पहिली उचल ३४०० द्या - राजू शेट्टी

गणेश शिंदे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

जयसिंगपूर -  यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन विनाकपात पहिली उचल ३४०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस तोडी द्यायच्या नाहीत, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत येथे करण्यात आला. हा दर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांना लागू असला तरी चर्चेतून दर निश्‍चित करण्याचीही तयारी खासदार राजू शेट्टी यांनी दर्शविली आहे.

जयसिंगपूर -  यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन विनाकपात पहिली उचल ३४०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस तोडी द्यायच्या नाहीत, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत येथे करण्यात आला. हा दर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांना लागू असला तरी चर्चेतून दर निश्‍चित करण्याचीही तयारी खासदार राजू शेट्टी यांनी दर्शविली आहे.

शेतकरीविरोधी असणाऱ्या भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ आवळण्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला. येथील विक्रमसिंह मैदानावर शनिवारी झालेल्या विराट ऊस परिषदेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. 

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘ऊस परिषदेआधी साखर कारखानदारांनी दराचा प्रस्ताव ठेवण्याची अपेक्षा होती. प्रस्ताव आला असता तर त्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता. मागे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकले, की ऊस दराचा प्रश्‍न संपला; मग येथे महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारोंच्या संख्येने शेतकरी आलेत कशासाठी? यात ठरवायचे काय, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षीचे आंदोलन मी मिटवले, असा श्रेयवाद लाटायची काय गरज होती? यावर्षी मिटवायचे नसेल तर राहू द्या, ऊस आमच्या शिवारात आहे. चिंतेची गरज नाही. किती पैसे घ्यायचे, आम्ही ठरवू. आम्हाला शहाणपण शिकवू नका.’’ 

ते म्हणाले, ‘‘कारखानदारांनी सरकारच्या पदराखाली लपून शेतकऱ्यांना फसवायचा उद्योग करू नये. तसे केल्यास गाठ शेतकऱ्यांशी आहे. येथे येणारा शेतकरी वेडा नाही. येथे आल्यानंतर शेतकऱ्यांना ऊर्जा मिळते. आपली याठिकाणी फसवणूक होणार नाही, याची खात्री शेतकऱ्यांना आहे. सत्तेत असतानाही आम्ही थंड नव्हतो. पुणे साखर आयुक्त कार्यालय फोडणारा, विधानसभेपुढे कांदे फेकणारा कार्यकर्ता ‘स्वाभिमानी’चा होता. आंदोलनात सर्वाधिक गुन्हे आमच्या कार्यकर्त्यांवर झाले आहेत. सरकार चुकते त्या-त्या ठिकाणी ठाम विरोध केला आहे.’’

सरकार निवडून आणण्यात शेतकऱ्यांना मोठा वाटा आहे, असा दावा करून श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्‍न हक्काने सांगितले; पण सरकार भामटे असल्याचे लक्षात आले, त्या वेळी पुण्यात महात्मा फुलेंच्या वाड्यात जाऊन माफी मागून आत्मक्‍लेष केला आहे. एनडीए सत्तेवर आल्यानंतर शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यावर विश्‍वासही ठेवला. सातत्याने पाठपुरावा करूनही आश्‍वासन पूर्ण होत नव्हते. प्रस्ताव ठेवला. मतावर आल्यानंतर मात्र मी एकाकी पडलो. १९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांना किती यातना होत असतील याच विचारातून, यासाठी पाठपुरावा केला. अच्छे दिनांची स्वप्ने बघून देशाची सूत्रे मोदींच्या हाती दिली.

गुजरातमध्ये शेतीत चांगले बदल झाले, असे सांगितल्याने गुजरातप्रमाणे देशातील शेतकरी सुखी होतो का पाहिले; पण स्वप्नभंग झाला.’’ मुलीच्या लग्नात १३ हजारांचा बस्ता खरेदीला पैसे नसल्याने एका बाजूला शेतकरी मृत्यूला कवटाळत असताना १६ लाखांचा सूट घालणाऱ्या मोदींना शेतकऱ्यांचे दु:ख कळलेच नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली.

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना गुलामाची वागणूक देऊ नका. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हाच का विश्‍वास? ऊसकरी शेतकरी पाण्याचा प्रचंड वापर करतात म्हणून ठिबकला १३ हजारांचे अनुदान जाहीर केले. याला नऊ टक्के जीएसटी लागू केला; मग शेतकऱ्यांच्या हातात पडणार किती? प्रत्यक्षात ठिबकसाठी एकरी ५० हजार खर्च येतो. ट्रॉली खरेदीवर २८ टक्के जीएसटी व आलिशान मोटारींना सहा टक्के, हा कसला न्याय? एनडीए सरकारने शेतकरीविरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा उद्योग केला आहे.’’ 

