झूम प्रकल्पावर अधिकाऱ्यांना बसविले कचऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कोल्हापूर - कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. झूम प्रकल्पावर कचरा टाकण्याचे बंद करावे, अन्यथा कचऱ्याची वाहने अडवू, असा इशारा कसबा बावडा येथील नागरिकांनी दिला. या वेळी नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेला धारेवर धरले.

कोल्हापूर - कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. झूम प्रकल्पावर कचरा टाकण्याचे बंद करावे, अन्यथा कचऱ्याची वाहने अडवू, असा इशारा कसबा बावडा येथील नागरिकांनी दिला. या वेळी नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेला धारेवर धरले.

झूम प्रकल्पाला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी तसेच कचऱ्यापासून तयार होणाऱ्या विद्युत निर्मिती प्रकल्पास भेट देण्याच्या कार्यक्रमाकडे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी पाठ फिरविल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्‍त केली. 
‘आग विझेपर्यंत तुम्ही येथून हलायचे नाही,’ असे सांगत अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, पर्यावरण अधिकारी विराज कोप यांना कचऱ्याच्या ढिगातच खुर्च्या टाकून बसविले. त्यानंतर अग्निशमनचा बंब व टॅंकर दाखल झाला.

झूम प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. याची पाहणी करण्यासाठी साडेदहा वाजण्याच्या सुमारास महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार या ठिकाणी आले. नगरसेवक अशोक जाधव यांनी  परिसरातील समस्यांची माहिती दिली. प्रकल्पाचा येथील नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगितले. दरम्यान, महापालिकेचे पदाधिकारी आल्याचे समजल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी कचऱ्यामुळे आरोग्य धोक्‍यात आले आहे. वारंवार महापालिकेला सांगूनही काही फरक पडत नाही. येथे कचरा आणून टाकला जातो. दोन दिवसांपूर्वी येथे लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर अजूनही बाहेर पडत आहे. ही आग विझविण्याचा प्रयत्न महापालिकेकडून झाला नाही, प्रथम ही आग विझवावी आणि येथे कचरा टाकण्याचे बंद करावे. अन्यथा कचऱ्याची वाहने अडविली जातील, असा इशारा नागरिकांनी दिला.

नागरिकांच्या प्रश्‍नांचा भडिमार सुरू होता, या वेळी आरोग्य निरीक्षक वगळता अन्य अधिकारी नव्हते. काँग्रसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी कचऱ्याचा एवढा प्रश्‍न गंभीर आहे, त्याला आयुक्‍त उपस्थित नाहीत. हे योग्य नाही. त्यांना बोलाविण्याचा आग्रह धरला. त्यांनी अस्सल कोल्हापुरी भाषेत त्यांचा समाचार घेतला. त्यामुळे आतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर यांना बोलावून घेतले. या वेळी कचऱ्यासंदर्भात काय नियोजन केले, याची माहिती डॉ. पाटील यांनी द्यावी, असे सांगितले.  श्री. पाटणकर, डॉ. पाटील, पर्यावरण अभियंता विराज कोप यांच्यासह महापालिकेचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक आग लागलेल्या ठिकाणी गेले.

दुर्गंधीमुळे नगरसेवकांचा काढता पाय
महापालिकेचे पदाधिकारी झूमची पाहणी करत असतानाच त्या ठिकाणी शहरातून आणलेला मैला कचऱ्याच्या ढिगाच्या बाजूला ओतत असल्याचे दिसले. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरल्याने सर्व नगरसेवकांनी तेथून काढता पाय घेतला.

आग विझवेपर्यंत तुम्ही इथून हलायचे नाही, असे म्हणत त्यांना झूम प्रकल्पावर असलेल्या कचऱ्याच्या ढिगात खुर्च्यांवर बसविले. नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी, ‘जर कचऱ्याच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढची पिढी प्रदूषणामुळे बरबाद होईल’, अशी भीती व्यक्‍त केली. शेवटी महापौर सौ. यवलुजे यांनी झूम प्रकल्पाला लागलेली आग तातडीने विझविण्याचे आदेश दिले. या वेळी उपमहापौर पाटील, स्थायी सभापती डॉ. नेजदार, सभागृहनेता प्रवीण केसरकर, नगरसेवक श्रावण फडतारे, लाला भोसले, प्रतापसिंह जाधव, मोहन सालपे, सुभाष बुचडे, संजय मोहिते, नगरसेविका माधुरी लाड, वृषाली कदम, उमा इंगळे, रूपाराणी निकम, स्मिता माने आदी उपस्थित होते.

समस्या सोडविणार -  महापौर
झूम प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने याच ठिकाणी आहेत. येथील निवासस्थानाच्या काही तक्रारी आहेत. त्याबाबत येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी महापौर यवलुजे यांची भेट घेऊन कॉलनीतील समस्या मांडल्या. यावर महापौर यवलुजे यांनी त्यांना प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

झूमवर फेब्रुवारीअखेर कचरा टाकण्याचे बंद - डॉ. पाटील
आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील म्हणाले, ‘‘कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प फेब्रुवारीअखेर पूर्ण होईल. त्यानंतर झूमवर कचरा टाकण्याचे बंद करण्यात येईल. याशिवाय शहरातील चार प्रभागांत ५ टन क्षमतेचे बायोगॅस प्लँट उभारण्यात येत आहेत. त्यांपैकी पुईखडी येथील प्रकल्प पूर्ण झाला आहे. लक्षतीर्थ येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित दोन प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होईल. दरम्यानच्या काळात टोप येथील जागेचा प्रश्न निकालात लागण्याची शक्‍यता आहे. निकाल लागल्यानंतर या ठिकाणी इनर्ट मटेरियल टाकण्यात येईल. यानंतर झूम प्रकल्पावर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘पुढे काय करायचे ते सांगू नका, आता लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काय करणार ते सांगा.’’ यावर डॉ. पाटील यांनी झूमची सध्याची परिस्थिती पाहता काही दिवस थांबावे लागणार असे सांगितले. 
 

 

Web Title: Kolhapur News Zoom project Issue