कोवाड परिसरात सहा एकरांतील ऊस शाॅर्टसर्किटने खाक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

कोवाड - कोवाड परिसरात शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याचे आग्नितांडव अजूनही थांबले नाही. रविवारी पुन्हा दुपारी १ वाजता कागणी (ता. चंदगड) येथे ऊस तोडणी सुरू असताना शॉर्टसर्किट होऊन ६ एकरांतील ऊस जळाला.

कोवाड - कोवाड परिसरात शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याचे आग्नितांडव अजूनही थांबले नाही. रविवारी पुन्हा दुपारी १ वाजता कागणी (ता. चंदगड) येथे ऊस तोडणी सुरू असताना शॉर्टसर्किट होऊन ६ एकरांतील ऊस जळाला. यामध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे सात लाखांचे नुकसान झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या उसाच्या ट्रकचा लोंबकाळणाऱ्या विद्युत वाहिनीला जोराचा धक्का लागल्याने आग लागल्याचे समजते.

महावितरणचे सहायक अभियंता मयूर पिसे, तलाठी श्री. राजाराम चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कोवाड-कागणी मार्गावरील ओढ्यालगत रस्त्यावरून आडवी विद्युत वाहिनी शेतात गेली आहे. वाहिनीची उंची कमी असल्याने रस्त्यावरून जड मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ती धोकादायक आहे. यासंदर्भात दोन वर्षांपासून शेतकरी महावितरणकडे याबाबत तक्रार करत आहेत; मात्र त्याची दखल घेतली नसल्याचे चित्र आहे.

आज सकाळी कल्लापा शहापूरकर यांच्या उसाची तोडणी सुरू होती. दरम्यान, दुपारी उसाच्या ट्रकचा विद्युत वाहिनीला जोराचा धक्का लागल्याने उसाच्या फडातील फोलवरून ठिणग्या पडल्या. त्यामुळे अचानक उसाने पेट घेतला. बघता बघता आगीचे लोट दूरवर पसरले. ऊस तोडणी मजुरासह शेतकऱ्यानी आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत कल्लापा शहापूरकर, शंकर शहापूरकर, तातेराव देसाई, संजय देसाई, आण्णासो देसाई यांचाही ऊस जळाला. आगीत उसासह पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. उसाच्या फडालगत ट्रॅक्‍टर व बैलांची जोडी होती. त्यास लोकांनी प्रसंगावधान राखून तत्काळ बाजूला काढल्याने मोठा अनर्थ टळला. सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रा. दीपक पाटील, जनार्दन देसाई यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

हेमरसचा शेतकऱ्यांना दिलासा...
आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अशी दुर्घटना घडून ऊस जळाला आहे. त्या ठिकाणचा ऊस हेमरस साखर कारखान्याने तत्काळ उचलला आहे. या उसाचीही तोडणी सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Kolhapur News Sugarcane burn in Kowad