अधिकृत कमी, अनधिकृत जादा

लुमाकांत नलवडे
सोमवार, 22 जानेवारी 2018

ज्या बाटली आणि कॅनला पॅकिंग आहे, त्यावर शुद्ध पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असे म्हटले आहे, अशांवरच कारवाई केली जाऊ शकते. कारवाईची प्रक्रिया सुरूच असते. किटली अर्थात पाण्याचे हॅण्डल असलेल्या कॅनवर जे बंद नाहीत अशांवर कारवाई केली जात नाही. लवकरच त्याबाबतचे आदेश येतील. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. तक्रार असल्यास संपर्क साधावा.
- सुकुमार चौगुले, सहायक आयुक्त (अन्न)

कोल्हापूर - जिल्ह्यातील शुद्ध आणि अशुद्ध पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शुद्ध पाण्यासाठी ‘बीएसआय’मार्क मिळविलेले उत्पादक साधारणपणे २६, तर नॉन ‘बीएसआय’ उत्पादक ४२ असल्याची स्थिती आज जिल्ह्यात आहे. ग्राहकांनीही शुद्ध-अशुद्ध याची खात्री करूनच पाणी घेतल्यास आपोआपच अशुद्ध पाणीउत्पादकांना चाप बसेल. ज्या ठिकाणी शक्‍य आहे, तेथे अन्न व औषध प्रशासन कारवाई करत आहे. ज्यांना अशुद्ध पाण्याबाबत तक्रार करावयाची आहे, त्यांनी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलशेजारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात संपर्क साधावा.

जिल्ह्यात बाटलीबंद आणि बंद कॅनमधून शुद्ध पाण्याची विक्री केली जाते. प्रत्यक्षात बाटलीबंद आणि कॅनबंद शुद्ध पाणीउत्पादकांनी ‘आयएसआय’- सध्याचा ‘बीआयएस’चा परवाना घेणे आवश्‍यक आहे; तरीही जिल्ह्यात बीएसआयचा परवाना घेणारे अधिकृत उत्पादकांच्या दुप्पट अनधिकृत उत्पादक असल्याची माहिती पुढे आली. प्रत्यक्षात जे पाणी उत्पादकांकडून विक्री केले जाते, त्याला जादा पैसे देऊन ग्राहक खरेदी करतात; मात्र तेच शुद्ध आहे की नाही यावर संशय व्यक्त होत आहे. ज्या उत्पादकांकडून असे पाणीविक्री केले जाते, आवश्‍यक परवाना नसतो. त्यांच्याकडे लॅबोरेटरी नसते. 

‘बीआयएस’ काय असते ?
‘बीआयएस’ ही एक संस्था आहे. बीआयएस अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (भारतीय मानक ब्युरो). राज्य शासनाची पुरस्कृत ही संस्था आहे. शुद्ध पाण्याचे उत्पादन करण्यासाठी या संस्थेकडून बीआयएसचे प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक असते. पूर्वी याला आयएसआय असे संबोधले जात होते. आता ते बीआयएस म्हणून ओळखले जाते. प्रमाण ठरविणारी ही संस्था आहे म्हणून त्यांच्या प्रमाणपत्राला महत्त्व आहे.

प्रमाणपत्र आवश्‍यक
बीआयएसचे प्रमाणपत्र घेणारा उत्पादक प्रति वर्षी साधारण एक लाख रुपयांचे शुल्क अदा करतो. तसेच त्याच्या उत्पादन कंपनीत विशेष लॅबोरेटरी असते. तेथे पाणी तपासूनच त्याची विक्री केली जाते; मात्र अनधिकृत उत्पादक बीआयएसचे प्रमाणपत्र घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे लॅबोरेटरी नसते. परिणामी त्यांच्याकडून उत्पादित झालेले शुद्ध पाणी शुद्ध असतेच याची खात्री नसते. म्हणून बीआयएसचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

‘एफएसएसएआय’ काय असते ?
फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड ऑथॉरेटी ऑफ इंडिया. ‘बीआयएस’चे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ‘एफएसएसएआय’चे प्रमाणपत्र घ्यावे लागते. एक हजार लिटरपर्यंत रोज उत्पादन असेल, तर वार्षिक तीन हजार, एक ते दोन लिटरपर्यंत रोज उत्पादन असेल तर पाच हजार शुल्क भरावे लागते.

ग्राहकांनी दक्षता घ्यावी
बाटलीबंद किंवा पॅकिंग कॅनमध्ये शुद्ध पाणी घेणाऱ्या ग्राहकांनी संबंधित उत्पादक हा ‘बीआयएस’ प्रमाणपत्र घेतलेला आहे काय ? याची खात्री करावी. त्यांच्याकडील उत्पादन अधिकृत आहे की नाही, याची माहिती घ्यावी. कॅन आणि बाटलीबंद वर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असे म्हटले आहे काय, याची खात्री करावी. विकत घेतलेले पाणी शुद्ध आहे यासाठी हे महत्त्वाचे आहे.

शुद्ध पाण्यासाठी ५८ चाचण्या होतात.
 १ लिटर शुद्घ बाटलीबंद पाणी वीस रुपयांना विक्री होते.
 जिल्ह्यात बीआयएसची नोंदणी असणारे उत्पादक - २६
 जिल्ह्यात बीआयएसची नोंदणी नसणारे उत्पादक - ४२
 कळंबा, उचगाव, हलोंडी, कागल, नवलेवाडी (पन्हाळा), आजरा, वाडीरत्नागिरी (पन्हाळा) येथील अनधिकृत प्लॅन्टवर कारवाई झाली.

Web Title: kolhapur news water supply illegal more and legal less