दोन हेल्मेट देण्याची डीलरना सक्ती - विश्‍वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

कोल्हापूर - दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन हेल्मेट देण्याची कोल्हापूर परिक्षेत्रातील वाहन कंपन्यांच्या डीलरना सक्ती केली जाणार आहे. याच माध्यमातून टप्याटप्याने सर्व शहरात हेल्मेटची सक्ती केली जाईल. त्‍याची अंमलबजावणी १५ जुलैपासून करण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बैठकीत जाहीर केले. 

कोल्हापूर - दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन हेल्मेट देण्याची कोल्हापूर परिक्षेत्रातील वाहन कंपन्यांच्या डीलरना सक्ती केली जाणार आहे. याच माध्यमातून टप्याटप्याने सर्व शहरात हेल्मेटची सक्ती केली जाईल. त्‍याची अंमलबजावणी १५ जुलैपासून करण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बैठकीत जाहीर केले. 

त्याचबरोबर जे डीलर याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारावाई करण्याचे संकतेही त्यांनी दिले. कोल्हापूर परिक्षेत्रात सुरक्षित वाहतूक निर्माण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी ही बैठक बोलवली होती. बैठकीस पाचही जिल्ह्यातील अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षकांसह, प्रादेशिक परिवहन कार्यालाचे अधिकारीही उपस्थित होते. पोलिस अधीक्षक कार्यालयात तब्बल अडीच तास ही बैठक सुरू होती. 
नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘ सुरक्षित वाहतूक हा कानमंत्र घेऊन सध्या पोलिस प्रशासन काम करत आहे. परिक्षेत्रात होणाऱ्या मोटारसायकल अपघाताची वाढती संख्या, त्यात जखमी व मृत पावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर उपाय म्हणून गेल्या महिन्याभरापासून महामार्गावर हेल्मेटची सक्ती करण्यात आली. याबाबत नाकाबंदी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

त्यामुळे हेल्मेट परिधान करणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याचेच फलीत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात मागील महिन्यांच्या तुलनेत १४० अपघात कमी झाले आहेत. जिल्ह्यातील महामार्गावर हेल्मेटची सक्तीबाबत इतर जिल्हयाच्या तुलनेत अधिक परिमाणकारक कारवाई केली जात आहे. त्याचपद्धतीची कारवाई इतर जिल्ह्यातूनही होणे अपेक्षित आहे. 

हेल्मेट सक्ती ही संपूर्ण परिक्षेत्रातील सर्वच शहरात टप्प्याटप्याने केली जाणार आहे. त्याची सुरवातच वाहन कंपन्यांच्या डिलर पासून केली जाईल. दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन हेल्मेट देणे त्यांना सक्ती केली जाईल. जे डिलर याची अमंलबजावणी करणार नाहीत. त्यांच्यावर कलम ६८ अन्वये कारवाई पोलिस प्रशासनाकडून करण्यात येईल. डिलरकडूनच ग्राहकांना गाडीसोबत हेल्मेट मिळाल्याने त्याचा वापर केला जाईल. त्याचा प्रसार आणि प्रचार होईल. त्यातूनच परिक्षेत्रातील सर्वच शहरात टप्याटप्याने हेल्मेटची सक्ती केली जाईल. त्यापूर्वी सर्वेक्षणातून पुढे आलेल्या शहर परसिरात जास्त अपघात घडणाऱ्या भागात मात्र हायवेबरोबर हेल्मेटची सक्ती तातडीने केली जाईल, असेही नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीस पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी, सांगलीचे शशिकांत बोराटे, साताऱ्याचे विजय पवार, पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक शाहू साळवी, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अलवारीस आदी उपस्थित होते. 

पोलिसांकडून उपाययोजना
सुरक्षित वाहतूक हा कानमंत्र घेऊन सध्या पोलिस प्रशासनाचे काम 
कोल्हापूर जिल्ह्यात मागील महिन्यांच्या तुलनेत १४० 
अपघात कमी. 
डीलरकडूनच ग्राहकांना हेल्मेट मिळाल्याने त्याचा वापर वाढण्याची शक्‍यता. 
जास्त अपघात घडणाऱ्या भागात हायवेबरोबर हेल्मेटची 
सक्ती तातडीने.

Web Title: kolhapur news two helmet force gives compulsory to dealers