शिवाजी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटला तातडीने सुरुवात झाली. ध्रुव कन्सल्टन्सीची टीम त्यासाठी कोल्हापुरात दाखल झाली असून पुलाच्या सद्यःस्थितीबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालावरच पुलावरील वाहतूक किंवा पुलाला आधार देण्याची गरज अधोरेखित होईल. 

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटला तातडीने सुरुवात झाली. ध्रुव कन्सल्टन्सीची टीम त्यासाठी कोल्हापुरात दाखल झाली असून पुलाच्या सद्यःस्थितीबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालावरच पुलावरील वाहतूक किंवा पुलाला आधार देण्याची गरज अधोरेखित होईल. 

दरम्यान, पुलावरून दुचाकीला वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली; मात्र इतर वाहनांसाठी पुलावरून वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. पर्यायी मार्गाने चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे.

शिवाजी पूल कृती समितीने पुलाच्या कठड्याच्या कामाबाबत आक्षेप घेतल्याने आजही हे बंद राहिले.  पुलाची कमान, पुलाचे खांब, त्याचे कठडे, भार पेलण्याची क्षमता, पृष्ठभाग अशा सर्व अंगांनी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक तांत्रिक साधनांचाही आधार घेतला जाणार आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातानंतर ढासळलेल्या पुलाच्या कठड्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद ठेवले आहे. या बांधकामास शिवाजी पूल कृती समितीने आक्षेप घेतल्याने हे काम बंद ठेवले आहे. त्यामुळे कठडा पडलेल्या ठिकाणी लोखंडी अडथळे लावून तात्पुरती सुरक्षा व्यवस्था केली आहे. काल काही कार्यकर्त्यांनी पुलाच्या कठड्याचे काम बंद पाडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले असून, काम सुरू करण्यासाठी लेखी सूचना देण्याची विनंती केली आहे. 

आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे-पाडळी, केर्ली, केर्ले, जोतिबा, निगवे-दुमाला, पन्हाळा, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर परिसरातील ट्रक, मिनी बस, चारचाकी गाड्यांची वाहतूक सुरू असते. पुलावरील अपघातामुळे चारचाकी वाहनांसाठी पुलावरून वाहतूक बंद केली आहे. पुलाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, येथे बॅरिकेड्‌स लावण्यात आले आहेत. सकाळपासून वाहतूक शाखेचे पोलिस वडणगे फाटा व पुलाच्या परिसरात थांबले होते. चारचाकी वाहनांना वडणगे फाटा येथे अडवून ती पर्यायी मार्गाने नेण्यास सांगत होते. दुचाकी वाहनधारकांना वाहतुकीची परवानगी देण्यात आल्याने पुलावर गर्दीचे चित्र होते. पन्हाळा, शाहूवाडी परिसरातून वडापने येणारे प्रवासी वडणगे फाटा येथे उतरून पुलावरून चालत कोल्हापुरात येत होते. चारचाकी गाड्या मात्र वडणगे फाट्यातून थेट वडणगे गावातून राजाराम बंधाऱ्यावरून कसबा बावड्यात प्रवेश करत होत्या. 

‘मोहिते यांचे वक्तव्य बेजबाबदार’ 
कोल्हापूर : ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीत दिलीप देसाई यांचे नाव का नाही?’ हे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे. ते असे वक्तव्य करण्यामागील झारीतील शुक्राचार्य कोण, असा प्रश्‍न प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेतर्फे पत्रकाद्वारे केला.

पत्रकात म्हटले आहे, की शिवाजी पुलावरील अपघाताबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या काही कार्यकर्त्यांसमोर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीत श्री. देसाई यांचे नाव का नाही?, अशी विचारणा श्री. मोहिते यांनी केली. तसे वृत्त काही माध्यमांतून प्रकाशित झाले. हे वक्तव्य अशोभनीय आहे. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाहक श्री. देसाईंमुळे पुलाचे काम रखडल्याचे वक्‍तव्य केले. दुसऱ्या दिवशी त्याचे पुरावे मागताच दिलगिरी व्यक्त केली. प्रजासत्ताक संस्था व देसाई यांनी पुलाला विरोध केलेला नाही. पुलाचे काम पूर्ण व्हावे, ही मागणी केली आहे.

श्रद्धांजली वाहणारा फलक
पुलाचा कठडा तोडून मिनी बस पंचगंगा नदीत बुडाली. हा कठडा पाहण्यास नागरिकांची पुलावर ये-जा सुरू होती. कठड्याचे काम बंद का ठेवले आहे, अशी विचारणाही त्यांच्यातून होत होती. दुचाकीस्वार येथे थांबून कठडा पाहत होते. त्यांना तेथे न थांबण्याची सूचना वाहतूक पोलिस करत होते. पुलाच्या परिसरात अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणारा डिजिटल फलक येथे उभारण्यात आला आहे.
 

Web Title: Kolhapur News Structural audit of Shivaji bridge