सात-बारा कोरा झाल्याशिवाय थांबणार नाही
दिल्लीतील आंदोलनात २० नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा आणि कृषी मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभावाची मागणी करणार असल्याचे सांगून श्री. शेट्टी यांनी दावा केला, की देशातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची केंद्राला दखल घ्यावीच लागेल. आता ही लढाई देशपातळीवर गेली असून, सर्वच शेतकरी संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. कर्जमाफीचा घोळही तसाच आहे. येथे जमलेल्या शेतकऱ्यांपैकी कोण नशीबवान आहे का, ज्याला कर्जमाफी मिळाली, असा जाहीर सवाल करून ते म्हणाले, ‘‘सातबारा कोरा झाल्याशिवाय आता ही लढाई संपणार नाही.’’ 

शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा
श्री. शेट्टी यांनी टीका केली, की कर्जमाफीला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देऊन छत्रपतींचा अवमान केला आहे. कर्जमाफीची ७० टक्के रक्कम बॅंकांनी व उर्वरित रक्कम शासन देणार आहे. राज्याच्या विकास आराखड्यातील रक्कम यासाठी देऊन केवळ ॲडजेस्टमेंटचे धोरण राबविले आहे. शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा. गाठ आमच्याशी आहे.

कारखाने बंद पाडा; भाव वाढेल
ते म्हणाले, पामतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले. पाकिस्तानातून कांदा आयात केल्याने देशातील कांद्याची माती झाली. साखर आयात करून ऊस उत्पादकांनाही मातीत घालण्याचे कारस्थान रचले होते; मात्र याला विरोध केल्यानंतर केवळ तीन लाख टन साखर आयात केली. देशाची साखरेची गरज २४५ लाख टनांची आहे. यावर्षी २४० लाख टन साखर उत्पादन होणार आहे. ३० लाख टन साखर शिल्लक आहे. शिल्लक साठाही महिन्याभरात संपणार आहे. यावर्षी भाव वाढवणे आपल्या हातात आहे. १५ दिवस कारखाने बंद पाडा. भाव वाढेल. गतवर्षीच्या उसाचे अंतिम बिल अद्याप येणे आहे. यावर्षीच्या उसाला पहिली उचल ३४०० रुपये देणे कारखान्यांना शक्‍य आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत तोडी स्वीकारू नका, असे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले. 

रविकांत तुपकर म्हणाले, ‘‘ऊस परिषदेला शेतकऱ्यांनी उपस्थित राहू नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते; पण गर्दी पाहता शेतकऱ्यांचा विश्‍वास संघटनेवर असल्याचे दिसले आहे. भाजप सरकार फसवे आहे. अच्छे दिन नकोत, पूर्वीचेच दिवस परत द्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मोदींनी एकही आश्‍वासन पाळले नाही. नोटाबंदीमुळे बॅंका बुडाल्या. तीन टक्के विकास झाला. उद्योग, शेतकरी, व्यापारी सगळ्यांचीच वाट लागली. शेतकरी कर्जमाफी म्हणजे टिंगलखोरी झाली आहे. कोणता कायदा करतील, याचा नेम नाही. सामान्यांना न्याय देण्याचे काम शासनाने केले पाहिजे; पण इथे ते होताना दिसत नाही. तोडा, फोडा व राज्य करा अशी भाजपची नीती आहे. हे थापाड्यांचे सरकार आहे. काँग्रेसने साठ वर्षे जितके लुटले नाही, तितके नोटाबंदीच्या निर्णयातून भाजपने लुटले आहे. शेट्टींना जातीयवादी म्हणण्याचे बंद करा. बाराबलुतेदार शेट्टींच्या पाठीशी आहेत. माझ्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत. मी तोंड उघडले, तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. यावर्षीच्या उसाला अपेक्षित दर मिळाल्याशिवाय उसाचे कांडेही कारखान्यात जाणार नाही. तसा प्रकार झाला तर वाहने, टायरी फोडून पेटवू.’’

