उपऱ्यांच्या धुसफुसीमुळे भाजप नेत्यांची डोकेदुखी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

कोल्हापूर -  स्थानिक पातळीवरील सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्यासाठी भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला करत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांना पायघड्या घालत त्यांना निवडून आणले, पदेही दिली; मात्र या पदाधिकाऱ्यांची आपापसांतील धुसफूस आता पक्षाची डोकेदुखी बनू लागली आहे. जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद व गटनेत्यांमधील धुसफूस दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी अनुभवी म्हणून ज्यांच्यावर टाकली, ते स्वयंघोषित अध्यक्षच बनले. त्यामुळे भाजप सदस्यांची चांगलीच गोची झाली आहे. 

कोल्हापूर -  स्थानिक पातळीवरील सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्यासाठी भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला करत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांना पायघड्या घालत त्यांना निवडून आणले, पदेही दिली; मात्र या पदाधिकाऱ्यांची आपापसांतील धुसफूस आता पक्षाची डोकेदुखी बनू लागली आहे. जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद व गटनेत्यांमधील धुसफूस दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी अनुभवी म्हणून ज्यांच्यावर टाकली, ते स्वयंघोषित अध्यक्षच बनले. त्यामुळे भाजप सदस्यांची चांगलीच गोची झाली आहे. 

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या सुरवातीलाच भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत अचानक गटनेते हे नव्याने पद निर्माण करून जो वाद निर्माण केला, तो आजअखेर कायम आहे. स्वराज्य संस्थांवर पकड मिळवण्यासाठी भाजपने कॉंग्रेस, शिवसेनेमधील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना गळ टाकण्यास सुरवात केली. दोन्ही कॉंग्रेसच्या संधिसाधू नेत्यांना कंटाळलेले कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागले. त्यात राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अरुण इंगवले व सर्व पक्षाचे पाणी पिऊन आलेले विजय भोजे यांचाही समावेश आहे. अरुण इंगवले मूळचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते; पण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते राष्ट्रवादीत गेले. जिल्हा परिषदेत ते ज्येष्ठ सदस्य आहेत. यापूर्वी त्यांची अध्यक्ष होण्याची संधी हुकली होती. म्हणून भाजपच्या नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदाचा शब्द देऊन भाजपमध्ये आणले होते, असे बोलले जाते. निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली, तेव्हा इंगवले यांचे नाव शेवटच्या क्षणी मागे पडले. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पदे निर्माण करण्यात तरबेज असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत गटनेता हे नवीन पद निर्माण केले आणि त्याची माळ इंगवले यांच्या गळ्यात घातली. 

निवडणूक झाल्यानंतर भाजप आघाडीच्या सदस्यांची पहिलीच बैठक झाली. त्यात पक्षप्रतोद म्हणून विजय भोजे यांची निवड झाली. भोजे हे चळवळीतील पण तयारीचे कार्यकर्ते. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, मनसे, स्थानिक आघाडी अशा मार्गे गेल्या निवडणुकीत ते भाजपमध्ये आले. त्यांच्या कार्यालय प्रवेश कार्यक्रमाची लगबग सुरू असताना अचानकपणे त्यांच्या कार्यालयात गटनेता म्हणून अरुण इंगवले यांची खुर्ची व टेबल मांडण्याच्या सूचना स्वत: इंगवले यांनीच प्रशासनाला दिल्या. त्यामुळे आता ऐकायचे कोणाचे? असा प्रश्‍न पडला. शेवटी पक्षप्रतोदच्या कार्यालयावर इंगवले यांचे अतिक्रमण झालेच. ही गोष्ट भोजे यांना रुचली नाही. त्यांनी कार्यालय प्रवेश कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. तेव्हापासून आजअखेर या दोघांमध्ये धुसफूस सुरू आहे. 

जुन्या कार्यकर्त्यांत चर्चा 
शाहू पुरस्काराच्या निमित्ताने ही दरी आणखी वाढली. या कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून भोजे नाराज झाले. यावरूनही इंगवले व भोजे यांच्यात वादावादी झाली. "तुम्ही आम्हाला शिकवू नका' अशा शब्दात भोजे यांनी गटनेते इंगवले यांना सुनावले होते. भाजपमध्ये बाहेरून आलेल्या या उपऱ्या पदाधिकाऱ्यांमधील वादाची भाजपचे जुने कार्यकर्ते मात्र चवीने चर्चा करत आहेत.

Web Title: kolhapur news zp bjp