चंदगड तालुक्यात कलिवडे, बिदरमाळात वाघाची दहशत कायम

सुनील कोंडुसकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

चंदगड - तालुक्‍याच्या कर्नाटक सीमेवरील कलिवडे ते बिदरमाळ हा सुमारे पंधरा-वीस किलोमीटरचा जंगल परिसर वाघाच्या दहशतीखाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत वाघाकडून चार जनावरांवर हल्ला झाला असून, जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या स्थानिक धनगर समाजातील पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे. 

चंदगड - तालुक्‍याच्या कर्नाटक सीमेवरील कलिवडे ते बिदरमाळ हा सुमारे पंधरा-वीस किलोमीटरचा जंगल परिसर वाघाच्या दहशतीखाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत वाघाकडून चार जनावरांवर हल्ला झाला असून, जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या स्थानिक धनगर समाजातील पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे. 

ऐतिहासिक किल्ले कलानंदिगडाच्या पायथ्यापासून ते तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य धरणापर्यंतचा भाग कर्नाटक सीमेलगत आणि घनदाट झाडीने व्यापलेला आहे. याच भागात कलिवडे, किटवडे, बांद्राई, बिदरमाळ हे धनगरवाडे वसले आहेत. शेळ्या-मेंढ्या तसेच देशी गोवंश आणि म्हैस पालनातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दिवसभर जंगलात जनावरे चारण्यासाठी नेली जातात. सध्या पाऊस आणि जंगलात धुक्‍यामुळे दहा, पंधरा फुटांवरील स्थिती दिसून येत नाही. चरण्याच्या नादात जनावरे दूर गेलेली असताना वाघाकडून त्यांच्यावर हल्ला केला जात आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी कलिवडे येथील भैरु म्हाकू जानकर व गोविंद म्हाकू जानकर या सख्या भावांच्या म्हैसींवर वाघाने हल्ला केला. यात भैरु जानकर यांची म्हैस जागीच ठार केली. गोविंद जानकर यांच्या म्हशीवर हल्ला केला; परंतु ती निसटून गावच्या दिशने पळत सुटली. मानेवर गंभीर जखम झाल्याने वाटेतच ती बेशुद्धावस्थेत पडली. वनक्षेत्रपाल एम. एन. परब, वनपाल दयानंद पाटील, एस. डी. गोरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या दोन्ही म्हशींची किंमत सुमारे सव्वा लाख रुपये होते. 
दरम्यान, रविवारी रात्री बिदरमाळ धनगरवाड्यावरील धालू गावडे यांच्या बैलावर वाघाने हल्ला केला.

जनावरांच्या ओरडण्याने जनावरे चारायला घेऊन गेलेल्या मुलांनी तिकडे धाव घेतली. परंतु त्यांना पाहून वाघाने डरकाळी फोडल्याने ते सर्वजण भिऊन वस्तीत परतले. या बैलाचा ठावठिकाणा सापडलेला नाही. याच वस्तीतील जानू गावडे यांचे रेडकूही वाघाच्या हल्यात ठार झाल्याचा संशय आहे. या परिसरात खूप वर्षापासून वाघाचे अस्तित्व आहे. जनावरांवर हल्याचे प्रकारही अधूनमधून होतात. परंतु अलीकडे सलगपणे वाढलेल्या हल्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. 

Web Title: Kolhapur News Tiger seen in Chandgad Taluka