कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सोयाबीन विक्रीत आर्द्रतेचा अडसर 

राजकुमार चौगुले 
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : सातत्याने पडणारा पाऊस सोयाबीन उत्पादकांसाठी अडचणीचा ठरत आहे. तातडीने सोयाबीनची काढणी करायची म्हटली तरी, आर्द्रतेमुळे त्याची विक्री कशी करायची याच चिंतेत सोयाबीन उत्पादक आहेत.

कोल्हापूर : सातत्याने पडणारा पाऊस सोयाबीन उत्पादकांसाठी अडचणीचा ठरत आहे. तातडीने सोयाबीनची काढणी करायची म्हटली तरी, आर्द्रतेमुळे त्याची विक्री कशी करायची याच चिंतेत सोयाबीन उत्पादक आहेत.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मिळून एक लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. या भागातील अनेक शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीस प्रारंभ करतात. उपलब्ध ओलाव्याचा आधार घेऊन पेरणी केली जाते. दोन्ही जिल्ह्यांत सुमारे पंधरा ते वीस टक्के सोयाबीनचे क्षेत्र आगाप म्हणजे मे महिन्याच्या अखेरीसच पेरणी केले जाते. यामुळे हे सोयाबीन सप्टेंबरपर्यंत काढणीस येते. ऑक्‍टोबर महिन्यात सातत्याने पाऊस असतो. यामुळे पावसाच्या अगोदर सोयाबीन काढणी करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. 

यंदा मात्र सगळी गणिते उलटी झाली आहेत. शिवारात सोयाबीन काढणीस तयार झाला आहे. पण गेल्या पंधरा दिवसांत सकाळी कडक उन्ह व सायंकाळी पाऊस अशीच काहीशी स्थिती आहे. दररोज पडणारा पाऊस, सोयाबीनच्या शेताचे झालेले तळे यामुळे गेल्या आठ दिवसांत सोयाबीन उत्पादकाची चिंता वाढू लागली आहे. कापणीस तयार झालेला सोयाबीनच्या शेंगा कडक उन्हामुळे शेतातच तडकत आहेत. पावसाने ओल्या झालेल्या शेतातच शेतकरी सोयाबीन काढणीच्या प्रयत्नात आहे. दुपारी एक दोन तास मिळणाऱ्या उन्हामध्ये मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. 

आर्द्रतेने शेतकरी मेटाकुटीला 
सातत्याने पाण्यात व पावसात राहिल्याने बहुतांशी सोयबीन ओलसर आहे. दररोजच्या पावसामुळे ते ठेवायचे कुठे हाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. आर्द्रता कमी असल्याच्या कारणाला मान्यता देत शेतकरी मिळेल त्या दराला सोयाबीन विक्रीचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे यंदा सोयाबीन उत्पादकाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नजीकच्या काही दिवसांत एकदम सोयाबीन बाजारात आल्यास दर आणखी घसरतील अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. 

खरेदी केंद्रे तातडीने सुरू होण्याची गरज 
गेल्या वर्षी जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासनाने किमान आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली. परंतु केंद्रे उशीरा सुरू झाल्यामुळे  शेतकऱ्यांनी या केंद्रांना फारसा प्रतिसाद दिला नाही. यंदाही ही केंद्रे तातडीने सुरू करण्याची गरज आहे. दर कमी मिळण्यात सोयाबीनमधील आर्द्रता ही मोठी बाब ठरत आहे. पणन विभागाकडूनही याबाबत अंदाज घेऊन केंद्रे सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. ती कधी सुरू होतील, याबाबत मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही.  

 

Web Title: Kolhapur News Soyabean harvesting