असा ‘तानाजी’ पुन्हा होणार नाही

असा ‘तानाजी’ पुन्हा होणार नाही

कोल्हापूर -  पै-पाहुणे असो अथवा मित्रमंडळी, तानाजी साठे कुणाच्या सुख-दुःखाला धावून गेले नाहीत, असे झाले नाही. आजारपण असो अथवा अन्य अडचणी, तानाजी धावून येणारच. हलगीवादक म्हणून ते प्रसिद्ध तर होतेच; शिवाय एक चांगला माणूस म्हणून ते कायमचे लक्षात राहतील, अशी प्रतिक्रिया मातंग वसाहतीतून उमटली. तानाजी यांच्या अपघाती मृत्यूमुळे या परिसरावर शोककळा पसरली. घराशेजारीच असलेल्या सुजल अवघडे हा हातातोंडाला आलेला मुलगा गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे.

केएमटीखाली चिरडून दोघांचा काल मृत्यू झाला. रात्रीचे ताणतणावाचे वातावरण, संताप आणि दुःख सोबत घेऊनच परिसराची आजची सकाळ उजाडली. तानाजी साठे यांच्या दारात पिरासाठी घातलेला मांडव आज सुना सुना होता. आकाश आणि संदीप ही दोन्ही मुले रुग्णालयात आहेत. मुलगा सागर याच्याभोवती नातेवाईक आणि मित्र मंडळींनी गर्दी केली. मांडवातच जमखाना टाकून जो येईल तो धीर देत होता. घरामध्ये महिलांचे दुःखही काही कमी नव्हते. काल दुपारपर्यंत पंजांची ज्यांनी पूजाअर्चा केली ते तानाजी आज नाहीत यावर कुणाचा विश्‍वासही बसत नव्हता.

हलगीवादन आणि तानाजी साठे असे समीकरणच गेल्या तीस वर्षांत तयार झाले होते. कोल्हापुरातील कुठल्याही तालीम मंडळांचा कार्यक्रम आहे आणि तानाजींना निमंत्रण नाही असे झाले नाही. त्यांची हलगी कडाडल्याशिवाय कार्यक्रमाची रंगतच यायची नाही, असे त्यांचे मित्रमंडळी आवर्जून सांगत होते. संजय आवळे सारखे असंख्य शिष्य त्यांनी घडविले. आजही मुले आणि पुतण्या धीरज हे वादनात वाक्‌बगार आहेत. ओढ्यावरील रेणुका देवीचे मंदिर असो अथवा दरवर्षी सौंदत्ती येथे भरणारी देवीची यात्रा असो, तेथे त्यांनाच मान असायचा. नेमके काल रात्री याच ठिकाणी तानाजी यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांचे सहकारी मित्र येथे सांत्वनासाठी आले होते. ‘विजय-नाट्य’, ‘कोहिनूर’, ‘ललकार’, ‘लकी-स्टार’, ‘हंगामा’ या कलापथकातून त्यांनी कला दाखविली.

त्यांनी स्वतःच्या मालकीचे ‘जलवा’ हे कलापथकही काही काळ चालविल्याचे मधुकर वाघे यांनी सांगितले. कलाकार म्हणून जेवढे मोठे, तेवढा माणूस म्हणूनही ते मोठे होते, असे सांगण्यात आले. कोणाचीही कसलीही अडचण असो, ते मदतीला धावून जायचे. साठे यांच्या घरालगत असलेले अवघडे कुटुंबीयही धक्‍क्‍यातून सावरलेले नाही. सुजल हा हातातोंडाला आलेला मुलगा गमावल्याने वडील भानुदास सुन्न अवस्थेत आहेत. घरची परिस्थिती गरिबीची आहे. भानुदास हे मंडप डेकोरेशनच्या कामी आहेत. आयर्न आणि वृषभ ही दोन मुले आहेत. घरी महिलांचा आक्रोशही काही थांबत नव्हता. 

मायावतींकडून तानाजीचा गौरव
लखनौ (उत्तर प्रदेश) येथे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचा पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी बसविला. पुतळ्याच्या अनावरणावेळी हलगीवादक बोलाविण्यात आले होते. त्यात तानाजी साठे यांचा समावेश होता. सुमारे साडेतीन हजार वादकांतून साठे यांनी बाजी मारली. मायावती यांनी दिलेले चांदीचे ताट आजही त्या कार्यक्रमाची आठवण करून देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com