वाघजाई घाटात ऊस वाहतूक धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

म्हाकवे - कागल-निढोरी राज्यमार्गावरील वाघजाई घाट हा अपघाताचा स्पॉट बनला आहे. उसाच्या पळवापळवीत अवघड रस्त्यावरून उसाने भरलेले बोजड वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. ट्रक व ट्रॉलीमध्ये पंधरा ते वीस टन ऊस वाहतूक केली जाते.

म्हाकवे - कागल-निढोरी राज्यमार्गावरील वाघजाई घाट हा अपघाताचा स्पॉट बनला आहे. उसाच्या पळवापळवीत अवघड रस्त्यावरून उसाने भरलेले बोजड वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. ट्रक व ट्रॉलीमध्ये पंधरा ते वीस टन ऊस वाहतूक केली जाते. अधिक कमाईच्या ईर्षेतून ही वाहतूक बेधडक सुरू आहे. परिणामी ट्रॅक्‍टर चालक व प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. ऊस वाहतुकीच्या हंगामात वाघजाई घाटात सतत ट्रॅक्‍टर पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा घाट अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे.   

निढोरी ते कागल हा २७ किलोमीटरचा मार्ग शाहू, मंडलिक, बिद्री, संताजी, जवाहर, राजाराम, डालमिया, हालसिद्धनाथ, हिरा शुगर या साखर कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी सोयीचा आहे. तसेच या मार्गावरून सीमा नाके चुकवण्यासाठी वाहतूक सुरू असते. 

या रस्त्यातील एक किलोमीटरचा वाघजाई घाट बोजड व प्रमाणापेक्षा जादा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्‍टरसाठी धोक्‍याचा ठरत आहे. या घाटात चढतीला व उतरतीला धोकादायक वळण असल्याने अवजड वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे. अनेक वेळा बोजड वाहने घाट पास करत असताना पलटी होऊन अपघात होत असल्याने प्रमाणापेक्षा अधिक ऊस भरणाऱ्या वाहनांबाबत प्रवाशांसह ऊसकरी शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक किलोमीटर अंतराच्या या घाटात तीस वर्षांपूर्वीच्या दगडी संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. तर लोखंडी संरक्षण अँगलची मोडतोड झाली आहे. परिणामी हा घाट प्रवाशांसाठी धोक्‍याचा बनला आहे.

संतापजनक टेपरेकॉर्डर 
 ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्‍टरमध्ये मोठ्या आवाजामध्ये टेप रेकॉर्ड लावले जातात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना बाजू काढून पुढे जाण्यास चालकांना त्रास होतो. त्यामुळे वादावादीचे प्रकार होतात. रात्री या ट्रॅक्‍टरांचा एकच विजेचा बल्ब सुरू असतो, त्यामुळेही समोरून येणाऱ्या वाहनांचे अपघात होतात.

Web Title: Kolhapur News Sugarcane transportation dangerous in Waghjai Ghat