स्वप्ने मोठी बघा; त्याला पर्याय ठेवूच नका...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

कोल्हापूर - जे काही स्वप्न बघायचे आहे, ते नेहमी मोठं बघा. मात्र त्याला दुसरा कुठलाही पर्याय अजिबात ठेवू नका. झपाटून कामाला लागा. सुरुवातीला अपयश आले तरी खचू नका. नेमके काय चुकते, याची उजळणी करा आणि पुन्हा यशोशिखर सर करण्यासाठी सज्ज व्हा. यशाचे शिखर नक्कीच तुम्ही पार कराल... भारतीय बनावटीचे पहिले विमान तयार करणारे कॅप्टन अमोल यादव आणि साताऱ्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अशा नवचेतना आज साऱ्यांच्या नसानसांत जागवल्या. 

कोल्हापूर - जे काही स्वप्न बघायचे आहे, ते नेहमी मोठं बघा. मात्र त्याला दुसरा कुठलाही पर्याय अजिबात ठेवू नका. झपाटून कामाला लागा. सुरुवातीला अपयश आले तरी खचू नका. नेमके काय चुकते, याची उजळणी करा आणि पुन्हा यशोशिखर सर करण्यासाठी सज्ज व्हा. यशाचे शिखर नक्कीच तुम्ही पार कराल... भारतीय बनावटीचे पहिले विमान तयार करणारे कॅप्टन अमोल यादव आणि साताऱ्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अशा नवचेतना आज साऱ्यांच्या नसानसांत जागवल्या.

निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित फिझिंगा - संजय घोडावत ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी’ या उपक्रमाचे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने आज या संवाद मालिकेची सांगता झाली. टाळ्यांचा कडकडाट आणि स्टॅंडिंग ओव्हेशनने या दोन्ही शिलेदारांचे जोरदार स्वागत झाले. 

दरम्यान, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात हेड (आरओएम) उमेश पिंगळे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे विजयसिंह माने यांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले. मिलिंद कुलकर्णी (पुणे) यांनी श्री. यादव यांच्याशी तर ‘साम-कोल्हापूर’चे ब्युरो संभाजी थोरात यांनी श्री. पाटील यांच्याशी संवाद साधला. 

अमोल यादव यांचे एकत्रित म्हणजे १९ जणांचे कुटुंब. कुटुंब आणि मित्रांच्या पाठबळावरच भारतीय बनावटीच्या विमानाचे स्वप्न पूर्ण करता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेत वैमानिकाचे प्रशिक्षण घेत असताना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी स्वतःचे विमान घेतले. मात्र भारतात परतल्यानंतर आठ वर्षे नोकरी मिळाली नाही आणि त्या दरम्यान भारतीय बनावटीचे विमान अद्यापही उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यावेळी विमान तयार करण्याचा संकल्प केला आणि कामाला लागलो. पहिल्या दोन प्रयत्नांना अपयश आले. तरीही मनुष्यबळ, मटेरियल आणि आर्थिक बळ या तिन्ही गोष्टी उपलब्ध नसताना प्रयत्न सुरूच होते. तिसरा प्रयत्न २००९ ला सुरू केला आणि २०१६ ला सर्व चाचण्या यशस्वी झाल्या. मात्र भारतीय प्रशासनाने अनेक अडचणी निर्माण केल्या. त्यावरही मात करत आता महिन्याभरात या विमानाचे अधिकृत उड्डाण होईल.’’

संदीप पाटील सुद्धा येलूर (ता. वाळवा) गावचे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे खूप मोठे काम. त्यांच्या या एकूण प्रवासाचे विविध पदर त्यांनी उलगडले.

ते म्हणाले, ‘‘नक्षलवाद म्हणजे गरिबांसाठीची नव्हे तर सत्तेची लढाई आणि ती बंदुकीच्या नळीतून जाते. गडचिरोली पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तत्पूर्वीचा इतिहास पहाता सर्वाधिक पोलिस नक्षलवाद्यांच्या बॉम्बस्फोटात शहीद होतात, हे लक्षात आले. पोलिस ठाणी सुमारे साठ आणि बॉम्ब डिस्पोजेबल इक्‍विपमेंटस्‌ फक्त दोन पोलिस ठाण्यात होती. तत्काळ सर्व पोलिस ठाण्यांत ही इक्विपमेंटस्‌ उपलब्ध केली आणि पाचशे पोलिसांना त्याचे प्रशिक्षण दिले. सर्वात मोठे आव्हान होते, विधानसभा निवडणूक यशस्वी करण्याचे. उपलब्ध आठ हजार आणि अतिरिक्त आठ हजार अशा १६ हजार पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही निवडणूक यशस्वी करून दाखवली. या निवडणुकीत एकाही पोलिसाचा बळी गेला नाही. तत्पूर्वीच्या निवडणुकीत मात्र पोलिसांचे बळी ठरलेले असायचे. सरकारची आत्मसमर्पण योजना प्रभावीपणे राबवली आणि दोन वर्षाच्या काळात तब्बल एकशे पाच नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले.’’

