सळसळत्या उत्साहात ‘यिन’साठी मतदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंतची इर्षा, मतदानासाठी रांगलेल्या रांगा व मतदानाचा सळसळता उत्साह, अशा वातावरणात शहरातील तीन महाविद्यालयांत झालेल्या ‘यिन’च्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. महाविद्यालयातील नेतृत्वाला वाव देणाऱ्या ‘यिन’ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीत इर्षेने मतदान झाले. 

कोल्हापूर - उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंतची इर्षा, मतदानासाठी रांगलेल्या रांगा व मतदानाचा सळसळता उत्साह, अशा वातावरणात शहरातील तीन महाविद्यालयांत झालेल्या ‘यिन’च्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. महाविद्यालयातील नेतृत्वाला वाव देणाऱ्या ‘यिन’ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीत इर्षेने मतदान झाले. 

शहाजी छत्रपती महाविद्यालय व सायबर महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया झाली, तर शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजमधील निवडणूक बिनविरोध झाली. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) निवडणुका घेतल्या. मतमोजणीस शनिवारी (ता. १२) दुपारी तीनला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

शहाजी छत्रपती महाविद्यालयात संजय संतोष पाटील (बी.ए.- भाग तीन), आशिष बाबासाहेब पाटील (बी. ए.- भाग एक), योगेश दशरथ कुरणे (बी.ए.- भाग तीन) हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 

त्यांनी जोरदार प्रचाराने निवडणुकीत रंगत आणली होती. प्रत्येकाने वर्गनिहाय प्रचाराचा धडाका लावल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचीच चर्चा होती. 

सकाळी साडेनऊला महाविद्यालयात मतदानास सुरवात होताच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या रांगा लागल्या. तिन्ही उमेदवार मतदारांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत होते. मतदार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऑनलाईन पद्धतीने मतदान केले. मतदानानंतर विजयाचा काटा कोणाच्या बाजूने झुकणार, याची जोरदार चर्चा झाली. महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना या निवडणुकीचा अनुभव घेता आला. निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. प्रशांत पाटील, डॉ. राहुल मांडणीकर, डॉ. शिवाजी जाधव यांनी काम पाहिले.

सायबरमध्ये दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत मतदान झाले. आशा शिंदे (एमएसडब्ल्यू- भाग १) व सुकन्या सुरेंद्र शेलार (एमएसडब्ल्यू- भाग १) या दोन उमेदवार रिंगणात होत्या. वैयक्तिक भेटीगाठींसह ‘यिन’ प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर कोणत्या विषयांवर प्रकाशझोत टाकणार, याविषयीची माहिती वर्गांमध्ये दिली होती. साडेतीनला ऑफलाईन पद्धतीने मतदान प्रक्रियेस सुरवात झाली. मतदान केंद्राबाहेर दोन्ही उमेदवारांनी मतदारांचे स्वागत केले. विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावत उत्स्फूर्त मतदान केले. निवडणूक अधिकारी म्हणून शर्वरी इंगवले, मानसी हावळ, श्रद्धा गाडगीळ, आकांक्षा नीळकंठ, डॉ. दीपक भोसले यांनी काम पाहिले. ‘यिन’चे समन्वयक सूरज चव्हाण यांनी संयोजन केले.

न्यू कॉलेजमधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे होती. मात्र, महाविद्यालयाने निवडणूक अनोखी ठरवून सौरभ शंकर चौगुले (बी. ए.- भाग ) याला बिनविरोध निवडणूक दिले. त्याच्याविरोधात एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. त्याची बिनविरोध निवड जाहीर होताच, समर्थकांनी जल्लोष केला. प्राचार्य डॉ. नागेश नलवडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला.

आज (शुक्रवारी) निवडणूक होणारी महाविद्यालये व वेळ

सायबर महिला महाविद्यालय  सकाळी ९ : ३०

महावीर महाविद्यालय  सकाळी ११ : ३०

डी. के. टी. ई. (इचलकरंजी)  दुपारी १ : ०० 

कन्या महाविद्यालय (इचलकरंजी)  सकाळी १० : ०० 

उमेवार म्‍हणतात...

यिन हे तरूणाईच्या नेतृत्त्वाला बळ देणारे व्यासपीठ आहे. निवडणुकीच्या माध्यमातून हे व्यासपीठ तरूणाईतील सुप्त गुणांना फुंकर घालत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात मी होते. आपण विजयी होण्यासाठी मतदारांची मने परावर्तीत करण्यासाठी काय काय करावे, याचा अनुभवच मला या निवडणुकीने दिला. हा अनुभव माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरेल. 
 - आशा शिंदे (सायबर)

निवडणुकीचा अनुभव माझ्यासाठी खास होता. सकाळपासून निवडणुकीत काय होणार, याचे दडपण होते. मात्र, स्वत:मधील नेतृत्त्वाला सिद्ध करायचे तर भीती कशाला बाळगायची, असा विचार केल्याने माझ्यावरील दडपण नाहीसेच झाले. निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही. त्यापेक्षा मी निवडणुकीला सामोरे गेले, हे महत्त्वाचे आहे. 
- सुकन्या शेलार (सायबर) 

राजकारणात तरूणांनी आले पाहिजे, असे म्हटले जाते. पण, त्यांना व्यासपीठ उपलब्ध केले जात नाही. ‘सकाळ’ने तरूणाईला दिशा देण्यासाठी उपलब्ध केलेले हे व्यासपीठ आम्हाला स्फूर्ती देणारे आहे. ‘सकाळ’ने असेच आमच्या पाठीशी राहून आम्हाला दिशा दाखवत राहावी. 
 - आशिष बाबासाहेब पाटील, (शहाजी छत्रपती महाविद्यालय) 

आज मतदानादिवशी महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. निवडणुकीतून आपण कोणते मुद्दे मांडायला हवेत, त्यातून काय परिणाम साधला जाईल, हे कळण्यास मदत झाली. 
 - योगेश दशरथ कुरणे, (शहाजी छत्रपती महाविद्यालय)  

मी विजयी झालो तर आनंदच होईल. मात्र, पराभव झाला तरीही मी आनंदीच असेन. कारण या निवडणुकीत मला जे शिकायला मिळाले, ते मला माझ्या पुढील आयुष्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल. निवडणुकीत माझ्या बाजूने ज्यांनी सहकार्य केले, त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे. 
- संजय पाटील (शहाजी छत्रपती महाविद्यालय)

Web Title: kolhapur news yin election