थरारक पाठलाग करून पकडले तीन लाखाचे मद्य 

राजेश मोरे
गुरुवार, 31 मे 2018

कोल्हापूर - मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. आजरा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. 

कोल्हापूर - मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. आजरा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. 

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नांवे - शरद बाळू कसलकर (वय 31), अजित आण्णाप्पा तिप्पे (वय 27), आणि सुनील मोहन चौगले (वय 36 तिघे रा. तमनाकवाडा, कागल) अशी आहेत. 

याबाबत विभागाने दिलेली माहिती, आंबोली (ता. सावंतवाडी) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तपासणी नाका आहे. गोवा राज्यातून मद्याची तस्करीवर येथे लक्ष ठेवले जाते. काल सायंकाळी या तपासणी नाक्‍यावरून एक मोटार भरधाव वेगाने जात होती. ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मोटार थांबली नाही. पथकाने या मोटारीचा पाठलाग  केला. इशारा करूनही ती मोटार थांबवत नव्हती. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पथकाने ही मोटार अखेर आजरा गावाच्या हद्दीत अडवली. तेथील चालक शरद कसलकर याच्यासह अजित तिप्पे, सुनील चौगले या तिघांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

मोटारीची तपासणी पथकाने सुरू केली. त्यावेळी त्यात भाजी ठेवण्याचे ट्रे आढेळलेे. ते बाजूला केल्यानंतर त्याच्या पाठीमागे लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे 54 मद्याचे बॉक्‍स पथकाच्या हाती लागले. बाजारभावाप्रमाणे त्याची किमंत 2 लाख 97 हजार 120 रुपये इतकी आहे. मोटारीस पथकाने एकूण 6 लाख 50 हजार 870 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या चार दिवसातील विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे. संशयित तिप्पे याच्यावर चार महिन्यापूर्वी विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. 

निरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक के. बी. निडे, जे. एन. पाटील, कर्मचारी एस. डी. जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, रवी माळगे, वैभव मोरे, आर. एस. पिसे यांनी पाठलाग करून ही कारवाई केली असल्याचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले. 
 

Web Title: Kolhapur News three lakh liquer seized