साहित्य संमेलनांना विरोधाची भूमिका चुकीची - प्रा. माधव वझे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

माणसांना एकत्र आणणाऱ्या साहित्य संमेलनांना विरोधाची ही भूमिका चुकीची आहे,' असे मत नाट्यसमीक्षक प्रा. माधव वझे यांनी व्यक्त केले. 

उत्तूर - "आजच्या इंटरनेटच्या आभासी जगात माणसांच्या गाठीभेटी दुर्मिळ झाल्या आहेत. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनांतून माणसे एकत्र येत आहेत. त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होत आहे. मात्र, संमेलनांच्या आयोजनांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पैशाची उधळपट्टी होत असल्याची ओरड केली जात आहे. माणसांना एकत्र आणणाऱ्या साहित्य संमेलनांना विरोधाची ही भूमिका चुकीची आहे,' असे मत नाट्यसमीक्षक प्रा. माधव वझे यांनी व्यक्त केले. 

येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेतर्फे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रा. वझे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे अध्यक्षस्थानी होते. स्वागताध्यक्ष रवींद्र आपटे, जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, साहित्यिक जोतिराम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र शाळेच्या मैदानावर हे साहित्य संमेलन झाले. 

समाजभान असणारी तरुण पिढी घडविणे हे साहित्यिकाचे मुख्य काम आहे. त्यामुळे साहित्यिकांनी नव्या पिढीच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची आवश्‍यकता आहे. समाज घडविणाऱ्या अशा साहित्य चळवळींची समाजाला खरी गरज आहे. कारण यातून माणसाची जडणघडण होत असते. त्याच आधारावर माणूस यशोशिखरावर पोचू शकतो. 

-  प्रा. चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक

सरपंच वैशाली आपटे यांनी स्वागत केले. श्रीकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष रवींद्र आपटे यांनी उत्तूरमधील शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला क्षेत्राचा आढावा घेतला. सदानंद पुंडपळ यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. 

अनंतराव आजगावकर, राम देशपांडे, रवींद्र जोशी, लेखिका नीलम मानगावे यांचा विशेष सत्कार झाला. बाबूराव शिरसाट यांना साहित्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सदानंद पुंडपळ, संजीवनी फडके, संतोष पाटील, सुनील कांबळे, आर. जी. सोलापुरे, रेखा पोतदार, माधुरी कुंभीरकर, श्रीकांत नाईक यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यिक शि. गो. पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव विश्‍वनाथ भोसले, उपसरपंच सचिन उत्तूरकर, टी. के. पाटील, सुहास पोतदार, देशभूषण देशमाने, महेश करंबळी आदी उपस्थित होते. 

राबणारे हात... 
संमेलनासाठी जिल्हा परिषद सदस्यापासून माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत साऱ्यांचे हात राबत होते. तहानेने व्याकुळलेल्या श्रोत्यांना पाणी जागेवर आणून देत शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे वाटा उचलला. करवीर प्रशालेचे (कोल्हापूर) झांजपथक, कसबा सांगाव येथील हलगी वादकांनी संमेलनात रंग भरला. 

Web Title: Kolhapur News Uttur Marathi Sahitya Sammhelan