पापाच्या तिकटीला घुमतोय काठीचा आवाज

सुधाकर काशीद
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर - मिनू पाच वर्षांची आहे. उंची तीन फूट आहे; पण तिच्या हातातली काठी चार फुटाची आहे. ही काठी ती अशी लिलया फिरवते की गरगर फिरणारी ती काठी एखाद्या चक्रासारखी भासते... 

कोल्हापूर - मिनू पाच वर्षांची आहे. उंची तीन फूट आहे; पण तिच्या हातातली काठी चार फुटाची आहे. ही काठी ती अशी लिलया फिरवते की गरगर फिरणारी ती काठी एखाद्या चक्रासारखी भासते...

हा नंदू सहा वर्षांचा आहे. अंगाने लुकडा आहे; पण हातात चार फुटाची सणसणीत काठी घेतो. एखाद्या योद्धयाच्या अविर्भावात काठी फिरवतो. मर्दानी खेळाचा एक भाग म्हणून समोरच्या दुसऱ्या काठीवाल्याच्या दिशेने आक्रमण करतो. त्याच्या काठीवर फटाफट घाव घालतो आणि त्याने घातलेले घाव काठीवर सहजपणे झेलतो. 

मिनू आणि नंदू ही केवळ दोन उदाहरणे; पण पापाच्या तिकटीला रोज सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत असे पन्नासभर मिनू नंदू दिसतात. प्रत्येकाच्या हातात काठ्या असतात. हातातल्या काठीपेक्षा ते लहान दिसतात; पण काठी हातात घेऊन रोज स्वसंरक्षणाचे धडे गिरवतात. शाळेला सुट्टी पडून आज तेरा चौदा दिवस झाले आहेत आणि सर्वजण रोज सकाळी न चुकता मर्दानी खेळाचा सराव करतात. 

पापाची तिकटी शिवसेना शाखेचे कार्यकर्ते बॅरीकेटस्‌ लावतात. काही मुले एकटीच येतात तर काहीजण आजोबा, आजी बाबांबरोबर येतात. आजी आजोबा रस्त्याकडेच्या कट्ट्यावर बसतात आणि ही मुल एकत्र आली की, प्रार्थना म्हणतात. संदीप लाड व ऋषिकेश अन्नछत्रे हे  मार्गदर्शन करतात.

टी.व्ही., मोबाईलसमोर अडकून पडणाऱ्या मुलांना व्यावहारिक जगात आणण्याचा पाच-सहा वर्षे प्रयत्न चालू आहे. सुट्टीत त्यांनी मनसोक्त खेळावे, मर्दानी खेळाची ओळख करून घ्यावी म्हणून रोज दोन तासच त्यांना सराव देतो. 
- ऋषीकेश अन्नछत्रे,
प्रशिक्षक 

Web Title: Kolhapur News Summer vacation special story