कौल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपने प्रथमच जोरदार मुसंडी मारली, तर शिवसेनेनेही दहा जागा जिंकून जिल्हा परिषदेतील आपले बळ वाढवले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांना अनेक ठिकाणी फटका बसला. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर नेमका कोणता घटक मतदारांवर प्रभावी ठरला हे जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्या माध्यमातून २२ प्रश्‍न मतदारांना विचारण्यात आले.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपने प्रथमच जोरदार मुसंडी मारली, तर शिवसेनेनेही दहा जागा जिंकून जिल्हा परिषदेतील आपले बळ वाढवले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांना अनेक ठिकाणी फटका बसला. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर नेमका कोणता घटक मतदारांवर प्रभावी ठरला हे जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्या माध्यमातून २२ प्रश्‍न मतदारांना विचारण्यात आले. त्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक नेतृत्वाचा अभाव असल्याचे मत अनेकांनी नोंदविले आहे, तर या दोन्ही पक्षांनी विश्‍वासहर्ता गमवल्याचाही कौल मतदारांनी दिला आहे. या दोन बाबी काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यास कारणीभूत ठरत आहेत. नेतृत्वाच्या अभावामुळे २३ टक्के, नेत्यांमधील मतभेदामुळे २७ टक्के आणि विश्‍वासार्हता गमावल्याचे ३२ टक्के लोकांनी आपली मते नोंदविली आहेत.

जिल्ह्याची निवडणूक गटा-तटावर आधारित झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी पक्षाच्या ‘नेतृत्वाचा चेहरा’ही या निवडणुकीत परिणाम करणारा प्रमुख घटक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार या तिघांचे पक्ष नेतृत्व मतदारांना मान्य आहे; परंतु काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडे मात्र पाठ फिरवल्याचे दिसते. मतदान करताना मतदारांनी विविध बाबींचाही बारकाईने विचार केल्याचे सर्वेक्षणातून जाणवते. नोटाबंदीचा परिणाम म्हणून शेतीमालाचे भाव पडले. काहींचे नुकसानही झाले; मात्र त्याचा परिणाम मतदारांनी धुडकावून लावल्याचे दिसून येते. ५८ टक्के मतदारांनी ‘नोटाबंदी’ हा मुद्दाच नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर त्याचा प्रभाव नसल्याचे ५९ टक्के मतदारांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातील मतदारांवर शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्‍न आजही कायम आहे. २९ टक्के मतदारांनी हा मुद्दा परिणामकारक असल्याचे सांगितले, तर ‘बदलाला साथ’ म्हणून २४ टक्के मतदारांनी कौल दिला असून, नेत्यांच्या पक्षांतराच्या बाजूने १२ टक्के जणांनी मते नोंदविली आहेत. सत्तेवर असलेल्या पक्षाच्या म्हणजेच सध्या जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’विरोधात मतदान केल्याचे ५७ टक्के मतदारांनी सांगितले, यातून मतदारांना बदल हवा होता हे स्पष्ट होते. ‘इलेट्रॉनिक मतदान यंत्रा’मध्ये घोटाळा झाल्याची चर्चा सोशल मीडियावरून तसेच अनेक नेत्यांच्या बोलण्यातून झाली होती; परंतु ८४ टक्के मतदारांनी ‘इलेट्रॉनिक मतदान यंत्रा’मध्ये कोणताही घोटाळा नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

अनेक ठिकाणी घरांत मतविभागणी झाल्याचे ७५ टक्के मतदारांनी मान्य केले. त्यामध्ये प्रामुख्याने दोन पिढ्यांमधील अंतर कारणीभूत आहे. घरात मतांची विभागणी होताना दोन पिढ्यांमधील अंतर कारणीभूत असल्याचे ६१ टक्के मतदारांनी स्पष्ट केले आहे, तर १५ टक्के मतदारांनी उमेदवारांच्या गुंडगिरीची पार्श्‍वभूमी पाहिली, तर दुसरीकडे २३ टक्के लोकांनी अशी मतांची विभागणी होताना पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला असून, ७२ टक्के मतदारांनी या प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने मतदान केल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

Web Title: Kolhapur - Vote Ki Baat