‘आधारकार्ड’वर मतदान शक्‍य

 लुमाकांत नलवडे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  पैसे काढण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही एटीएमचा वापर करता, त्याच पद्धतीने कोठूनही एटीएमच्या धर्तीवर मतदान करणे शक्‍य होणार आहे. केवळ आधारकार्ड क्रमांकावर मतदान करता येईल... असे संशोधन शिवाजी विद्यापीठातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेक्‍नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये झाले आहे.

कोल्हापूर -  पैसे काढण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही एटीएमचा वापर करता, त्याच पद्धतीने कोठूनही एटीएमच्या धर्तीवर मतदान करणे शक्‍य होणार आहे. केवळ आधारकार्ड क्रमांकावर मतदान करता येईल... असे संशोधन शिवाजी विद्यापीठातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेक्‍नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये झाले आहे. यामुळे निवडणुकीसाठी राबणारी प्रचंड यंत्रणा वाचणार आहे. पर्यायाने पैसे आणि वेळही वाचवून खऱ्या अर्थाने ‘डिजिटल इंडिया’कडे पाऊल पडणार आहे. निवडणूक विभागाने याची दखल घ्यावी असेच हे संशोधन आहे.

एव्हीएम मशिनमध्ये फेरफार केला जात असल्याचे आरोप छोट्या-मोठ्या निवडणुकीत होत आहेत. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही असा आरोप केला होता. आरोपात किती तथ्य आहे? तथ्य आहे किंवा नाही? हा विषय चर्चेचा बनला. हीच मतदान प्रक्रिया सोपी करण्यासाठी एक वर्षापूर्वीपासून मतदारांची, प्रशासकीय यंत्रणेची होणारी धावपळ वाचविण्यासाठी आधार लिंक ऑनलाईन मतदानप्रक्रियेचे संशोधन शिवाजी विद्यापीठात सुरू झाले. प्रत्येक मतदाराला एटीएम हाताळण्याच्या पद्धतीने मतदान करता यावे, यासाठी हे संशोधन झाले आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेक्‍नॉलॉजी डिपार्टमेंटचे प्रोफेसर डॉ. प्रदीप भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्‍ट्रॉनिक एम.टेक.ची विद्यार्थिनी प्रियांका शेंडगे हिने हा प्रोजेक्‍ट यशस्वी केला. प्रोजेक्‍ट प्रत्यक्षात अमलात आला, तर बोगस मतदान रोखले जाईल. मतदानासाठी कमीत कमी यंत्रणा वापरता येईल. पैसा, वेळ दोन्ही वाचणार असल्याचे डॉ. भास्कर आणि प्रियांकाने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

काय असेल प्रक्रिया...
एटीएमसारखे छोटे यंत्र आहे, जे एव्हीएमच्या जागी वापरले आहे. यंत्रात आधार कार्ड क्रमांक दिल्यानंतर मतदानासाठी प्रक्रिया सुरू होईल. संबंधित मतदार तोच आहे, हे ओळखण्यासाठी यंत्राकडून त्याचे ठसे घेतले जातात. आधार कार्डवरील ठसे आणि मतदाराचे ठसे जुळले तरच मतदानाची पुढील प्रक्रिया सुरू होते. ज्या पद्धतीने एटीएममधून पैसे काढताना पर्याय येतात, त्या पद्धतीने उमेदवारांची यादी समोर येते. त्यांपैकी एकाला मतदान करता येईल. चुकून मतदान चुकीचे झाले, तरीही ते रद्द करून पुन्हा मतदान करता येते. ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आहे. 

कोठूनही मतदान करा
पुण्यातील मतदार कोल्हापुरात असेल, तर तो पुण्यातील मतपत्रिका या यंत्रावर मिळवू शकतो. येथूनच तो पुण्यातील उमेदवाराला मतदान करू शकतो. कोल्हापुरातील उत्तर मतदारसंघातील व्यक्ती दक्षिण मतदारसंघातील उमेदवाराला त्याच्या केंद्रावरून मतदान करू शकते. अशा प्रकारचीही इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा या यंत्रात बसविण्यात आली आहे. कोणीही कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून ज्या पद्धतीने पैसे काढू शकतो, अशीच प्रक्रिया येथे आहे.

मनुष्यबळ कमी होईल
केवळ एक यंत्रच ठेवले; तरीही मतदानप्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. बोटाला शाई लावणे, मतदार क्रमांक पाहणे यांसह इतर यंत्रणा येथे वापरण्याची गरज भासणार नाही. मतदानानंतर मोजणीपर्यंत त्याच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा वापरावी लागणार नाही. एव्हीएम यंत्रांची वाहतूक ज्या पद्धतीने करावी लागते, त्या पद्धतीची गरज भासणार नाही. एका क्‍लिकवर सर्व मतदान प्रक्रिया ‘सेंटर’ला येईल. तेथे त्याची मोजणी होईल. कोणत्या मतदान केंद्रावर किती मतदान झाले, याचीही नोंद तेथे येईल.

यंत्रात काय केले आहे?
यंत्र तयार करताना ‘आधार कार्ड’ लिंक करून मतदारांची नोंदणी ऑनलाईन रेकॉर्डवर घेतली आहे. एका सेंटरवरून त्याची ‘लिंक’ दिल्यास ज्या ठिकाणी एटीएमसारखे यंत्र असेल, तेथे मतदानप्रक्रिया सुरू होऊ शकते. इंटरनेटद्वारे ही प्रक्रिया तयार केली आहे. एटीएमसारखे यंत्र केवळ मतदानाची नोंदणी करते आणि ते मुख्य सेंटरकडे पाठवून देते. यामुळे गोपनीयता कायम राहते. केवळ मतदानच नव्हे; तर एखाद्या सर्व्हेसाठी मतदानप्रक्रियासुद्धा या यंत्रावरून वापरता येऊ शकते.

आधार लिंकद्वारे मतदानप्रक्रिया राबविण्याच्या सोप्या पद्धतीचे संशोधन झाले आहे. बायोमेट्रिक सिस्टीममुळे बोगस मतदान रोखण्यास मदत होईल. ही यंत्रणा सुरक्षित राहील, यासाठी प्रयत्न केले आहेत. आणखी प्रयत्न सुरू आहेत. वेळ, पैसा आणि कष्ट कमी करण्यासाठी हे संधोशन महत्त्वाचे ठरेल. लवकरच याचे पेटंट मिळेल, त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
 - डॉ. प्रदीप भास्कर, 
    मार्गदर्शक

शिवाजी विद्यापाठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञान विभागात संशोधनाचे काम सुरू आहे. संशोधनातून देशात सुरू असलेली मतदानप्रक्रिया ऑनलाइन करण्याचा, अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘डिजिटल इंडिया’च्या स्वप्नाचा हा एक टप्पा म्हणावा लागेल.
 - डॉ. जयदीप बागी, 
    विभागाचे संचालक

Web Title: kolhapur news voting on adharcard is possible