प्रबळ जिद्दीच्या बळावर मिळविला हरविलेला सूर

सुधाकर काशीद
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

हा विजय पाठक, हरहुन्नरी गायक. कोल्हापुरात कोणाचा वाढदिवस, कोणाचे लग्न, कोणाचे काहीही आनंदाचे निमित्त असूदे. विजयची मैफल ठरलेली. सोबत तबल्यावर चंदू कागले असला, की रात्री उशिरापर्यंत मैफल रंगलेली. त्यामुळे विजय कोणाला माहीत नाही, असे नाही; पण गेली तीन वर्षे विजय त्याचे सूरच हरवून बसला. त्याच्या स्वरतंतूवर गाठ झाली आणि त्याच्या सुराची लयच बिघडली. नेहमी सुराच्या साथीने जगणारा विजय एकलकोंडा झाला; पण म्हणतात ना, असा एक क्षण येतो, की तो पुन्हा आयुष्याला उभारी देऊन जातो.

कोल्हापूर -  हा विजय पाठक, हरहुन्नरी गायक. कोल्हापुरात कोणाचा वाढदिवस, कोणाचे लग्न, कोणाचे काहीही आनंदाचे निमित्त असूदे. विजयची मैफल ठरलेली. सोबत तबल्यावर चंदू कागले असला, की रात्री उशिरापर्यंत मैफल रंगलेली. त्यामुळे विजय कोणाला माहीत नाही, असे नाही; पण गेली तीन वर्षे विजय त्याचे सूरच हरवून बसला. त्याच्या स्वरतंतूवर गाठ झाली आणि त्याच्या सुराची लयच बिघडली. नेहमी सुराच्या साथीने जगणारा विजय एकलकोंडा झाला; पण म्हणतात ना, असा एक क्षण येतो, की तो पुन्हा आयुष्याला उभारी देऊन जातो. तसा एक क्षण विजयच्या आयुष्यात आला. स्वरतंतूवर अतिशय जोखमीची शस्त्रक्रिया करून, तो पुन्हा जिद्दीने आठ-आठ तास रियाझ करू लागला आणि आश्‍चर्य असे, की आपला हरवलेला सूर पुन्हा मिळवण्यात विजय विजयी झाला.

आपला हा पुन्हा गवसलेला सूर तो कोल्हापुरातल्या रसिकांना अर्पण करणार आहे. गेली तीन-साडेतीन वर्षे सूर मिळवण्यासाठी जिद्दीने झगडणाऱ्या विजयच्या मैफलीचे आयोजन त्याचा अफाट असलेला सारा मित्र परिवार करत आहे. विजय पाठकच्या जिद्दीची ही कथा खूप क्‍लेशदायक प्रवासाची; पण चांगल्या शेवटाची आहे. विजय पाठक व चंदू कागले ही जोडी कोल्हापुरात मैफलीच्या माध्यमातून घराघरात पोचलेली. या जोडीला कसलाही गाण्याचा प्रकार वर्ज्य नाही. अगदी नाट्यगीत, गझलपासून ते अलीकडच्या उडत्या चालीच्या गीतांनाही ते सादर करायचे. 

मैफलीचे निमित्त, श्रोत्यांचा कल यांवर ते मैफल रंगवत जायचे. दोस्तीवर गाणी म्हणायची ठरवली, तर तीन-तीन तास दोस्त, मैत्री, स्नेह यांवर आधारितच गाणी सादर करायचे. असा कोणताही एक वर्ग राहिला नाही, की त्यांनी त्यांच्यासमोर आपली कला सादर केली नाही;

पण तीन वर्षांपूर्वी विजयला गाणे गाताना अधून-मधून त्रास जाणवू लागला. आवाज फाटू लागला. तपासणी केली, तेव्हा स्वरतंतूवरच एक गाठ असल्याचे स्पष्ट झाले. गाठ म्हटलं, की कॅन्सर ही आपल्या बहुतेकांची समजूत. अर्थात विजयही गाठ पाहून हबकून गेला. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता; पण शस्त्रक्रियेतून गाठ निघेल; मात्र स्वरयंत्रालाच धोका पोचण्याची भीती होती; पण विजय शस्त्रक्रियेला तयार झाला आणि शस्त्रक्रियेनंतर डॉक्‍टरांनी येथून पुढे स्वरयंत्राला ताण द्यायचा नाही अशी सूचना केली. ही सूचना म्हणजे गाणे बंदची ‘नोटीस’ होती;

पण विजयने ठरवले, आपण सराव करत करत पुन्हा स्वरयंत्राला मूळ पदावर आणायचे. त्यानुसार त्याने गेली तीन वर्षे रोज आठ तास रियाझ सुरू ठेवला आणि त्याला आता खात्री झालीय, की त्याचा स्वर त्याच्याकडे परत आलाय. 

श्रेय रियाज व श्रोत्यांना 
विजय या साऱ्याचे श्रेय रियाजाला आणि त्याचे सूर पुन्हा ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या मित्रांना, स्नेह्यांना, श्रोत्यांना देतो. म्हणूनच तो त्यांच्यासाठी येत्या काही दिवसांत मैफल आयोजित करणार आहे आणि हरवलेला सूर कसा पुन्हा पकडून आणला, हे सारं सुरातून सांगणार आहे.

Web Title: Kolhapur News Vijay Pathak human interest story