कोल्हापूरात वडापवाल्यांची दिवाळीच...तिप्पट-चौपट दर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदच्या हाकेने वडापवाल्यांची दिवाळी साजरी होत आहे. एसटीच्या तिकीट दरापेक्षा तिप्पट-चौपट दर आकारला जात आहे. खोळंबलेल्या प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. पुणे सातशे, बेळगाव चारशे, सांगली, निपाणी व आजरासाठी दोनशे रुपये तिकीट दर ऐकून प्रवाशांचा जीव मेटाकुटीस आला आहे. 

कोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदच्या हाकेने वडापवाल्यांची दिवाळी साजरी होत आहे. एसटीच्या तिकीट दरापेक्षा तिप्पट-चौपट दर आकारला जात आहे. खोळंबलेल्या प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. पुणे सातशे, बेळगाव चारशे, सांगली, निपाणी व आजरासाठी दोनशे रुपये तिकीट दर ऐकून प्रवाशांचा जीव मेटाकुटीस आला आहे. 

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वडापवाले प्रवाशांना मन मानेल, त्या पद्धतीने दर सांगत आहेत. पंधरा सीटर मिनी बस, मॅक्‍सी कॅबच्या चालकांत प्रवासी मिळविण्यासाठी चढाओढ आहे. संप कधी मिटेल याचा अंदाज नसल्याने प्रवासी मिळेल, त्या गाडीने गावी जात आहे. निपाणी, आजरा, गडहिंग्लज, सांगलीला जाण्यासाठी त्याला दीडशे-दोनशे रुपये मोजावे लागतात.

विशेष म्हणजे एसटीचा गडहिंग्लजचा तिकीट दर ७३, सांगली ५१, निपाणी ४६, बेळगाव ११४ रुपये असताना वडापवाल्यांचा तिप्पट-चौपट दर प्रवाशांची चिंता वाढवत आहे. उंब्रजला दीड हजार, तर नाला-सोपाराला थेट अडीच हजार रुपये सांगितले जातात. पुण्याचे तिकीट भलेही ३२० रुपये असेल, तरी खासगी वाहने प्रवाशांकडून पाचशे ते सातशे रुपयांची मागणी करत आहेत.

प्रवासी मुकाट्याने सांगेल तो दर देण्यास तयार आहेत. मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारातून आत येत संप कधी मिटेल, याची विचारणा प्रवाशांतून होत आहे. प्रवेशद्वारासमोरच वडापवाले थांबून आहेत. 
सोन्या मारुती चौकात पन्हाळा तालुक्‍याकडे जाणारे वडापवाले असून, काहींच्या तिकीट दरात मात्र जैसे थे, परिस्थिती आहे. पोर्लेला जाण्यासाठी त्यांच्याकडून पंधरा रुपये आकारले जात आहेत. कोंडाओळहून आदमापूरला पंचावन्न रुपये आकारले जात आहेत. तावडे हॉटेलच्या परिसरात उतरून शहरात खासगी वाहनाने प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना दोनशे रुपयांचा भुर्दंड बसत आहे. 

एक प्रवास असाही...
गडहिंग्लज येथील संदीप व पुष्पा धनवडे हे दांपत्य नाशिकमध्ये होते. थेट नाशिक ते कोल्हापूरमध्ये तेराशे रुपये खर्चात पोचले असते. मात्र, एसटीचा संप सुरू असल्याने त्यांना नाशिकमधून मनमाडला रेल्वेने जावे लागले. तेथून ते चंदीगड-बंगळूर संपर्क क्रांती रेल्वेमधून मिरजेला आले. मिरज ते कागवाड या तेरा किलोमीटरसाठी वडाप प्रवासासाठी त्यांनी शंभर रुपये मोजले. कागवाडमधून ते कर्नाटक बसने संकेश्‍वरला उतरले. त्यासाठी त्यांना एकशे वीस रुपये द्यावे लागले. तेथून नातेवाइकांच्या गाडीतून ते गडहिंग्लजला गेले. नाशिक ते कोल्हापूर हा साधारण दहा तासांचा प्रवास, पण त्यांना या प्रवासासाठी चोवीस तास लागले.

Web Title: Kolhapur News ST strike effects