तबला, जेलर अन्‌ बालविकास अधिकारी!

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

कलापूरच्या सांगीतिक परंपरेचा अनोखा प्रेरणादायी समृद्ध वारसा

कलापूरच्या सांगीतिक परंपरेचा अनोखा प्रेरणादायी समृद्ध वारसा

कोल्हापूर - कलापूर कोल्हापूरच्या सांगीतिक परंपरेत अनेक कलारत्न जन्माला आले आणि त्यांनी संगीताची परंपरा नेटाने पुढे नेली. मात्र, अनंत अडचणींचा सामना करून संगीत शिकणाऱ्यांनीही पुढे इतिहास घडविला. ही परंपरा येथील पोवार कुटुंबीयांनी तितक्‍याच खमकेपणाने पुढे नेली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनीही त्यांची ‘वाहऽऽऽ उस्ताद’ अशी प्रशंसा केली. सातारा येथे सध्या तुरुंगाधिकारी असणाऱ्या तेजश्री पोवार आणि नांदेड येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या सुप्रिया पोवार यांच्या कुटुंबीयांच्या संगीतप्रेमाचा हा अनोखा वारसा नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारा आहे.

बाजीराव पोवार मूळचे कसबा वाळवेचे. त्यांची बाजीराव महाराज अशीच सर्वत्र ओळख. मात्र, पुढे निगवे दुमाला (ता. करवीर) येथे हे कुटुंब स्थायिक झाले. ते कीर्तन करायचे आणि रिक्षाही चालवायचे. आपल्याला संगीत शिकता आले नाही, ही खंत त्यांच्या मनात असल्याने थोरल्या तेजश्रीला संगीताचे शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वामनराव मिरजकर यांच्याकडे तिचे तबल्याचे आणि अरुण जेरे यांच्याकडे गायनाचे शिक्षण पूर्ण झाले. तेजश्री यांनी मग पुढे सुप्रिया आणि भाऊ प्रसाद यांना संगीत शिकविले. सर्वांनी मिळून क्‍लासेस सुरू केले. स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. तब्बल बारा वर्षे तेजश्री यांनी शहर आणि परिसरात दहा ते बारा ठिकाणी क्‍लासेस घेतले.

दरम्यान, तुरुंगाधिकारीपदाची जाहिरात निघाल्यानंतर ही परीक्षाही दिली आणि त्यात यशही संपादन केले. सातारा येथे त्या तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत झाल्या. चार महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांसाठी झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांनी स्वतःच्या तबल्यावर तेजश्री यांना तबलावादनाची संधी दिली आणि तबल्याचे तालसौंदर्य अनुभवत ‘वाहऽऽऽ उस्ताद’ अशी भरभरून प्रशंसा केली. एकीकडे तेजश्री यांची नेटाने वाटचाल सुरू होती आणि त्याचवेळी सुप्रिया यांनीही बालविकास प्रकल्प अधिकारीपदाच्या परीक्षेत यश मिळविले. नांदेड येथे नुकतीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. मात्र, वडील बाजीराव आणि भाऊ प्रसाद यांनी क्‍लासेसची परंपरा पुढे सुरूच ठेवली आहे. सध्या हे कुटुंब कळंब्यात स्थायिक झाले आहे.

दरम्यान, तेजश्री आणि सुप्रिया यांचे शिक्षण वडणगे-निगवे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूल आणि त्यानंतर विवेकानंद महाविद्यालयात झाले. तेजश्री यांनी पुढे शिवाजी विद्यापीठातून एम. ए. पदवी आणि सुप्रिया यांनी प्रताप डी. एड. महाविद्यालयातून डी. एड. व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

कोल्हापुरात उस्ताद झाकीर हुसेन यांच्या कार्यक्रमाची तिकिटे मिळविताना बराच मोठा खटाटोप करावा लागला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्याच तबल्यावर वादनाची संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. तुरुंगाधिकारी म्हणून इमाने-इतबारे काम करताना संगीताची परंपराही पुढे न्यायची आहे.
- तेजश्री पोवार, तुरुंगाधिकारी

वडिलांकडे फीसाठी पैसे नव्हते. मात्र, त्यांनी बहिणीला संगीताचे शिक्षण दिले. तिने आम्हाला शिकविले. सध्या वडील आणि भाऊ संगीताचे क्‍लास घेतात. आम्ही दोघी नोकरीत असलो, तरी संगीताची परंपरा कदापिही खंडित होऊ देणार नाही.
- सुप्रिया पोवार, बालविकास प्रकल्प अधिकारी

Web Title: kolhapur news tabala jailer & child development officer