अंतिम बिले न देणाऱ्यांकडे ‘स्वाभिमानी’ने जावे

निवास चौगले
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या हंगामातील अंतिम दर दिलेला नाही, यापैकी तीन कारखान्यांनी दुसरा हप्ताही दिलेला नाही, प्रतिटन दोन किलो साखर कोणत्याही कारखान्यात दिली जात नाही. असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काही ठराविक कारखान्यांवरच सुरू असलेली दादागिरी वादात अडकली आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या हंगामातील अंतिम दर दिलेला नाही, यापैकी तीन कारखान्यांनी दुसरा हप्ताही दिलेला नाही, प्रतिटन दोन किलो साखर कोणत्याही कारखान्यात दिली जात नाही. असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काही ठराविक कारखान्यांवरच सुरू असलेली दादागिरी वादात अडकली आहे. शनिवारी (ता. १४) दालमिया-आसुर्ले कारखान्यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवरून जिथे प्रतिकार होत नाही, त्याच ठिकाणी दादागिरी हेच वास्तव पुढे आले.

अंतिम ऊस दर म्हणजे काय? हाच खरा प्रश्‍न आहे. उसाचा दर ठरवण्यासाठी केंद्राचा व महाराष्ट्राचाही कायदा आहे. केंद्राच्या कायद्यानुसार एफआरपी किती असावी असावी व ती १५ दिवसांत द्यावी, हे निश्‍चित आहे. 

राज्यात ऊस दर नियामक मंडळ आहे, या मंडळातर्फे कारखान्यांनी ७०ः३० प्रमाणे ऊस दर द्यावा, असा कायदा केला. या नियामक मंडळात शेतकरी प्रतिनिधी म्हणून खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, पृथ्वीराज जाचक आहेत. गेल्या महिन्यातच झालेल्या मंडळाच्या बैठकीत राज्यातील कारखान्यांची माहिती सादर केली. त्याच वेळी कोणी अंतिम दर दिला नाही, प्रतिटन २ किलो साखर कोण देते, याची माहिती सांगितली जाते. त्या वेळी याला विरोध न करणाऱ्यांचे कार्यकर्ते मात्र आता अस्तित्वासाठी जिथे प्रतिकार होणार नाही, त्याठिकाणी दादागिरी करतात. 

गेल्यावर्षीच्या हंगामात एफआरपी व जादा १७५ रुपये असे ठरले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी उसाचे पैसे आदा केले. ७०ः३० फॉर्म्युल्याप्रमाणे पैसे दिलेत का नाही, हे तपासण्याची जबाबदारी नियामक मंडळाची आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे पैसे दिले नसतील, तर त्याचा जाब साखर आयुक्तांना विचारण्याची गरज असताना कारखान्यात घुसून तोडफोड करून संघटनेला काय साध्य करायचे आहे? असाही प्रश्‍न निर्माण होतो. 

दोन किलो साखरेचा प्रश्‍न
जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात कोणत्याही कारखान्यांकडून ऊस घालणाऱ्यांना प्रतिटन दोन किलो साखर दिली जात नाही. काही सहकारी साखर कारखान्यांकडून सभासदांना महिना ५ किलो साखर किलोला पाच रुपये दराने दिली जाते, याशिवाय प्रतिटन उसाला १ किलो साखर दिली जाते.‘दत्त-दालमिया’ खासगी कारखाना असल्यामुळे त्यांचे सभासद असण्याचा प्रश्‍नच नाही. या कारखान्याकडून प्रतिटन १ किलो साखर किलोला दहा रुपये दराने दिली जाते. ही वस्तुस्थिती असताना संघटनेच्या या मागणीबाबतही उलटसुलट चर्चा आहे.

या कारखान्यांकडून हप्त्यांची प्रतीक्षा
‘दौलत-हलकर्णी’ चालवण्यास घेतलेल्या न्युट्रियन्स’ने अजून गेल्या हंगामात एफआरपीप्रमाणे दर दिलेला नाही. भोगावती, हेमरस, ईकोकेन या कारखान्यांनी दुसरा हप्ताही अजून दिलेला नाही. पंचगंगा, बिद्री, इंदिरा महिला, गायकवाड-बांबवडे, गडहिंग्लज या कारखान्यांकडून अजून तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ही वस्तुस्थिती असताना ‘स्वाभिमानी’चा राडा काही ठराविक कारखान्यांवरच का होतो? यातून काही वेगळे संघटनेला साध्य करायचे आहे का, असा संशय निर्माण होण्यास वाव आहे.

‘दालमिया’कडून २८७२ 
‘दत्त-दालमिया’ कारखान्याची गेल्यावर्षीची एफआरपी प्रतिटन २५६२ रुपये आहे. त्यात जादा १७५ घालून कारखान्याने पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २७३७ रुपये दिले, त्यानंतर गणेशोत्सवासाठी प्रतिटन १३५ रुपये दिले आहेत. एकूण प्रतिटन २८७२ रुपये या कारखान्याने शेतकऱ्यांना दिलेले आहेत. ७०ः३० फॉर्म्युल्यानुसार प्रतिटन ७ रुपये जादा दिले असताना याच कारखान्यात घुसून संघटनेने काल तोडफोड केली. 

Web Title: Kolhapur News Sugercane rate issue