ज्येष्ठ पत्रकार सोपान पाटील यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

कोल्हापूर - "सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीचे स्थापनेपासूनचे साक्षीदार व कोल्हापूर भूषण ज्येष्ठ पत्रकार सोपान बापूसाहेब पाटील (वय 63, रा. नाथागोळे तालीम परिसर, शिवाजी पेठ) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

कोल्हापूर - "सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीचे स्थापनेपासूनचे साक्षीदार व कोल्हापूर भूषण ज्येष्ठ पत्रकार सोपान बापूसाहेब पाटील (वय 63, रा. नाथागोळे तालीम परिसर, शिवाजी पेठ) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

कोल्हापूरच्या पत्रकारितेत श्री. पाटील यांची "दादा' अशी ओळख होती. त्यांनी दैनिक "सत्यवादी'तून पत्रकारितेस सुरवात केली. "सकाळ' कोल्हापूरमध्ये ते 1980 ला रूजू झाले. त्यांनी बातमीदार, मुख्य बातमीदार, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहिले. राजकीय बातमीदार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यांचा अफाट लोकसंग्रह होता. नेते ते कार्यकर्ते असा त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. त्यांनी कोणाची भीड न बाळगता पत्रकारिता केली. "अजातशत्रू' असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. राजकारण व सहकार क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे अंदाज प्रमाण मानले जायचे. चालता-बोलता शब्दकोश असेही त्यांचे वर्णन करता येऊ शकते. विधीमंडळाच्या कामकाजाचे वार्तांकनही त्यांनी प्रदीर्घ काळ केले. 

जकातीचे 1997 ला खासगीकरण झाल्यानंतर जकातीचा ठेका फेअरडील कंपनीने घेतला होता. फेअरडीलच्या विरोधात त्यांनी निर्भयपणे वार्तांकन केल्याने त्यांना धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कोल्हापुरात त्यांच्या बाजूने जनआंदोलन उभे राहिले आणि फेअरडीलल गाशा गुंडाळावा लागला. "सकाळ'ची सांगली आवृत्ती सुरू झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सांगलीमध्ये देखील राजकीय बातमीदार म्हणून ओळख निर्माण केली. कोल्हापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. कोल्हापूर महानगरपालिकेने त्यांचा कोल्हापूर भूषण पुरस्काराने गौरव केला होता. त्यांनी महापालिकेचा चालता-बोलता इतिहास महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तमालिकेतून प्रसिद्ध केला. पुढे याचे रूपांतर "खेळ मांडियेला' पुस्तकात झाले. कुस्ती मैदानाचे वार्तांकन करण्यात त्यांचा हातखंडा होता. पत्रकारितेत त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना घडविले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू पत्रकार हरपल्याची भावना व्यक्‍त होत आहे. 

Web Title: Kolhapur News Sopan Patil No more