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांनी तीव्र शब्दांत कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘आजवर ऊस परिषदेत मागितलेला दर मिळवला आहे. खासदार शेट्टी सांगतील त्या प्रकारचे आंदोलन करून उसाला चांगला दर मिळवू.’’ ऊसदर म्हणजे रतन खत्रीचा अड्डा असल्याचे खोत यांनी बोलल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, ‘‘पंधरा वर्षांपूर्वी ज्यांच्याकडे मोटारसायकल नव्हती, त्यांच्याकडे आज बंगले आणि गाड्या कुठून आल्या, याबाबतही खुलासा झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जिवावर मोठे होऊन त्यांच्याशी प्रतारणा करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. शेतकरीहिताच्या आड येणाऱ्यांची गय करणार नाही.’’ 
शहीद जवान, ऊस आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अण्णासो चौगुले यांनी स्वागत केले. पै. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले. बीडच्या पंचायत समिती सदस्या पूजा मोरे, राज्य प्रवक्ते महेश खराडे, सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, सयाजी मोरे, कर्नाटक रयत संघटनेचे कुमार मुतकान्ना, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिकाताई ढगे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले, सतीश काकडे, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे व्ही. एम. सिंग यांनी मनोगते व्यक्त केली.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ. शुभांगी शिंदे, डॉ. महावीर अक्कोळे, नगरसेवक शैलेश चौगुले, सागर संभुशेटे, सुभाष शेट्टी, मिलिंद साखरपे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमा पाटील, सुवर्णा अपराज यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी उपस्थित होते. 

सदाभाऊ  खोत यांच्यावर टीका
संघटनेतून हकालपट्टी केलेले कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर रविकांत तुपकरांसह अन्य वक्‍त्यांनी टीकेची झोड उठवली. ऊसदर ठरवायला, हा काय रतन खत्रीचा अड्डा आहे का, या मंत्री खोत यांच्या विधानाचा वक्‍त्यांनी खरपूस आणि शेलक्‍या शब्दांत समाचार घेतला. ज्या व्यासपीठावरील सदाभाऊंच्या भाषणांना शेतकऱ्यांकडून जल्लोषाने दाद मिळायची, तेच सदाभाऊ याच व्यासपीठावर टीकेचे धनी बनले. शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. टीका करताना त्यांची जीभ घसरली.

दिल्लीत २० नोव्हेंबरला समांतर संसद
शेतकऱ्यांवरील अन्यायाचा जाब विचारून संपूर्ण सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटना एकवटत आहेत. दिल्लीत समांतर संसद भरणार आहे. त्यात आत्महत्या केलेल्या ५४३ शेतकऱ्यांच्या विधवा संसदेच्या पहिल्या सत्राचे कामकाज पाहतील. तेथील ठराव घेऊन राष्ट्रपतींच्या दारात जाऊन ही खरी संसद आहे, असे ठणकावून सांगतील. यासाठी देशातील शेतकऱ्यांनी एकसंध होण्याचे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले. 

उसाला ३४०० दर देणाऱ्या गुऱ्हाळ मालकाचा सत्कार
तिरपण (ता. पन्हाळा) येथील गुऱ्हाळ मालक आनंदा पाटील यांनी कृष्णात जाधव या शेतकऱ्याचा ऊस गुळासाठी रोख ३४०० रुपये देऊन खरेदी केला आहे. दहा टन उसाचे ३४०० प्रमाणे ३४ हजार रुपये बिल शेट्टी यांच्या हस्ते शेतकऱ्याला प्रदान करण्यात आले. 

किसान समिती अध्यक्षपदी शेट्टी
अखिल भारतीय किसान समितीच्या अध्यक्षपदी खासदार राजू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. देशातील १७० शेतकरी संघटनांना एकत्रित करून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी व्यापक लढा उभारल्याबद्दल खासदार शेट्टी यांचा या वेळी जाहीर सत्कार करण्यात आला. 

लोकसभेसाठी तयारी सुरू
ऊसपरिषदेत श्री. शेट्टी हेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील, असे अनेक वक्‍त्यांनी सांगितले. अनेकांनी या वेळी निवडणुकीचा निधी म्हणून ऊसपरिषदेत काही रक्कमही जमा केली. परिषदेतूनच लोकसभेच्या तयारीचीही सुरवात झाली. 

सदाभाऊंना घरातही घेऊ नका!
ज्येष्ठ नेते सतीश काकडे (बारामती) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली, की अडचणीत असताना मी सदाभाऊ यांना पाच लाख रुपये दिले. त्यांना घरातही घेऊ नका. ज्यांनी मोठे केले, त्यांना ते विसरले.

Web Title: Kolhapur News Sugarcane conference in Jaysingpur