करांनी बिघडविले व्यवसायाचे गणित

डॅनियल काळे
मंगळवार, 12 जून 2018

ट्रक वाहतूक व्यवसायावर अनेक संकटे येत असल्याने आता आम्ही वाहतूक खर्चावर आधारित भाडेआकारणी करत आहोत. इंधन दरवाढीसह अनेक प्रकारच्या करांचे ओझे असल्याने कर भरून ट्रक वाहतूकदारांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शासनाने हे कर कमी करावेत, किमान इंधन तरी कमी दराने द्यावे, अशी आमची मागणी आहे.
- सुभाष जाधव,
अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा.
 

कोल्हापूर - इंधन दरवाढ, टोल आणि आयकरात झालेली भरमसाठ वाढ ट्रक वाहतूकदारांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. एखाद्या ट्रकचे कमानपाटे मोडतात, त्याप्रमाणे ट्रक वाहतूकदारांचे अर्थकारणच मोडून पडले आहे. ‘धंदा नको; पण करवाढ आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे इंधन दरवाढीमुळे भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नाही, तर दुसऱ्या बाजूला व्यापारी वर्ग भाडे वाढवून देण्यास तयार नसल्याने या व्यवसायाचे गणितच फिस्कटले आहे.

महामार्गावरची दारू दुकाने बंद झाल्याने महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी ट्रक वाहतूकदारांच्या करात भरमसाठ वाढ केल्याचे वाहतूक संघटनांचे म्हणणे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ट्रक वाहतूकदार मोठ्या प्रमाणात आहेत. विविध प्रकारची मालवाहतूक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याला आणि परराज्यातही करत असतात. पण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने या व्यवसायाचे गणित बिघडले आहे. वाहतूकदारांना व्यवसाय परवडेनासा झाला आहे. दरवाढ करून द्यायला व्यापारी वर्ग तयार नाही. व्यापाऱ्यांना परवडत नाही. दुसरीकडे इंधर दरवाढीसह अनेक प्रकारच्या करांचा फटका बसत आहे.

थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ
ट्रकला थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमध्ये २६ टक्के वाढ केली आहे. ही वाढ वाहनधारकांना न परवडणारी आहे. जुन्या वाहनांच्या किमतीएवढा थर्ड पार्टी प्रीमियम भरावा लागत आहे. त्यामुळेही वाहतूकदार मेटाकुटीला आले आहेत.

टोल टॅक्‍समध्ये वाढ
टोल टॅक्‍समध्ये १८ टक्‍के वाढ झाली आहे. टोलच्या रस्त्याचे पैसे वसूल झाले तरीही टोल नाके बंद केले जात नाहीत. उलट त्यामध्ये वाढच केली जाते. टोल हा रस्त्यासाठी घेतला जातो. रस्त्यासाठी किती कर द्यायचा. कारण वाहनधारकांकडून रस्त्यासाठी होम टॅक्‍स, ऑल इंडिया परमिट टॅक्‍स, डिझेलवर प्रति लिटर सेस, टोल टॅक्‍स असे कर रस्त्यासाठी घेतले जातात.

करावर कर; सुविधांचा अभाव
ट्रकचालकांकडून अनेक प्रकराचे कर घेतले जातात; पण त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. वाहनतळ नाही, रस्त्यावर विश्रांतीसाठी ठिकाण, ट्रक टर्मिनस अशा कोणत्याच सुविधा नाहीत. या सुविधांअभावी वाहतूकदारांचे हाल होतात.

Web Title: Kolhapur News transport business problems