कोल्हापूरात विधान परिषदेसाठीच्या मतदार संख्येत ५८ मतांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

कोल्हापूर - जिल्ह्यात दोन नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायती, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आलेले ११ नगराध्यक्ष व काही नगरपंचायतींत वाढलेली सदस्यसंख्या यामुळे विधान परिषदेसाठीच्या मतदार संख्येत ५८ मतांची वाढ झाली आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात दोन नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायती, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आलेले ११ नगराध्यक्ष व काही नगरपंचायतींत वाढलेली सदस्यसंख्या यामुळे विधान परिषदेसाठीच्या मतदार संख्येत ५८ मतांची वाढ झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून चार वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंत जिल्ह्यात आणखी दोन तरी नव्या नगरपंचायती होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या मतदार संख्येत आणखी वाढ होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी गटातून कोल्हापूर जिल्ह्यात एक विधान परिषदेची जागा आहे. या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरपालिकांचे नगरसेवक मतदार आहेत. कोल्हापूर महापालिकेचे विद्यमान नगरसेवक वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान सदस्य हेच चार वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे मतदार असणार आहेत. 
जिल्ह्यात पूर्वी नऊ नगरपालिका व एका महापालिकेचे नगरसेवक मतदार होते.

अलीकडेच हुपरी व आजरा या नव्याने दोन नगरपंचायती झाल्या आहेत. हुपरीची निवडणूक झाली आहे, तर आजरा नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय शिरोळ, गारगोटी व चंदगडला नगरपंचायतींसाठी प्रयत्न सुरू आहेत. २०१५ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी ३८२ मतदार होते. दोन वाढलेल्या नगरपंचायती, काही नगरपालिकांतील वाढलेली सदस्यसंख्या व थेट नगराध्यक्ष झालेले ११ जण यांमुळे यात आता ५८ मतांची भर पडून मतदारसंख्या ४४० झाली आहे. 

कागल नगरपालिकेत तीन, इचलकरंजी नगरपालिकेत ५, तर जयसिंगपूर नगरपालिकेत चार नगरसेवक वाढले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना बदलण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६७ आहे. हेच सदस्य आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणार असल्याने त्यात वाढ झाली तर त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत होईल. हुपरी व आजरा या दोन गावांसाठी नगरपंचायती मंजूर झाल्या. त्यामुळे ही दोन गावे जिल्हा परिषदेच्या गटातून वगळली जाण्याची शक्‍यता आहे. या दोन गावांच्या नावानेच जिल्हा परिषदेचे गट आहेत. हुपरीतून स्मिता शेंडुरे, तर आजऱ्यातून जयवंत शिंपी हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. 

 

Web Title: Kolhapur News voter numbers for the Legislative Council have increased by 58 votes