आत्मसमर्पण अन्‌ असे बदलले नक्षलवादी
नक्षलवाद्यांशी आणि स्थानिक नागरिकांशी संवादातून नक्षलवाद संपवता येणे शक्‍य असल्याचे स्पष्ट मत संदीप पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘बॉम्ब डिस्पोजेबल इक्विपमेंटस्‌मुळे नक्षलवाद्यांचे हल्ले परतवणे शक्‍य झाले. मात्र नक्षलवाद संपवण्यासाठी त्यांची मानसिकता बदलावी लागते. सुरुवातीला त्यांच्या कमांडरनाच गाठले आणि संवादाची प्रक्रिया सुरू केली. गोपी आणि आयतू यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर मग आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या वाढली. आत्मसमर्पण केलेल्या एकशे पाच जणांमध्ये सोळा दाम्पत्ये आहेत. त्यांचे विवाह करून दिले आणि पुनर्वसन केले.’’ लोकांशी संवाद वाढवण्यासाठी पोलिस ठाण्यात ग्रंथालयांची निर्मिती केली. पहिल्या चार महिन्यातच दहा हजार पुस्तके जमा झाली. लोकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी ग्रंथालयांचा खूप मोठा फायदा झाला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.  

मराठी पोलिसांचे सहकार्य 
अमोल यादव सांगतात, ‘‘मेक इन इंडिया’मध्ये विमान प्रदर्शित करण्यासाठी अधिकृत प्रवेश दिला गेला नाही. तेथेही अपमान झाला. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी विमान आत नेण्यासाठी सहकार्य केले. पासेस मागायला गेल्यानंतर आम्ही आत नियमबाह्य आल्याचे लक्षात आल्यानंतर भावाला पोलिसांना अटक करावी लागली. मात्र दरम्यान टीव्हीवरून भारतीय बनावटीचे पहिले विमान येथे असल्याच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या आणि मग पोलिसांनी चार ऐवजी चाळीस पासेस दिले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी विमानाचे कौतुक केले. पुढे विमान ठेवायला जागा नसल्याची बातमी झळकली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने धुळे विमानतळावर विमान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाली.’’

कोल्हापूरचे कठोर परिश्रम
इथल्या मातीत कठोर परिश्रम करण्याची ऊर्मी असून तिला योग्य नियोजन आणि सातत्याची जोड दिली तर कुठलाही गोष्ट अशक्‍य नाही, असे संदीप पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘एमपीएससी’पेक्षा आता येथील तरूणांनी ‘युपीएससी’कडे वळायला हवे. मात्र हे आव्हान स्वीकारताना ॲकॅडमिक पातळीवरही गुणवत्ता महत्त्वाची आहे. कॉलेज, विद्यापीठात आपण जेव्हा पहिल्या पाच-दहामध्ये गुणवत्ता यादीत असून तेव्हा पुढे आपल्याला राज्यात, देशात पहिल्या शंभरात स्थान मिळेल.’’ 

अकार्यक्षम ‘डीजीसीए’ अन्‌ कोल्हापूरचे विमानतळ

भारताच्या स्वातंत्र्यानंतर नागरी विमान चालन (डीजीसीए) संचालनालयाचा कारभार अकार्यक्षम राहिला, असे सांगून कॅप्टन अमोल यादव म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याच्या काळापासून भारतात सुमारे चारशे आणि महाराष्ट्रात तीसहून अधिक विमानतळे आहेत. मात्र आजही महाराष्ट्रात केवळ चार विमानतळावरूनच उड्डाण होते. हे सारे चित्र आहे ते केवळ चार डोक्‍यांनी निर्णय घेणाऱ्या ‘डीजीसीए’मुळे. विमान तयार केल्यानंतर ‘डीजीसीए’कडे रजिस्ट्रेशनसाठी नोंदणी केल्यानंतर टाळाटाळ झाली. ‘मेक इन इंडिया’मध्ये विमान लक्षवेधी ठरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही कार्यवाही झाली नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी पत्रव्यवहार केला.

पंतप्रधानांनी त्यांना जमेत नसेल तर काढून टाका, असा आदेश दिल्यानंतर मग ‘डीजीसीए’ खडबडून जागे झाले आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तत्काळ पूर्ण झाली. ‘डीजीसीए’ने अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली. पण हरलो नाही, अखेरपर्यंत लढत राहिलो.’’

कोल्हापूरच्या विमानतळासाठी आजही सर्वच पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. मात्र ते सुरू होत नाही. शेजारी नेपाळमध्ये मात्र भौगोलिक परिस्थिती चांगली नसतानाही विमानतळे सुरू आहेत. त्या तुलनेत कोल्हापूरचे विमानतळ कैक पटीने अधिक चांगले आहे. १९३६ मध्ये राजाराम महाराजांनी ही सुविधा येथे उपलब्ध केली आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी आपलीही मागणी आहे. शेवटी मीसुद्धा कोल्हापूरच्या मातीतलाच. माझे आजोळ कोल्हापूर आहे, असेही त्यांनी सांगितले.  

Web Title: Kolhapur News Urja Sanwad Dheyawadyanshi Sakal Event