कोल्हापूरः टेम्पो येणार दारा, कचरा द्या भराभरा !

सुधाकर काशीद
मंगळवार, 31 जुलै 2018

कोल्हापूर - कोंडाळामुक्त शहराचा एक भाग म्हणून दारोदारी जाऊन कचरा उठाव करण्यासाठी १५४ टेम्पो (छोटा हत्ती) खरेदीस टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वच्छ भारत योजनेसाठी दर हजार घरांमागे एक टेम्पो या प्रमाणात शहरात या टेम्पोची विभागणी करण्यात येईल.

कोल्हापूर - कोंडाळामुक्त शहराचा एक भाग म्हणून दारोदारी जाऊन कचरा उठाव करण्यासाठी १५४ टेम्पो (छोटा हत्ती) खरेदीस टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वच्छ भारत योजनेसाठी दर हजार घरांमागे एक टेम्पो या प्रमाणात शहरात या टेम्पोची विभागणी करण्यात येईल.

या टेम्पोद्वारे सकाळी दारात कचरागाडी येणार आहे. यामुळे कोंडाळा, कचरा उठावाचे ट्रक ही पद्धतच बंद होईल. लक्षवेधी हॉर्नचा किंवा घंटेचा आवाज करीत हा टेम्पो गल्लीत वा दारात आला, की त्यात कचरा टाकायचा व टेम्पो भरला की तो थेट कचरा डेपोत जाऊन रिकामा करायचा, अशी त्याची संकल्पना आहे. 

सध्याच्या पद्धतीनुसार दारात, भागात, गल्लीत कचरा घंटागाडी येते. दारादारांत जाऊन कचरा गोळा करते. हा कचरा कोंडाळ्यात टाकला जातो. मग हा कचरा भरून नेण्यासाठी ट्रक (कंटेनर) येतो. आणि एक दिवस ट्रक आला नाही तर कचरा कोंडाळा भरून रस्त्यावर येतो.

स्वच्छ भारत योजनेत कचरा कोंडाळा हा प्रकारच नाही. त्यामुळे कचरा उठावासाठी छोट्या गल्लीबोळापर्यंत जाऊ शकणारे टेम्पो देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या जी. एम. पोर्टलवरून त्या-त्या पालिका, महापालिकांनी हे टेम्पो खरेदी करायचे आहेत. त्यानंतर कचरा उठावाचे काम कंत्राटदाराकडे द्यायचे आहे.

आता पहिल्या टप्पात १०४ व दुसऱ्या टप्प्यात ५० असे एकूण १५४ टेम्पो यासाठी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टेम्पो आले की कचरा उठाव कर्मचाऱ्यांचे कष्टाचे काम थांबेल. आता कचरा गाडी भरली की ती कोंडाळ्यात नेऊन ओतावी लागते व चढाच्या रस्त्यावरून ही गाडी ढकलत नेणे म्हणजे घाम काढणारे काम असते. आणि त्या कर्मचाऱ्यांची दमछाक पाहून ती गाडी काही अंतरापर्यंत ढकलण्याचे नागरिकांच्या मनात आले तरी कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ते शक्‍य होत नसते. 

कचरा जाणार थेट डेपोत
रोज सकाळी हे टेम्पो शहरातील प्रत्येक प्रभागात येतील. कचरा टाकून वाहन भरले, की ती थेट कचरा डेपोत जाईल. पुन्हा रिकामा टेम्पो प्रभागात येईल. एक हजार घरामागे एक टेम्पो याप्रमाणे रोज त्याच्या दोन-तीन फेऱ्या होतील. 
याशिवाय त्याचेही विभाजन झाले असल्याने जवळच्या कचरा डेपोत हे टेम्पो जातील. सध्या मुख्य कचरा डेपोबरोबरच पुईखडी, मैलखड्डा, लक्षतीर्थ परिसरात कचरा डेपो व या डेपोतून कचऱ्याद्वारे बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे. 

कचरा टेम्पो ही स्वच्छ भारत योजनेखालील संकल्पना आहे. या संकल्पनेतून कचरा कोंडाळे, कचरा घंटागाडी बंद होईल. कोल्हापूरची लोकसंख्या, घरांची संख्या याचा विचार करता १५० टेम्पो घ्यावे लागणार आहेत. 
- डॉ. विजय पाटील,
मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका

Web Title: Kolhapur News tempo for waste collection