संशयित पोलिस अधिकारी 'सीआयडी'ला शरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - वारणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यवधी रकमेच्या चोरीच्या प्रकरणातील सांगलीतील संशयित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट आणि सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे हे गुरुवारी दुपारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयात शरण आले. त्या दोघांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता. 4) त्या दोघांना पन्हाळा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दिली.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील फ्लॅटमध्ये 12 मार्च 2016 मध्ये झालेल्या कोट्यवधीच्या चोरीचा तपास सांगली पोलिसांनी लावला.

यातील मुख्य संशयित मोहिद्दीन मुल्ला याला अटक केली. त्याच्याकडून तीन कोटी रुपये जप्त केले. त्यानंतर कोडोली पोलिसांनी छापा घालून आणखी दीड कोटीची रक्कम जप्त केली. चोरीला गेलेल्या रकमेबाबत फिर्यादी झुंझार सरनोबत यांनी शंका व्यक्त केली. याचा तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केला. त्यात सांगलीच्या सात पोलिसांनी तपासाच्या नावाखाली नऊ कोटी 13 लाख रुपयांच्या रकमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. याप्रकरणी सांगलीतील पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, रवींद्र पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील आणि कुलदीप कांबळे यांच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे सातही जण गायब होते.

Web Title: kolhapur news surrender suspected police officer to cid