चूक मीटर रीडरची; झळ मात्र नागरिकांना

युवराज पाटील
गुरुवार, 8 जून 2017

आठ हजार कनेक्‍शनधारकांना फटका - चार महिन्यांची पाणी बिले थकीत, विलंब आकाराचा भुर्दंड 

कोल्हापूर - मीटर रीडर कामावर हजर न झाल्याचा फटका चंद्रेश्‍वरसह पद्माराजे उद्यान, दुधाळी तसेच राजलक्ष्मीनगर प्रभागातील नागरिकांना बसला आहे. चार महिन्यांची बिले थकीत असल्याने विलंब आकारापोटी चार महिन्यांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

आठ हजार कनेक्‍शनधारकांना फटका - चार महिन्यांची पाणी बिले थकीत, विलंब आकाराचा भुर्दंड 

कोल्हापूर - मीटर रीडर कामावर हजर न झाल्याचा फटका चंद्रेश्‍वरसह पद्माराजे उद्यान, दुधाळी तसेच राजलक्ष्मीनगर प्रभागातील नागरिकांना बसला आहे. चार महिन्यांची बिले थकीत असल्याने विलंब आकारापोटी चार महिन्यांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

शहरात घरगुती वापराची लाखभर कनेक्‍शन आहेत. घरफाळा विभागानंतर पाणीपट्टी हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. शहरात ४५ मीटर रीडर आहेत. तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी सहा महिन्यांपासून स्पॉट बिलिंग सक्तीचे केले आहे. मीटर तपासले की जागेवर बिल, अशी कार्यपद्धती आहे. दोन महिन्यांच्या पाणी बिलात सांडपाणी अधिभाराचा समावेश असतो. कसबा बावडा येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारल्याने अधिभारापोटी बिलातून जादाची रक्कम होते. मूळ बिलाचा विलंब आकार आणि अधिभार असे गणित असते. दुधाळीचा काही भाग, चंद्रेश्‍वर प्रभाग, पद्माराजे उद्यान आणि राजलक्ष्मीनगर प्रभागाचा काही भाग मिळून सुमारे आठ ते दहा हजार कनेक्‍शन्स आहेत. 

तत्कालीन मीटर रीडरची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर अन्य एकाची नेमणूक या भागात झाली. मात्र हा मीटर रीडर कामावर हजरच झाला नाही. नागरिक आज बिल येईल, उद्या येईल, या प्रतीक्षेत होते. मात्र गेल्या दोन-चार दिवसांपासून मीटरची तपासणी सुरू झाल्यानंतर चार महिन्यांपासून बिल का नाही आले, अशी विचारणा केली तर मीटर रीडर गैरहजर असल्याचे कारण देण्यात आले. यात विशेष असे की पाणीपट्टी अधीक्षकांच्या ध्यानात ही बाब लवकर आली नाही. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे बिलेही वाढून येणार, अशी मानसिकता लोकांची झाली होती.

चार महिन्यांची दोन बिले थकल्याने पाणी वापराप्रमाणे विलंब आकाराचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे. आठ ते दहा हजार मीटरचे ‘रीडिंग’, नंतर प्रत्यक्ष बिलिंग असे काम नव्याने करावे लागणार आहे. ‘एक ना धड भाराबर चिंध्या’ असा कारभाराचा नमुना पुढे आला आहे. बिले उशिराने येणे यात नागरिकांचा दोष नाही. जी काही तडजोड आहे ती पाणीपुरवठा विभागाच्या वसुली विभागालाच करावी लागणार आहे. 

अधीक्षकांचे दुर्लक्ष ? 
संबंधित रीडरला नोटीस बजावली गेली खरी; पण पाणीपट्टी अधीक्षकांच्या ध्यानी ही बाब वेळेत का आली नाही, असाही प्रश्‍न आहे. पाणीपुरवठा विभागाकडील मीटर रीडर चर्चेचा विषय ठरतात. त्यात आणखी एकाची भर पडली आहे.

Web Title: kolhapur news water meter reading issue