वन्यजीवांची तहान कुठे भागते.. कुठे नाही

शिवाजी यादव
गुरुवार, 15 मार्च 2018

कोल्हापूर - दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. विदर्भात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने काही ठिकाणी वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशी स्थिती पश्‍चिम घाटातील वन्यजीवांवर येऊ नये यासाठी वनरक्षकांनी पुढाकार घेत जंगलातील वनतळी पुनर्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे.

कोल्हापूर - दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. विदर्भात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने काही ठिकाणी वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशी स्थिती पश्‍चिम घाटातील वन्यजीवांवर येऊ नये यासाठी वनरक्षकांनी पुढाकार घेत जंगलातील वनतळी पुनर्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. वास्तविक गेल्या दोन वर्षांत पश्‍चिम घाटात साडेतीनशेहून अधिक वनतळी (पाणवठे) बांधली आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक तळ्यांतील पाण्याची पातळी कायम आहे; मात्र निम्मी तळी कोरडी पडली असून त्यांची स्वच्छता करून पुन्हा पाणवठे तयार करण्यात येत आहेत.

येत्या २१ मार्चला होणाऱ्या वन दिनापर्यंत बहुतेक तळी पाणी भरण्यायोग्य बनविण्यात येणार आहेत. त्याचा लाभ यंदा वळीव पाऊस लवकर झाला तर होईलच; अन्यथा पुढील वर्षी तरी होईल, अशी अपेक्षा वनरक्षकांना आहे. यातून वन्यजीवांची उन्हाळ्यातील तहान भागण्यास मदत होणार आहे.

वन्यजीवांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत यासाठी जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करणे तसेच पाणवठे तयार करणे, अशी कामे गेल्या दोन वर्षांत झाली आहेत. त्यासाठी वनरक्षक वनमजुरांचा सहभाग होता. यंदा ज्या ठिकाणी पाणवठे बुजले आहेत, ते पाणवठे स्वच्छ करून त्यातून पुन्हा पाणी साठावे अशी सोय करण्यासाठी जिल्हाभरात सर्वच वनरक्षक आपापल्या बिटमध्ये काम करीत आहेत.
-दत्ता पाटील, 

अध्यक्ष, वनरक्षक संघटना.

पश्‍चिम घाटातील राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड या तालुक्‍यांत घनदाट जंगल आहे. वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा जंगल परिसरात आहेत. अशा वन्यजीवांच्या संवर्धनाचा भाग म्हणून वन विभागातर्फे जंगली भागात कृत्रिम वनतळी तयार केली आहेत. त्यासाठी जवळपास ५० लाखांहून अधिक खर्च झाला आहे. 

गेल्या चार वर्षांत तयार केलेल्या तळ्यांत पावसाचे पाणी साचले. शिवाय जंगली भागातील नैसर्गिक झरे, ओढे, नाल्यांचे पाणी चर काढून अशा वनतळ्यांना जोडले आहे. त्या वनतळ्यांत सध्या पाणीसाठा आहे, तर काही तळ्यांत पावसाळ्याचे पाणी डिसेंबरअखेरपर्यंत टिकून होते. त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढली तशी अनेक वनतळ्यांतील पाणी पूर्णतः संपले आहे.  

अशा वनतळ्यांत अवती भोवतीच्या झाडांचा पालापाचोळा पडला आहे. त्यामुळे तळी बुजून जाणार आहेत. त्याच तळ्यांची येत्या दहा दिवसांत साफसफाई करून पुन्हा पाणी साठवणुकीसाठी तयार केली जाणार आहेत. पावसाच्या एक-दोन सरी जरी पडल्या तरी त्याचे पाणी या तळ्यात साचून राहील. त्यावर पुढील एक-दोन महिने पाणी उपलब्ध होऊ शकेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.  

लहान प्राण्यांना फटका  
गेले सहा महिने ज्या तळ्यांचे पाणी पिण्याची सवय वन्यजीवांना झाली; मात्र तेथील पाणी संपत असल्याने वन्यजीवांचे स्थलांतर होत आहे. त्यातून काही भागांत वन्यजीवांचा वावर कमी झाला, तर कुठे वाढला आहे. विशेषतः धरणालगतच्या पाणी फुगवट्यावर मोठे वन्यजीव येतात; मात्र त्यांच्या भयामुळे लहान प्राणी तिथे जात नाहीत. त्यांना जंगलातील तळ्यांचे पाणी आटून गेल्याने तिथेही पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. ओलवण, देवर्डे, वाकीघोल, जांबरे, साळवण, जुन्नर अशा भागांत वन्यजीव दिसत आहेत, तर पाणी कमी झाल्याचा पहिला फटका वानरांना बसला व ती  रस्त्याकडेला आली आहेत.  

Web Title: Kolhapur News Thirst wildlife special story