पुजाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्री तावडेंनी राजीनामा द्यावा 

पुजाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्री तावडेंनी राजीनामा द्यावा 

कोल्हापूर - "अंबाबाई मूर्तीची झीज झालेली नाही,' अशी चुकीची माहिती सभागृहात देऊन पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचे पाप करणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी आठवड्यात सभागृहाची आणि कोल्हापूरकरांची माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा,'' अशी मागणी आज पुजारी हटाव कृती समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

श्री. पवार म्हणाले, ""करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाबाबात आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्‍नावर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी खोटी उत्तरे दिली. मूर्तीची झीज झालेली नाही, त्यामुळे संवर्धनाची प्रक्रिया निकामी ठरली की नाही, हा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. हे पूर्णतः चुकीचे आणि पुजाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठीचे उत्तर मंत्री तावडे यांनी दिले आहे. त्याबद्दल त्यांनी आठवड्यात सभागृहाची आणि कोल्हापूरकरांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापूर बंद केले जाईल.'' 

श्री. देवणे म्हणाले, ""तावडे यांनी चुकीची माहिती देऊन धर्मद्रोह केला आहे. त्यांनी अंबाबाईचरणी नतमस्तक होऊन कोल्हापूरकरांची माफी मागावी. अन्यथा राजीनामा द्यावा. आम्ही रस्त्यावरचे आहोत. पुढे रस्त्यावर उतरायची वेळ आली तरीही मागे हटणार नाही.'' 

इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, ""भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिलेला अहवाल मंत्री तावडेंनी पाहिलेला नाही. मूर्तीमधून तीन किलो एमसील व 750 ग्रॅम धातूच्या पट्ट्या आढळल्या आहेत. 1955 मध्ये त्या नव्हत्या, असे मॅनेजर सिंग यांनी अहवालात म्हटले आहे. मूर्तीच्या उजव्या मानेकडे खांद्याचे तीन भाग एमसीलने जोडलेले अहवालात नमूद केले आहे. यावरून पुजारी मूर्तीची किती हेळसांड करतात, हे दिसून येते. त्यानंतर मूर्तीची काळजी घेण्याबाबत पुजाऱ्यांना लेखी कळवूनही अद्याप सुधारणा झालेली नाही. असे असताना मूर्तीची झीज झाली नाही, असे मंत्री तावडे म्हणत असतील तर त्यांनी पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केल्याचे दिसून येते. त्यांनी आठवड्यात माफी मागावी अन्यथा त्यांच्यासाठी कोल्हापूर बंद करू.'' 

डॉ. सुभाष देसाई म्हणाले, ""आजपर्यंत पाच वेळा वज्रलेप झाला आहे. तरीही मूर्तीची अवस्था वाईट आहे. मूर्तीची हेळसांड केल्याबद्दल पुजाऱ्यांवर आयपीसी 295 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.'' 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे म्हणाल्या, ""मंत्र्यांनी माहिती घेऊन उत्तर देणे अपेक्षित होते. त्यांची चुकीची माहिती देऊन भावना दुखावल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. न्याय व विधी विभागाकडून आमच्याकडे माहिती मागविल्यास आम्ही मूर्तीची वस्तुस्थिती काय आहे. संवर्धनादरम्यान तयार झालेली सीडीच त्यांना देऊ.'' 

समितीचे सदस्य शरद तांबट म्हणाले, ""देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे. मंत्री तावडे यांनी मूर्तीची झीज झालेली नाही, असे अभ्यास न करता, माहिती न घेता वक्तव्य केले ते खोटे आहे.'' 

ऍड. चारूशीला चव्हाण म्हणाल्या, ""मंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन सर्वांची दिशाभूल केली आहे. त्यांनी तातडीने माफी मागून त्यांचे सभागृहातील उत्तर मागे घ्यावे. अन्यथा होणाऱ्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल.'' 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव म्हणाले, ""चुकीची माहिती सभागृहात देण्यापूर्वी आम्हाला माहिती विचारणे अपेक्षित होते. आमच्याकडे कोणतीही माहिती न विचारता चुकीचे उत्तर मंत्री तावडे यांनी दिले आहे.'' 

स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर म्हणाले, ""मंत्री तावडे यांनी तातडीने माफी न मागितल्यास त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवून देऊ. ते कोल्हापुरात जेव्हा येतील तेव्हा त्यांना कोल्हापूर बंद करू. आठ दिवसांत त्यांनी माफी मागावी अन्यथा कोल्हापूरकरांशी गाठ आहे.'' 

"ती' सीडी सभागृहात दाखवा ः संजय पवार 
संजय पवार म्हणाले, ""अंबाबाई मूर्ती संवर्धनाचे काम 2016 मध्ये झाले. तेव्हा चित्रीकरण करून सीडी तयार केली आहे. ही सीडी तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी स्वतःकडे ठेवली. बदली झाल्यानंतर त्यांनी ती देवस्थान समितीकडे दिली. देताना हा बॉंब आहे जपून ठेवा, असे सांगून गेले आहेत. मूर्तीची किती हेळसांड झाली, हे या सीडीतून दिसून येते. एमसील लावून काही भाग जोडले आहेत. हीच सीडी मंत्री तावडे यांनी दोन्ही सभागृहांत दाखवून त्यांचे खोटे उत्तर मागे घ्यावे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com