप्नील पार्टे यांनी सर्वांना शिवाजी चौकात बसण्याचे आवाहन केले. काही कार्यकर्ते बसलेही. तेवढ्यात पाठीमागचा एक मोठा गट सी. पी. आर. हॉस्पिटलच्या दिशेने व त्यापाठोपाठ इतर तरुणही धावत सुटले. सी.पी.आर.समोर करवीर पंचायत समितीजवळ बंदचे काही समर्थक उभे होते. 

ते व जमाव समोरासमोर आल्याने दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक सुरू झाली. शिवसेना व इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते न्यायालयासमोरच; तर बंद समर्थक चिमासाहेब चौकातून दगडफेक करत होते. हा क्षण खूप तणावाचा होता. कारण अवघ्या काही पावलांवर सिद्धार्थनगर परिसर होता. जमावाच्या तुलनेत पोलिस बंदोबस्त संख्येने कमी होता. याचाच फायदा घेत मोठा जमाव सिद्धार्थनगर कमानीच्या दिशेने धावला. त्याच वेळी सिद्धार्थनगरातील तरुण व महिलाही कमानीजवळ येऊन आपल्या परीने प्रतिकार करू लागल्या. आपला मोर्चाशी संबंध नाही असे सांगू लागल्या; पण ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणी नव्हते. सुमारे हजार-दोन हजारांचा जमाव कमानीच्या दिशेने घुसत होता. काही जणांनी ध्वज उचकटण्याचा प्रयत्न केला; पण पोलिस निरीक्षक सावंत, प्रशांत शिंदे हा तरुण व अन्य दोघातिघा कार्यकर्त्यांनी ध्वजाला आधार दिला.

त्याच वेळी परिस्थिती हाताबाहेर जाणार हे लक्षात येताच पोलिसांनी दोन्ही बाजूंनी लाठीमार सुरू केला व जमावाला पांगविले. केवळ काही क्षणांत हे घडल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र नर्सरी, शिवाजी मंदिर, आंबेडकर सांस्कृतिक हॉल या दिशेने लपूनछपून दगडफेक सुरूच राहिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना दूरवर पांगवले. आमदार क्षीरसागर, रवी इंगवले चिमासाहेब चौकाच्या कट्ट्यावर जमावासमोर थांबून राहिले; तर सिद्धार्थनगर येथील महिला पोलिसांना जाब विचारत कमानीजवळच थांबून राहिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com