वारणानगर रोकड लूट प्रकरणः खोलीतील ती रोकड जी. डी. पाटील यांची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

वारणानगर - येथील वारणा शिक्षण मंडळाच्या विश्‍वस्तांना अंधारात ठेवून संस्थेचे तत्कालीन सचिव जी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून डोनेशन रूपात घेतलेली बेहिशेबी रक्कम वारणा शिक्षण मंडळाच्या कॉलनीतील ‘त्या’ खोलीत ठेवण्यात आली होती.

वारणानगर - येथील वारणा शिक्षण मंडळाच्या विश्‍वस्तांना अंधारात ठेवून संस्थेचे तत्कालीन सचिव जी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून डोनेशन रूपात घेतलेली बेहिशेबी रक्कम वारणा शिक्षण मंडळाच्या कॉलनीतील ‘त्या’ खोलीत ठेवण्यात आली होती.

त्यापैकीच १५ कोटी रुपये चोरीला गेले. रकमेची मालकी सांगून फिर्याद देणारे झुंजारराव सरनोबत यांची रक्कम असल्याची थोडीही शक्‍यता नाही. त्यामुळे सचिवांच्या मालमत्तेची, बॅंक खात्यांची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी आज विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना दिले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. शिक्षक कॉलनीत कोट्यवधीची चोरी करून राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. 

याबाबत श्री. जाधव म्हणाले, ‘‘वारणा शिक्षण मंडळाचे तत्कालीन सचिव पाटील यांच्या ताब्यात असलेल्या खोलीत संस्थेचे जुने रेकॉर्ड आहे. याच खोलीत विद्यार्थ्यांकडून डोनेशन स्वरूपात घेतलेली बेहिशेबी रक्कम ठेवली होती. या खोलीत श्री. पाटील यांचे येणे-जाणे होते. त्यांच्याकडे काही काळ चालक म्हणून काम करणाऱ्या मैनुद्दीन मुल्ला (जाखले) यास माहिती असल्याने त्याने ८ मार्च २०१६ ला कोट्यवधीच्या रकमेवर डल्ला मारला.

घटना उघडकीस आल्यानंतर पाटील यांचे नातेवाईक सरनोबत (कोल्हापूर) यांचा काहीही संबंध नसताना कोडोली पोलिसांत ही रक्कम माझीच असल्याचे सांगितले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनीच त्यातील नऊ कोटी ३० लाख रुपयांवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले. खोलीतील पंचनाम्यात एक कोटी २७ लाख रुपये सापडले होते.

फिर्यादी श्री. सरनोबत वारंवार रकमेचा आकडा बदलत राहिले. त्यामुळे ही रक्कम त्यांची नाही, हे स्पष्ट होते. मात्र, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप श्री. जाधव यांनी करून पोलिसांनी या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांकडे चौकशी केली असती तर या खोलीकडे श्री. सरनोबत कधीच फिरकले नव्हते, शिवाय पोलिस पंचनाम्यावेळी त्या खोलीची व कपाटाची किल्लीही त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे कुलपे तोडून पंचनामा केल्याचे चित्रीकरण पोलिस रेकॉर्डवर आहे; तर सचिवांची या ठिकाणी मात्र सतत ये-जा असल्याने ही रक्कम नेमकी कोणाची, हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही, असा सवालही त्यांनी केला.

कोट्यवधींची मालमत्ता
सचिव जी. डी. पाटील कोलोली (ता. पन्हाळा) येथील रहिवासी असून, २५ वर्षांपूर्वी वारणा बझारमध्ये सेल्समन होते. त्या वेळी त्यांची आर्थिक स्थिती सामान्य होती. सध्या वारणानगर येथे बंगला, अमृतनगर येथे जागा, बहिरेवाडी येथे पत्नीच्या नावे अपार्टमेंट, तळसंदे (ता. हातकणंगले) येथील जमीन, कागल पंचतारांकित वसाहतीत उभारत असलेला औषधांचा कारखाना, कोल्हापुरात बंगला व फ्लॅट, पुण्यात फ्लॅट, सांगली जिल्ह्यातील येळावी येथील जमीन या सर्व स्थावर मिळकती कोट्यवधीच्या असून, ही सर्व बेहिशेबी मालमत्ता वारणा शिक्षण मंडळाच्या संस्थाचालकांना अंधारात ठेवून संस्थेची फसवणूक करून मिळविली आहे. सरनोबत चोरीच्या रकमेचा आकडा बदलत आहेत. या रकमेचा नेमका मालक कोण? हे शोधून श्री. पाटील यांनी २० वर्षांत खरेदी केलेली मालमत्ता व बॅंक खात्यांची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे श्री. विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती श्री. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Kolhapur News Warnanagar Money Robbery Case