कोल्हापूरात दारूच्या कराचा पेट्रोलवर भार...

सुनील पाटील
बुधवार, 24 जानेवारी 2018

कोल्हापूर -  राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्री दुकाने बंद केल्यानंतर शासनाला मिळणारा अबकारी कर बंद झाला. त्याचा भुर्दंड पेट्रोलवर लादला. प्रतिलिटर पेट्रोलमागे ११ रुपये कर वाढला.

कोल्हापूर -  राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्री दुकाने बंद केल्यानंतर शासनाला मिळणारा अबकारी कर बंद झाला. त्याचा भुर्दंड पेट्रोलवर लादला. प्रतिलिटर पेट्रोलमागे ११ रुपये कर वाढला. आता मद्यविक्री दुकाने सुरू झाली; पण पेट्रोलवरील वाढविलेल्या कराचे नाव बदलून व्हॅटवरील सेस नावाने प्रतिलिटर ९ रुपयांचा जिझिया कर वसूल केला जात आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या भडक्‍यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दैनंदिन बदलणाऱ्या कच्च्या तेलाच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलचे दर बदलतात. चार महिन्यांत सव्वाशे वेळा दरवाढ झाली. केंद्र सरकार पेट्रोलच्या मूळ किमतीवर २५ टक्के व्हॅटची किंमत आकारते. तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट आकारला जातो. हे सर्व प्रकारचे कर आकारले जात असताना राज्य शासन यात व्हॅट आणि व्हॅटवरील सेस म्हणून प्रतिलिटर पेट्रोलमागे ९ रुपये आकारत आहे. वास्तविक हा कर पूर्वी मद्यविक्री दुकान बंद झाल्याने शासनाला मिळणारा टॅक्‍स कमी झाला म्हणून घेतला जात होता.

शासनाच्या पेट्रोल दरवाढीमागे व्हॅटवरील सेस आहे. पेट्रोल दरवाढ झाली तर सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम होतो. सरकारने ९ रुपये तत्काळ कमी करावेत. केवळ महाराष्ट्रातच पेट्रोल दरवाढ असल्याने सर्वसामान्य लोकांवर वाईट दिवस आले आहेत. 
- योगेश पवार,
शिवाजी पेठ

दारू दुकाने बंद झाल्यानंतर ११ रुपये हा दर आकारला जात होता. यात केवळ दोन रुपयांची कपात केली. पण अधिभार या नावाने घेतल्या जाणाऱ्या कराचे सध्या नाव बदलून पेट्रोल व्हॅटवरील सेस म्हणून प्रतिलिटर मागे ९ रुपये, तर डिझेलवर १ रुपया आकारला जात आहे. पेट्रोल व्हॅटवरील सेस म्हणून आकारल्या जाणाऱ्या या टॅक्‍सच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा खिसा कापला जात आहे. सरकार जरी मनमानी टॅक्‍स लावत असले तरी विरोधी पक्षही सक्षमपणे भूमिका बजावत नाहीत, हेच यावरून सिद्ध होते.

कर कमी केल्यास पेट्रोल ७१ रुपये 
शासनाने विनाकारण वाढविलेला प्रतिलिटर ९ रुपये सेस कमी केल्यास प्रतिलिटर पेट्रोल ७१ रुपयाला मिळू शकते. यासाठी आता विरोधकांनी, विविध संघटनांनी दबाव तंत्राचा वापर करण्याची गरज आहे. 

पावणेचार कोटींची लूट
शहरात सुमारे २५० पेट्रोल पंप आहेत. या प्रत्येक पंपावरून सुमारे प्रतिदिन १५०० लिटर पेट्रोलची विक्री होते. दिवसाला सुमारे पावणेचार लाख लिटर पेट्रोल विक्री होते. याच पेट्रोल विक्रीतून प्रतिलिटर आकारला जाणारा ९ रु. सेसच्या माध्यमातून ग्राहकांच्या खिशातून तब्बल ३ कोटी ७५ लाखांची लूट होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News wine tax on petrol