आजऱ्यात ‘यामफ्लाय’ फुलपाखरांचा आढळ

रणजित कालेकर
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

यामफ्लाय (loxura atymnus) हे एक लिकांलेडी फॅमिलीमधील पश्‍चिम घाटात आढळणारे सुंदर फुलपाखरू आहे. ते मुख्यतः पश्‍चिम घाटाच्या दाट जंगलात आढळते. ते जेथे आढळते तो भाग जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध मानला जातो. 

आजरा -  फुलपाखरू... बालवयात ओळख झालेला आणि पुढे आयुष्यभर मित्रत्वाची साथ निभावणारा सोबती. परसात, शाळेतील बागेत, माळरानावरील गवतांच्या पात्यावरील फुलपाखरू पकडण्यासाठी किती धावाधाव व्हायची. मोठ्या प्रयत्नाने ओंजळीत आलेले फुलपाखरू जरा ती सैल होताच पुन्हा उडून जायचे. त्याच्या विविध रंगछटा, आकार मनाला भुरळ घालायचे. अशाच प्रकारची फुलपाखरे आंबोली, आजरा परिसरांत पाहायला मिळतात. त्यांपैकी ‘यामफ्लाय’ या फुलपाखरांचा आढळ आजऱ्यात असल्याचे निरीक्षणातून पुढे आले आहे. 

यामफ्लाय (loxura atymnus) हे एक लिकांलेडी फॅमिलीमधील पश्‍चिम घाटात आढळणारे सुंदर फुलपाखरू आहे. ते मुख्यतः पश्‍चिम घाटाच्या दाट जंगलात आढळते. ते जेथे आढळते तो भाग जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध मानला जातो. 

आंबोलीसारख्या जैवविविधतेच्या संपन्न भागात या फुलपाखरांची रेलचेल असते; पण आजरा भागातही यांची संख्या वाढली आहे. सध्या सर्वत्र या फुलपाखरांचा मुक्त संचार सुरू आहे. दुर्मिळ फुलपाखरांच्या दर्शनाने आजरावासीयांना फुलपाखरू निरीक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. आताचा हंगाम फुलपाखराचे मिलन, अंडी, कोष यासाठी खूप उपयोगी आहे; पण या वेळी पडणाऱ्या पावसाने फुलपाखरांच्या संख्येत घट होत आहे. परसात देशी झाडे अधिक असल्यास आपल्याला फुलपाखरांचा मुक्त संचार आपल्या घराजवळही पाहायला मिळेल, अशी स्थिती आहे. 

देशी झाडांचे महत्त्व
फुलपाखरांचा अधिवास हा देशी झाडांच्या सान्निध्यात बहरतो. येथील पर्यावरणाला पूरक असलेल्या देशी झाडांची संख्या जिथे जास्त आहे तिथे या फुलपाखरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. त्यामुळे परसात देशी झाडे लावणे गरजेचे आहे. रासायनिक औषधांच्या फवारण्या टाळायला हव्यात, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

ब्ल्यू बॉर्डर प्लेन दुर्मिळ
आजऱ्यात ‘यामफ्लाय’ या फुलपाखरांबरोबरच ‘ब्ल्यू बॉर्डर प्लेन’ या दुर्मिळ फुलपाखरांचेही दर्शन होत आहे. तालुक्‍यात अनेक प्रकारची फुलपाखरे पाहावयास मिळतात. यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. 

आपल्या बागेत, घराशेजारी विविध प्रकारच्या अळ्या असतात. त्या घातक नसून फुलपाखरांची अंडी, जाळी, कोष अशी फुलपाखरांची एकेक अवस्था असते. या अळ्या जपण्याचे काम झाले पाहिजे.
- उमाकांत चव्हाण,  पक्षी, प्राणी अभ्यासक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Yamfly loxura atymnus found in Ajara