सांगलीत ऊस दराचा कोल्हापूर पॅटर्नच ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

सांगली - उसाला प्रतिटन पहिली उचल एफआरपीपेक्षा 175 रुपये जास्त देण्याच्या निर्णयावर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखादारांनी एकमत जाहीर केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत तोडगा निघाला. तोच पॅटर्न सांगली जिल्ह्यातील कारखादारांनी राबवावा अन्यथा, या भागातील कारखाने चालू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. आता हे घोडे चर्चेत अडणार की शनिवारी कोयता पडणार, याकडे लक्ष असेल. 

यावर्षी देशातील साखर उत्पादनात 30 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत घट अपेक्षित आहे. जगभरातील साखर उत्पादनात घट होणार आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात साखरेचे दर 3500 रुपयांपेक्षा खाली येणार नाहीत, याची खात्री झाली आहे. कारखानदारांनी बाजारपेठेचा हा अंदाज लक्षात घेऊन एकरकमी विनाकपात एफआरपीची तयारी दर्शवली होती. स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी त्यावर सहमती दर्शवली नाही. 3200 रुपये शक्‍य आहे, हे हिशेब घालून स्पष्ट केले. त्यामुळे एफआरपीपेक्षा जास्त किती सांगा, यावर चर्चा अडली होती. ती आज सुटली. प्रतिटन उसाला एफआरपीपेक्षा 175 रुपये जास्त देण्याचा निर्णय घेण्यात आला. चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत त्याला हिरवा कंदील दाखवला गेला. 

हाच दर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मान्य करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील हे दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे हा निर्णय सांगलीसाठीही लागू होतो, असा दावा स्वाभिमानीच्या नेत्यांनी केला आहे. अर्थात, या बैठकीला सांगलीचे कारखानदार उपस्थित नव्हते. शिवाय, वाहतुकीचे अंतर हा सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने चर्चेचा मुद्दा बनू शकतो. त्यामुळे चर्चेशिवाय सांगलीकर कारखानदार होकार देतात की स्वतंत्रपणे चर्चेचे आवतन दिले जाते, यावर बरेच अवलंबून आहे. यंदाचा हंगाम सुरू व्हायला केवळ दोन दिवस बाकी आहेत. 5 नोव्हेंबरपासून गळीत सुरू होतोय. त्यावर कोयता पडणार की चर्चेत घोडे अडणार याकडे लक्ष असणार आहे. 

कारखाने व एफआरपी 
* कारखाना * उतारा * एफआरपी 
* हुतात्मा * 13.28 * 3215 
* क्रांती * 12.50 * 3026 
* केन ऍग्रो * 11.60 * 2809 
* दालमिया * 12.35 * 2990 
* महांकाली * 10.83 * 2622 
* माणगंगा * 10.26 * 2484 
* मोहनराव शिंदे * 12.02 * 2910 
* राजारामबापू (साखराळे) * 12.90 * 3123 
* राजारामबापू (वाटेगाव) * 12.85 * 3111 
* सर्वोदय * 13.00 * 3147 
* जत * 10.82 * 2620 
* श्री श्री * 11.01 * 2665 
* सोनहिरा * 12.68 * 3070 
* उदगिरी शुगर्स * 11.76 * 2847 
* वसंतदादा * 10.74 * 2601 
* विश्‍वास * 11.75 * 2845 
* यशवंत * 10.78 * 2610 

Web Title: Kolhapur pattern sugarcane rates in sangli