शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आज प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

कोल्हापूर - शतकोटी वृक्ष लागवडीसाठी हजारो हात पुढे आले आहेत. उद्या शनिवार (ता. 1) पासून सुरू होणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्यात साडेनऊ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठात सकाळी 9 वाजता या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसेच संस्था, संघटनांच्या भक्कम प्रतिसादावर मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभाग व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 

शिवाजी विद्यापीठात वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्य कार्यक्रम होईल. या उपक्रमात महापौर हसीना फरास, खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, संभाजीराजे छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, डॉ. सुजित मिणचेकर आदी सहभागी होतील. 

या मोहिमेसाठी वन विभाग व जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 200 ग्रामपंचायतीच्या मदतीने प्रत्येकी दोनशे वृक्षाची लागवड होणार आहे. त्यासाठी जवळपास 8 लाख रोपे जिल्हाभर पोचवली आहेत. या शिवाय शहरात पाच ठिकाणी वनविभागाच्या स्टॉल्सवर रोपांची विक्री तेजीत सुरू आहे. वनविभागाने स्वतःच्या नर्सरीत 32 लाख रोपे तयार केली आहेत. या मोहिमेत पुढील सात दिवसात जवळपास साडेनऊ लाख वृक्षांची लागवड होईल. 

करवीर वनविभाग, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय भुयेवाडी व टोल विरोधी कृती समितीचे अध्यक्ष निवासराव साळोखे यांच्या वतीने भुयेवाडी येथे लोकसहभागातून एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते भुयेवाडी येथे दुपारी 4 वाजता वृक्ष लागवड मोहीम सुरू होईल. 

शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेची जय्यत तयारी वनविभागाने केली आहे. प्रत्येकाने एक तरी रोप लावावे व ते जगवावे यासाठी वनविभागाने प्रबोधन केले आहे. वनरक्षक, वनपाल, वनमित्र वनविभागाचे सर्वअधिकारी या उपक्रमात सहभागी असणार आहेत. मागेल त्याला रोप देण्याची तयारी वनविभागातून केली आहे. या सर्व उपक्रमांची संगणकीय नोंद वनविभागाकडे होत आहे. 
प्रभूनाथ शुक्‍ला, उपवनसंरक्षक 

व्यापक सहभाग 
वृक्ष लागवड मोहिमेत जिल्हाभरात जवळपास दीड लाख नागरिक तसेच 25 हजारांवर शासकीय व निमशासकीय कर्मचारी, तीन हजारांवर वनविभागाचे कर्मचारी, जवळपास 1500 हून अधिक संस्था, मंडळे यांचा सहभाग राहणार आहे. 

Web Title: kolhapur news tree plantation shivaji university