‘टेक्‍स्पोजर-२०१८’ इचलकरंजीला वरदान

संजय खूळ
गुरुवार, 11 जानेवारी 2018

जागतिक बाजारपेठेत वस्त्रोद्योगाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वस्त्रोद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, ग्राहकांची मागणीतील विविधता आणि ते पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानांची माहिती होणे आवश्‍यक आहे. यासाठी टेक्‍स्पोजरसारखे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरत आहे. हे प्रदर्शन 11 ते 14 जानेवारी दरम्यान इचलकरंजी येथे होत आहे.

इचलकरंजी येथे आयोजित टेक्‍स्पोजर प्रदर्शनात देश-विदेशांतील विविध तंत्रज्ञानाचा आविष्कार एकाच छताखाली पाहावयास मिळणार आहे. कापड उद्योगातील सर्व उद्योजकांना तंत्रज्ञानाची माहिती होण्याबरोबरच जागतिक स्पर्धेत आपण कोठे आहोत, हेही पाहता येणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी शहराला हे प्रदर्शन एक वरदान ठरणार आहे.

इचलकरंजी या शहराची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर अशी असून शहरात वेगाने निर्माण होणारा विकेंद्रित वस्त्रोद्योग प्रसिद्ध आहे. इचलकरंजी शहर हे देशातील सर्वात जलदगतीने आधुनिकीकरण होणारे असे वस्त्रोद्योगाचे केंद्र बनले आहे. शहराची पारंपरिक ओळख साडी आणि धोती निर्माण करणारे शहर अशी आहे. इचलकरंजीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने व इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी आवश्‍यक पोषक वातावरण असल्यामुळे येथे हायटेक टेक्‍स्टाईल पार्कस्‌ व गारमेंट पार्कस्‌ स्थापन झाले आहेत.

शहराच्या वस्त्रोद्योगास गती देण्यासाठी केंद्र सरकारने विविध प्रोजेक्‍ट मंजूर केलेले आहेत. जागतिक स्तरावर होत असलेले वस्त्रोद्योगातील विविध बदल व त्याबाबत वस्त्रोद्योगांनी करावयाची तयारी, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर विविध तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी डीकेटीईमार्फत सातत्याने चर्चासत्रे, कार्यशाळा तसेच परिषदांचे आयोजन केले जाते. जगभर वस्त्रांचा वापर अखंड वाढत आहे. यासाठी वस्त्रोत्पादन क्षेत्र वेगाने वाढत आहे.

या औद्योगिक क्षेत्रात प्रॉडक्‍शन, क्वॉलिटी, मेंटेनन्स, संशोधन, प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट, मार्केटिंग, डिझायनिंग, प्रोसेसिंग इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये संधी निर्माण झाल्या आहेत. या सर्व संधी एकाच छताखाली आणण्यासाठी व इचलकरंजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योजकांना मिळावी, यासाठी रोटरी क्‍लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डीकेटीई सोसायटीचे टेक्‍स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेक्‍स्पोजर-२०१८’ या राष्ट्रीय वस्त्रोद्योग यंत्र प्रदर्शन होत आहे.

प्रदर्शनात आदर्श तंत्रज्ञान
या प्रदर्शनात देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांनी आपले स्टॉल बुक केलेले आहेत. यामध्ये त्यांनी आपआपले प्रॉडक्‍ट प्रदर्शनासाठी लावले आहेत. यामध्ये मुख्यत्वे उत्कृष्ट विणकामास लागणारे सूत, उत्कृष्ट विणकामाची पूर्वतयारी व आदर्शवत कार्यपद्धती, अत्याधुनिक विणकाम तंत्रज्ञान, विकेंद्रित वस्त्रोद्योगाची व्यूहरचना, टेक्‍निकल टेक्‍स्टाईल्स, वस्त्रोद्योगासाठी लागणारे अद्ययावत पार्टस्‌, टेक्‍स्टाईलमधील अत्याधुनिक यंत्रसामग्री याशिवाय साधे माग, एअरजेट, ॲटो, सिमको, गारमेंट, स्पिनिंग, प्रोसेसिंग, डाइंग, फिनिशिंग, विव्हिंग यांना आवश्‍यक असणारी यंत्रसामग्री याचे प्रदर्शन भरविले आहे.

Web Title: Kolhapur News Texposor-2018 special article