आज कोल्हापूर बंदची हाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

कोल्हापूर - भीमा-कोरेगाव येथील दंगलीचे पडसाद काल कोल्हापुरातही उमटले. दुपारी बिंदू चौकात केलेली वाहनांची मोडतोड, तरुणांनी केलेला दगडफेकीचा प्रयत्न आणि पेटविलेल्या टायरमुळे बिंदू चौकात काही काळ तणाव निर्माण झाला. शहरात विविध ठिकाणीही आज रास्ता रोको व निदर्शने केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

कोल्हापूर - भीमा-कोरेगाव येथील दंगलीचे पडसाद काल कोल्हापुरातही उमटले. दुपारी बिंदू चौकात केलेली वाहनांची मोडतोड, तरुणांनी केलेला दगडफेकीचा प्रयत्न आणि पेटविलेल्या टायरमुळे बिंदू चौकात काही काळ तणाव निर्माण झाला. शहरात विविध ठिकाणीही आज रास्ता रोको व निदर्शने केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

दरम्यान, टाऊन हॉलमध्ये झालेल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज बुधवारी (ता. ३) कोल्हापूर जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बैठकीत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान रात्री जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू करण्यात आला. 

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी बिंदू चौकात आंबेडकरवादी कार्यकर्ते सकाळपासून एकत्र जमू लागले. ‘एकच साहेब, बाबासाहेब’, ‘बाबा तेरे नाम से,  जिते है शान से’ अशा घोषणा देत कार्यकर्ते बिंदू चौकाकडे गटागटांनी येत होते. बिंदू चौकात आल्यानंतर संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्यानंतर बिंदू चौकात राखीव पोलिस दलासह जादा कुमक मागविण्यात आली. त्यामुळे दुपारनंतर बिंदू चौकाला छावणीचे स्वरूप आले. पोलिसांच्या समोरच दुपारी साडेतीनच्या सुमारास बिंदू चौकात काही तरुणांनी टायर पेटवून आणला व घोषणा देण्यास सुरुवात केली. टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. तेथे बघ्यांची गर्दी वाढू लागली. 

परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला. घोषणाबाजी सुरू असतानाच त्या ठिकाणी उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे आले. त्यांची भाषणे झाली. येथून व्यापक आंदोलनाबाबत निर्णय घेण्यासाठी टाऊन हॉलमध्ये बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोर्चाने टाऊन हॉलपर्यंत जाण्याचे ठरले.
बिंदू चौकातून मोर्चा सुरू झाला. मोर्चात काही तरुण हातात काठ्या घेऊनच सहभागी झाले होते. मोर्चात पुन्हा घोषणा देण्यास सुरवात झाली. मोर्चा सुरू होतो न होतो तोच बिंदू चौकात लोकवाङ्‌मयगृहासमोर लावलेल्या वाहनांवर तरुणांनी हल्ला चढविला. वाहनांची तोडफोड करण्यास सुरवात केली.

दगडफेकीचाही प्रयत्न तरुण करू लागले. त्यामुळे परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. काही तरुणांनी गाड्या ढकलून देण्यास सुरवात केली. तरुण आक्रमक झाल्याचे पाहून बंदोबस्तासाठी आलेले पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक अनिल गुजर, निरीक्षक अशोक धुमाळ यांनी धाव घेत तरुणांना आवरले. त्यांना ताकीद दिली. त्यानंतर मात्र मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

वाहनांची तोडफोड सुरू झाल्यानंतर मात्र मोर्चात सहभागी झालेले प्रा. शहाजी कांबळे व उत्तम कांबळे यांनी मोर्चातून न जाण्याचा निर्णय घेतला. बिंदू चौकातून शिवाजी चौकमार्गे कार्यकर्ते टाऊन हॉलमध्ये बैठकीसाठी गेले. बिंदू चौकातील आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. आईसाहेबांच्या पुतळ्यापासून बिंदू चौकाकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला; तर बिंदू चौकातील माधुरी बेकरीजवळून वाहनधारकांना माघारी पाठवण्यात आले. पोलिसांनी चारही बाजूंनी बंदोबस्त ठेवला.

नेत्यांविरुद्ध रोष व्यक्‍त
टाऊन हॉल येथील बैठकीत नेत्यांबद्दल आंबेडकरीवादी तरुण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणारा रोष आज पाहावयास मिळाला. या बैठकीत नेते भाषण करण्याचा प्रयत्न करू लागले; पण त्यांना कार्यकर्त्यांनी बोलू दिले नाही. अनेक कार्यकर्त्यांनी दलित नेत्यांवर शेलक्‍या शब्दांत हल्ला चढविला. बैठकीत अनेक नवीन कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्या सर्वांनी प्रस्थापित दलित नेत्यांवर टीका करत निदान आता तरी शहाणे होऊन एक व्हा, असा सल्ला दिला. त्यावर प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, बी. के. कांबळे, दगडू भास्कर, प्रा. विश्‍वास देशमुख हातात घालून आम्ही एक आहोत असे सांगू लागले. त्यालाही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत फोटोसाठी नको, असे म्हणत सभेतूनच उठून जाऊ लागले. पुन्हा या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना थांबविण्यात आले. यावेळी नेत्यांमुळेच दलित समाजाचे फार मोठे नुकसान झाले असून, हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या वतीने असणार नाही, असे काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. अखेर उद्या (ता. ३) कोल्हापूर जिल्हा अत्यावश्‍यक सेवा वगळून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता बिंदू चौकात जमावे, तसेच बंद शांततेत करावा, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीस विद्याधर कांबळे, डॉ. अनिल माने, सोमनाथ घोडेराव, बी. के. कांबळे, नंदकुमार गोंधळी, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, सुशील कोल्हटकर, सुरेश सावर्डेकर, भाऊसो काळे, गुणवंत नागटिळे, राहूल कांबळे, दिगंबर सकट, प्रिया कांबळे, रमेश पाचगावकर, अब्बास शेख, समीर पटेल, आदम मुजावर, मन्वत पटेल, प्रदीप मस्के, अंकुश वराळे, राजेंद्र ठिकपुर्लीकर, विनोद सडोलीकर, लखन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कावळा नाका येथे रास्ता रोको 
भीमा-कोरेगाव येथील घटनेतील दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी कावळा नाका येथे रास्ता रोको केले. या वेळी दोन्ही बाजूंकडील वाहतूक खोळंबून राहिली. भीमा कोरगाव येथील घटनेचे शहरातही पडसात उमटले. विचारेमाळ परिसरातील कार्यकर्ते सिद्धार्थ चौकात एकत्र आले. त्यांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. त्यानंतर कार्यकर्ते कावळा नाका येथे आले. त्यांनी रस्ता रोको करीत घोषणा दिल्या. दोन्ही दिशांनी कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील वाहने थांबवली. यानंतर पोलिसही दाखल झाले. कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या पोलिसांसमोर मांडल्या. उमेश कांबळे, नीलेश बनसोडे, स्वप्निली बेग, ऋुतू आयवळे, बाबासाहेब चिलवंत, लक्ष्मण वाघमारे, संतोष जगताप आदी उपस्थित होते.
    
दसरा चौकात निदर्शने
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे दसरा चौकामध्ये निदर्शने व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी दोषींना तत्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात डी. जी. भास्कर, नंदकुमार गोंधळी, मानसिंग कांबळे, शिवाजी कांबळे, निवास कांबळे, आर. बी. कोसंबी, रतन कांबळे, तानाजी कांबळे, सुरेश सावर्डेकर, रमेश पाचगावकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Kolhapur News Today called Kolhapur Band